“क्रांतिवीर भगतसिंग” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay
२३ मार्च १९३१ ची पहाट. लाहोरचा प्रचंड तुरुंग. सर्वत्र गंभीर वातावरण. शस्त्रधारी सैनिकांचा कडेकोट बंदोबस्त. सकाळचे सात वाजलेले. थोड्याच वेळात फासावर चढवले जाणारे तीन क्रांतिकारक गंभीर वातावरणात ‘इन्किलाब झिंदाबाद’, ‘इन्किलाब झिंदाबाद’ अशा घोषणा देत होते.
साक्षात मृत्यू समोर उभा असताना निर्भयपणं क्रांतीचा जयजयकार करणारे हे वीर पुरुष कोण होते ?
ते होते भारतभूमीचे सुपुत्र भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची बाजी लावणारे श्रेष्ठ क्रांतिकारक. भगतसिंगांचा जन्म १९०७ साली पंजाबातील बंगा या गावी झाला. किशनसिंग या शेतकऱ्याचा हा मुलगा. भगतसिंगांच्या घराण्यातच स्वातंत्र्यासाठी हालअपेष्टा सोसण्याची परंपरा होती. भगतसिंगांचे वडील व चुलते यांना देशासाठी तुरुंगात जावं लागलं होतं. त्यामुळे मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी चळवळ करण्याची प्रेरणा भगतसिंगांना घरातूनच मिळाली. आर्य समाज, सिंग सभा यांसारख्या संस्थांशी त्यांच्या सर्व कुटुंबाचेच संबंध होते.
बालपणापासूनच भगतसिंगांवर सुधारक व क्रांतिकारी विचारांचा पगडा होता. बंगा या जन्मगावी प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षण त्यांनी लाहोरच्या दवानंद अँग्लो वैदिक महाविद्यालयात घेतलं. लाहोर हे त्या काळात भारतीयांच्या असंतोषाचं केंद्र बनलं होतं. भगतसिंगांसारखा तरुण इथं आल्यानंतर क्रांतिकारकांच्या प्रभावाखाली आला नसता, तरच नवल. या क्रांतिकारकांच्या अंतःकरणात स्वातंत्र्याची ज्योत पेटलेली होती.
१९२६ साली भगतसिंगांनी पदवी घेतली. ते घरी परतले. पुढं कानपूरला गेले. ‘प्रताप’ नावाच्या वृत्तपत्रात काम करू लागले. भगतसिंगांचं हिंदी भाषेवर फार प्रभुत्व होतं. हृदयात जळजळीत निखारा होता. लेखणीत तेज होतं. बलवंतसिंग हे नाव त्यांनी धारण केलं. याच नावानं कानपुरात राहिले आणि ‘प्रताप’मधील लेखनही याच नावानं केलं.
भगतसिंग क्रांतिकारक होते. देशाच्या इतर भागांमधील क्रांतिकारकांशी ते संधान साधू लागले. गुप्त बैठका भरू लागल्या. बेत शिजू लागले. शस्त्रास्त्रं जमू लागली. गुप्त हालचाली वाढल्या. या गोष्टींचा पोलिसांना सुगावा लागला. त्यांनी पाळत ठेवली. तेव्हा भगतसिंगांनी कानपूरला रामराम ठोकला आणि दिल्ली गाठली. ‘सत्यवादी’ नावाच्या साप्ताहिकात बलवंतसिंग या नावानंच ते काम करू लागले.
दिल्लीतही क्रांतिकारकांच्या हालचाली सुरू झाल्या. तिथंही पोलिसांची पाळत वाढली. भगतसिंग दिल्लीहून लाहोरला आले, मुंडण केलं आणि पुन्हा भगतसिंग या नावानं वावरू लागले. तिथंही क्रांतिकार्य सुरू केलं. ‘नौजवान भारतसभा’ नावाची संस्था सुरू केली. तिच्यात अनेक देशभक्त तरुण दाखल झाले. सभेचं कार्य वाढलं. पोलिसांच्या हे डोळ्यांवर आलं, तेव्हा त्यांनी या सभेवर बंदी घातली. तरीही गुप्त रीतीनं क्रांतिकारकांचं काम होतच राहिलं.
बंगाल, बिहार, पंजाब, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र इत्यादी भागांत निरनिराळे क्रांतिकारक गुप्त रीतीनं कार्य करत होते. चंद्रशेखर आझाद यांनी या सर्वांना एकत्र आणून ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ नावाची क्रांतिकारी संस्था स्थापन केली. भगतसिंग आणि त्यांचे साथी सुखदेव, राजगुरू, यशपाल, भगवतीचरण आदी क्रांतिकारक या संस्थेत काम करू लागले. पुढं या संस्थेची एक शाखा ‘हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी’ या नावानं काम करू लागली. गुप्तपणानं शस्त्रास्त्रांची जमवाजमव सुरू झाली. बाँब तयार होऊ लागले. जतींद्रनाथ दास हा बाँब तयार करण्याच्या विद्येत कुशल होता. तो मुद्दाम कोलकत्याहून लाहोरला आला.
१९२८ साली लाहोरला सायमन कमिशनविरोधी निदर्शनं झाली. ब्रिटिश पोलीस अधिकारी स्कॉट याच्या आदेशानं झालेल्या लाठीमारात लाला लजपतराय घायाळ झाले. पुढे त्यातच त्यांचा दुःखद अंत झाला. या घटनेनं क्रांतिकारक पेटून उठले.
चंद्रशेखर आझाद म्हणाले,
‘स्कॉटला ठार करूनच बदला घेता येईल !’
स्कॉटला ठार करण्याचा बेत पक्का झाला. १७ डिसेंबर १९२८ चा दिवस. दुपारची वेळ. मोटार सायकलवरून एक गोरा अधिकारी पोलीस कचेरीतून बाहेर पडला. राजगुरूनं पाठलाग करून पहिली गोळी झाडली. पाठोपाठ भगतसिंगांनीही गोळ्या झाडल्या. गोरा अधिकारी घायाळ झाला. धुळीत कोसळला. क्रांतिकारक पसार झाले. राजगुरू, भगतसिंग व चंद्रशेखर तिघंही आपल्या जागी सुखरूपपणं पोचले; पण नंतर त्यांना कळलं, की मारला तो स्कॉट नव्हता, त्याचा सहायक सॉण्डर्स होता.
लाहोरला घडलेल्या या घटनेमुळं सरकार हादरलं. सुरक्षिततेसाठी सरकारनं ‘सार्वजनिक सुरक्षा विधेयक’ मध्यवर्ती कायदेमंडळात मांडलं.
जनतेचे राजकीय हक्क हिरावून घेणाऱ्या या अन्यायी विधेयकाकडं जगाचं लक्ष वेधून घेणारी ठोस कृती करण्याचा निर्णय या क्रांतिकारकांनी घेतला.
त्याप्रमाणं ९ एप्रिल १९२९ रोजी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती कायदेमंडळाच्या सभागृहात बाँब टाकले. सभागृहात धुराचे लोट पसरले. बाँबच्या आवाजापाठोपाठ क्रांतिकारकांच्या ‘इन्किलाब झिंदाबाद’, ‘साम्राज्यशाही मुर्दाबाद’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेलं. क्रांतिकारकांनी सभागृहात पत्रकंही फेकली.
थोड्या वेळानं धूर निवळला, तेव्हा गॅलरीत दोन तरुण घोषणा देत उभे असलेले दिसले. ते होते भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त ! पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यांच्यावर खटला भरला.
खटल्याच्या वेळी कोर्टात आपली बाजू मांडताना भगतसिंगांनी सांगितलं,
‘भारतीय जनतेची इच्छा-आकांक्षा बाँबच्या धडाक्यानं इंग्रज सरकारच्या कानापर्यंत पोचविण्याचाच आमचा उद्देश होता.’
लाहोर कटाशी भगतसिंगांचा संबंध असावा, असा पोलिसांना संशय होता. लाहोर येथे गझडत्या घेत असताना तेथील बाँब फॅक्टरीचा सुगावा लागला. त्यानंतर हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली व भगतसिंगांसह त्या सर्वांवर लाहोर कटाचा खटला सुरू करण्यात आला. हा खटला कित्येक दिवस चालला. अखेरीस भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशीची शिक्षा फर्मावण्यात आली. २३ मार्च १९३१ रोजी या तीन देशभक्त वीरांना फाशी देण्यात आलं.
‘इन्किलाब झिंदाबाद !’ अशी घोषणा देत हे तीन क्रांतिकारक फासावर चढले.
भगतसिंगांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला असला, तरी त्या मार्गाच्या मयदिची ना आणीव होती. ते म्हणतात,
हा माझा ठाम विश्वास आहे, की आपल्या देशाला केवळ बाँव आणि पिस्तुलांच्या
स्वातंत्र्य मिळणार नाही… विशिष्ट प्रसंगी बॉब टाकणे समर्थनीय असले तरी दर वेळी केवळ बाँ
टाकणे हे नुसते निरुपयोगीच नव्हे, तर प्रसंगी धोकादायकही आहे.’
स्वतंत्र भारताविषयी, येथील सामान्य जनतेविषयी, जनतेच्या आर्थिक व सामाजिक प्रश्नांविषयी त्यांचं निश्चित असं मत होतं.
भगतसिंग केवळ सशस्त्र क्रांतिकारकच नव्हे, तर अभ्यासू समाजवादीही होते रशियातील बोल्शेव्हिक क्रांतीच्या मार्गानंच भारताला खरं स्वातंत्र्य मिळू शकेल, असा त्यांचा विश्वास होता.
भारतमातेच्या या थोर सुपुत्रानं ऐन तारुण्यात स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलं. त्यांच हौतात्म्य असंख्य युवक-युवतींना प्रेरणादायी ठरलं !