“पंजाब केसरी लाला लजपतराय” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay
लाला लजपतराय
माझ्यावर केलेला प्रत्येक प्रहार हा साम्राज्यशाहीच्या शवपेटीवर ठोकला जाणारा एक- एक खिळाच ठरणार आहे!” ही भविष्यवाणी होती, लाला लजपतराय यांची, ब्रिटिश सरकारनं भारताच्या राजकीय मागण्यांचा विचार करण्यासाठी सायमन आयोग नेमला होता. यावर एकही हिंदी सदस्य नव्हता. राष्ट्रीय सभेनं सायमन आयोगावर बहिष्कार टाकला होता. या आयोगाच्या निषेधासाठी देशभर निदर्शनं चालली होती. लाहोर शहरातही एक प्रचंड मिरवणूक निघाली. लालाजी होते मिरवणुकीच्या अग्रभागी. ‘सायमन, गो बैंक सायमन, परत जा’ अशा घोषणांनी शहर दुमदुमून गेलं. खवळलेल्या इंग्रज सरकारच्या शिपायांनी स्कॉट नावाच्या अधिकाऱ्याच्या आदेशानं मिरवणुकीवर लाठीहल्ला चढवला. त्यात लालाजी घायाळ झाले.
पंजाबातील लुधियाना जिल्ह्यातलं जगराव हे लालाजींचं गाव. लालाजींचा जन्म २८ जानेवारी १८६५ रोजी झाला. वडील राधाकृष्ण जगरावच्या शाळेत शिक्षक होते, उर्दू लेखक होते आणि स्वामी दयानंद सरस्वती यांचे अनुयायी होते. साहित्य आणि समाजसेवा यांची त्यांना आवड होती. आपला लालादेखील समाजसेवी व्हावा, अशा इच्छेनं त्यांनी त्याला शिक्षण दिलं
लालाजींनी कायदयाची परीक्षा दिली. ते वकील झाले. सुरुवातीला त्यांनी हिस्सार या शहरी वकिली सुरू केली. बुद्धीचं तेज आणि बिनतोड युक्तिवाद यामुळं थोड्याच अवधीत एक निष्णात वकील म्हणून ते गणले जाऊ लागले.
लालाजींवर आर्यसमाजाच्या विचारांचा प्रभाव होता. अस्पृश्यता निवारण हे आर्यसमाजाचं मुख्य कार्य होतं. या कार्यासाठी ते गावोगाव हिंडत असत. माणसामाणसांत भेदभाव करणं त्यांना पटत नसे.
त्या काळात शाळांतून दिलं जाणारं साचेबंद शिक्षण लालाजींना पसंत नव्हतं. त्यांनी आपले मित्र लाला हंसराज यांच्या सहकार्यानं लाहोर शहरात ‘दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज’ काढलं. ठिकठिकाणी शाळाही उघडल्या. या शाळा-कॉलेजांतून इंग्रजी भाषेबरोबरच संस्कृत, हिंदी, उर्दू अशा देशी भाषांचं शिक्षण दिलं जाई. भारतीय संस्कृतीची विद्यार्थ्यांना ओळख होईल आणि त्यांच्या ठायी देशाभिमान वाढेल, अशा उपक्रमांची योजनाही केली जाई. लालाजींच्या महाविदयालयातून अनेक कट्टर देशभक्त आणि निष्ठावान समाजसेवक तयार झाले.
बंगाल, मध्यप्रदेश आणि राजस्थान या भागांत भयंकर दुष्काळ पडला असताना लालाजी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेले. अनाथ मुलांची फिरोजपूर आणि लाहोर येथील अनाथालयांत त्यांनी व्यवस्था केली.
लालाजी जहाल विचारांचे होते. ‘वंदे मातरम्’ नावाच्या दैनिकातून त्यांनी क्रांतिकारी लेखन केलं.
‘पंजाबी’ नावाच्या वृत्तपत्रातून त्यांनी सरकारवर कडक टीका करणारे लेख लिहिले. लोकजागृतीचं काम केलं. पंजाबात राष्ट्रीय चळवळ तीव्र केली.
शेतकऱ्यांच्या आंदोलनात त्यांनी धडाडीनं भाग घेतला आणि ब्रिटिश सरकारशी झुंज
दिली.
१९०५ साली सरकारनं बंगाल प्रांताची फाळणी केली आणि देश असंतोषानं पेटून उठला. बंगभंगविरोधाची ही चळवळ केवळ बंगालमध्येच नव्हे, तर भारतभर पसरली. पंजाबमध्येही स्फोटक परिस्थिती निर्माण झाली. या स्थितीस प्रामुख्यानं लाला लजपतराय जबाबदार आहेत, याची इंग्रजांना खात्री होती; परंतु लालाजी सर्व हालचाली कायद्याच्या चौकटीत राहून करत असल्यानं त्यांच्यावर कारवाई करणं सरकारला शक्य होत नव्हतं. लालाजींना मुक्त ठेवणंही सरकारला धोक्याचं वाटत होतं.
पंजाबात इंग्रजांची दडपशाही वाढतच होती. शेतकऱ्यांवरचं कराचं ओझं कमी न होता वाढतच होतं. कालव्याच्या पाण्याचे दर सरकारनं भरमसाट वाढवले होते. जुलमाखाली भरडल्या
जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूनं लालाजी उभे राहिले. त्यांना संघटित केलं.
सरकारला आता कारण मिळालं.
१९०७ मध्ये शेतकरी चळवळ सुरू केल्याच्या आरोपावरून लालाजींना सरकार करून मंडाले इथं ठेवलं. इथे लालाजींना अभ्यासाला आणि चिंतनाला वेळ मिळाला
लालाजींनी मंडालेच्या कारावासात अठरा महिने काढले,
मंडालेहून परतल्यावर लालाजीनी स्वतःला राष्ट्रीय चळवळीस पूर्णपणे वाहुन चेताव आता देशाचे एक प्रमुख पुढारी मानले जाऊ लागले. महाराष्ट्रात जसा टिळकांचा ‘केसरी’, पंजाबात लालाजीचा ‘पंजाबी’, लालाजीच्या तेजस्वी लेखणीनं लोकजागृतीचं फार मोठं का केलं.
लोकमान्य टिळक आणि लालाजी यांच्याप्रमाणंच विपिनचंद्र पाल हे त्याच काळात लोकजागृतीच्या कार्यात आघाडीवर होते. ‘लाल-बाल-पाल’ अशी स्वातंत्र्याची त्रिमूर्ती म्हणूनच देशभर या तिघांना लोक ओळखू लागले.
१९१४ साली लालाजी काँग्रेसच्या शिष्टमंडळाबरोबर इंग्लंडला गेले. तिथून ते जपानला गेले. दरम्यान पहिलं महायुद्ध सुरू झालं. अशा वेळी लालाजींनी भारतात परत येणं सरकारला धोक्याचं वाटलं. त्यांना भारतात परत यायला बंदी घालण्यात आली. लालाजी अमेरिकेला गेले. तिथल्या वास्तव्यात त्यांनी वृत्तपत्रांमधून अनेक लेख लिहिले. भारताची बाजू जगापुढे मांडली. ‘इंडियन होमरूल लीग’ची स्थापना केली. त्यांनी त्या काळात लिहिलेलं ‘यंग इंडिया’ हे पुस्तक फारच गाजलं.
महायुद्ध संपलं. लालाजी भारतात परतले, तेव्हा असहकारितेचं आंदोलन भरास आलेलं होतं. त्याच सुमारास काँग्रेसचं अधिवेशन कोलकत्याला झालं. या अधिवेशनाचं अध्यक्षपद लालाजींनीच भूषवलं होतं.
१९२० मध्ये आयटक या कामगार संघटनेचं पहिलं अधिवेशन मुंबईत भरलं. लाला लजपतराय या अधिवेशनाचेही अध्यक्ष होते.
स्वराज्य पक्षातर्फे लालाजी मध्यवर्ती कायदेमंडळात गेले. चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू, मदनमोहन मालवीय यांच्याबरोबर त्यांनी तिथं उत्तम कामगिरी बजावली. मध्यवर्ती कायदेमंडळाच्या निवडणुका जिंकून सरकारची अडवणूक करणं हा स्वराज्य पक्षाचा मुख्य कार्यक्रम होता.
लाला लजपतराय यांचा कल समाजवादाकडं होता. केवळ राजकीय क्रांतीचा विचार न करता त्यांनी आर्थिक बदलांचाही विचार केला होता. सामाजिक स्वातंत्र्याकडं त्यांनी अर्थातच कधीही दुर्लक्ष केलं नाही.
लालाजींनी ‘पीपल’ नावाचं इंग्रजी नियतकालिक सुरू केलं. त्यांनी ‘महान अशोक’, ‘श्रीकृष्ण आणि त्याची शिकवण’, ‘छत्रपती शिवाजी’, ‘मॅझिनी’, ‘गरिबाल्डी’ इत्यादी पुस्तकं लिहिली. इंग्रजी भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं, पण त्यांनी आपलं बरंचसं लेखन उर्दूतून केलं.
ना. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या भारत सेवक समाजाप्रमाणंच लालाजींनी ‘सर्वांट्स ऑफ पीपल सोसायटी’ या नावाची सामाजिक कार्य करणारी संस्था सुरू केली होती. त्याचप्रमाणं ‘टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स’ नावाची संस्थाही त्यांनी स्थापन केली होती.
१९२८ सालातल्या ऑक्टोबर महिन्यात सायमन कमिशनच्या निषेधाच्या मिरवणुकीवर झालेल्या लाठीहल्ल्यात लालाजींना जीवघेणी दुखापत झाली. दिनांक १७ नोव्हेंबर १९२८ रोजी लालाजींचं दुःखद निधन झालं.
देशासाठी केलेल्या महान कामगिरीनं हा ‘पंजाब केसरी’ अमर झाला.