“दादाभाई नौरोजी” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay
दाभाई नौरोजी यांना आपण ‘भारताचे पितामह’ म्हणतो. पितामह म्हणावं, असंच दात्यांचं कार्य होतं. त्यांना व्याण्णव वर्षाचं दीर्घायुष्य लाभलं. त्यांची बुद्धिमत्ला, त्यांचा अर्थशास्त्र आणि गणित या विषयांचा व्यासंग, तशीच त्यांनी केलेली थोर देशसेवा आणि त्यांची महनीय कामगिरी पाहिली, म्हणजे ते भारताचे पितामह होते, हे पटतं.
दादाभाईंचा जन्म मुंबई इथं ४ सप्टेंबर १८२५ रोजी झाला. दादाभाईंचं आडनाव होतं दोरदी. नवसारीजवळ धर्मपूर या गावी दोरदी कुटुंबाची शेतीवाडी होती. मुंबईला येण्यापूर्वी दादाभाईंचे आजोबा आणि वडील शेती करत. दादाभाईंच्या वडलांचं नाव होतं नौरोजी पालनजी दोरदी आणि आईचं नाव होतं माणकबाई. दादाभाई चार वर्षांचे असतानाच त्यांचे वडील वारले. मग आईनंच त्यांचं पालनपोषण केलं, शिकवलं. त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. मोठेपणी ते अभिमानानं म्हणत,
‘मी आज जो काही घडलो आहे, तो माझ्या आईमुळेच !’
दादाभाईंनी एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूशन या संस्थेत शिक्षण घेतलं. त्यांची बुद्धिमत्ता पाहून
त्यांचे शिक्षक त्यांना ‘भारताचे आशास्थान’ म्हणत. त्यांचे हे शब्द दादाभाईंनी खरे करून दाखवले शिक्षण पुरं केल्यानंतर दादाभाईंनी शिक्षकाचा पेशा स्वीकारला. ते गणिताचे प्राध्यापक झाले.
याच सुमारास दादाभाई सार्वजनिक कार्यात भाग घेऊ लागले.
दादाभाईंनी १८५१ मध्ये ‘रास्त गोफ्तार’ नावाचं वृत्तपत्र काढलं. या पत्रातून ते लोकजागृतीचं काम करू लागले.
पुढल्या वर्षी ‘बॉम्बे असोसिएशन’ या संस्थेच्या स्थापनेत दादाभाईंनी जगन्नाथ शंकरशेट यांच्याबरोबर पुढाकार घेतला. या संस्थेनं ब्रिटिश पार्लमेंटकडं मागणी केली, की इंग्रज सरकारनं भारतीयांच्या मताची कदर केली पाहिजे आणि उच्च अधिकारपदांवर भारतीयांना स्थान दिलं पाहिजे.
१८५५ साली एका व्यापारी कंपनीचे भागीदार म्हणून दादाभाई इंग्लंडला गेले. इंग्लंडमधल्या वास्तव्यात त्यांनी इंग्लंड आणि भारत यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा सखोल अभ्यास केला. भारताच्या दुर्दशेची त्यांना तीव्र जाणीव झाली. शिक्षणासाठी इंग्लंडला गेलेले भारतीय तरुण हळूहळू त्यांच्याभोवती जमू लागले. त्यांच्या विचारानं प्रभावित होऊ लागले. दादाभाई हे त्यांच्या शांत, सुशील, निर्मळ स्वभावामुळे आणि बुद्धिमत्तेमुळं इंग्रज लोकांतही प्रिय होते.
दादाभाईंनी इंग्लंडमध्ये ‘ईस्ट इंडिया असोसिएशन’ नावाची संस्था स्थापन केली. या
संस्थेच्या शाखा मुंबई, कोलकता, चेन्नई या शहरांतही सुरू झाल्या. या संस्थेच्या सभांमधून भारताच्या जिव्हाळ्याच्या विविध विषयांवर चर्चा होत. निबंध वाचले जात. एका सभेमध्ये ‘भारताविषयी इंग्रजांचे कर्तव्य’ या विषयावर दादाभाईंनी एक निबंध वाचला होता.
भारताची गरिबी घालवण्यासाठी इंग्रज सरकारनं व भारतातील लोकांनी काय केलं पाहिजे, हे दादाभाईंनी परखडपणानं सांगितलं. यासंबंधात त्यांनी भाषणं दिली, लेख लिहिले, पुस्तकं लिहिली. राष्ट्राच्या जीवनात आर्थिक आणि शैक्षणिक गोष्टींना महत्त्वाचं स्थान असतं, याकडं
दादाभाईंनी लोकांचं लक्ष प्रथमतः वेधलं.
‘पॉव्हर्टी अॅण्ड अन्-ब्रिटिश रूल इन इंडिया’ हा दादाभाईंनी लिहिलेला, ब्रिटिश राजवटीखालील भारताच्या दारिद्र्याचा ऊहापोह करणारा ग्रंथ, त्या वेळी फारच गाजला होता.
ब्रिटिशांच्या भारतातील धोरणाचं वर्णन दादाभाईंनी ‘जेवढं लुबाडता येईल, तेवढं लुबाडणं’, अशा शब्दांत केलं. त्यांनी ब्रिटिश सरकारला बजावलं, की भारतालाच नव्हे, तर इंग्लंडलाही हे धोरण घातक ठरणार आहे. करांच्या आणि कारभारावरील खर्चाच्या रूपानं भारतातून कोट्यवधी रुपयांची लूट चालू आहे, हे त्यांनी आकडेवारीनं सिद्ध करून दाखवलं. मालक आणि गुलाम या नात्यापेक्षा सहकार्याच्या व समानतेच्या भावनेनं भारताकडं पाहण्याची सूचना त्यांनी ब्रिटिश सरकारला केली.
इंग्लंडमधल्या वास्तव्यात केलेल्या लोकसेवेमुळं दादाभाई ब्रिटिश पार्लमेंटमध्ये १९०२ मध्ये निवडून गेले होते. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निवडून गेलेले ते पहिले भारतीय होते. पार्लमेंटमध्ये केलेल्या प्रभावी भाषणांतून त्यांनी “भारतासारख्या गरीब देशावर इंग्रजांनी आपल्या शासनाचं ओझे लादू नये आणि भारताची पिळवणूक करू नये”, असं स्पष्टपणानं वारंवार सांगितलेले होते. भारतीय राष्ट्रीय सभा (इंडियन नॅशनल काँग्रेस) स्थापन करण्यात दादाभाईनी मोठा हातभार लावला होता. दादाभाईंनी केलेल्या अजोड देशसेवेमुळंच त्यांना तीन वेळा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला होता.
१९०६ साली दादाभाई भारतात परत आले, त्या वर्षी कोलकत्याला भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी स्वराज्याची मागणी केली. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले,
‘तलवार, दडपशाही, लूट यांच्या जोरावर ब्रिटिश राज्यकर्ते भारतावर राज्य करू पाहत आहेत; पण आम्ही ते होऊ देणार नाही. भारतीय लोकांना कणा आहे, अखेरपर्यंत हिंमत धरण्याची ताकद आहे, हे सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आम्हांला ब्रिटिश सरकारची मेहेरबानी नको. आम्हांला न्याय पाहिजे. आपलं स्वतःचं सरकार पाहिजे. इंग्लंडच्या जनतेला जे स्वातंत्र्य आहे, ते आम्हांला हवं. केवळ चांगलं शासन हा स्वराज्याला पर्याय असू शकत नाही. स्वराज्यासाठी चळवळ करा, अखंड चळवळ करा. एकोप्यानं रहा, चिकाटीनं झगडा, स्वराज्य संपादन करा. दारिद्र्यात खितपत पडलेल्या, उपासमारीनं मरणाऱ्या कोट्यवधी गरीब देशबांधवांना या घोर आपत्तीतून वाचवा. स्वराज्यासाठी आपण ‘बहिष्काराची चळवळ’ उभारली पाहिजे.’
‘स्वराज्य’, ‘स्वदेशी’ आणि ‘बहिष्कार’ हा मंत्र काँग्रेसच्या व्यासपीठावरून दादाभाईंनी प्रथम उच्चारला आणि स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीची योग्य दिशा देशाला दाखवली.
दादाभाईंचं कार्यक्षेत्र केवळ राजकारणापुरतं मर्यादित नव्हतं. ते एक समाजसुधारकही होते. जातिबंधनं त्यांना मान्य नव्हती. स्त्रियांना शिक्षण मिळालं पाहिजे, स्त्री-पुरुषांचा दर्जा समान असला पाहिजे, त्यांना समान हक्क दिले पाहिजेत, या गोष्टींचा त्यांनी हिरिरीनं पुरस्कार केला.
आपला देश स्वावलंबी व्हावा, यासाठी ते झटले. त्यांनी जमशेदजी टाटा यांना भारतात भांडवल उभारून पोलादाचा कारखाना उभारायला उत्तेजन दिलं.
कार्यरत असतानाच ३० जून १९१७ रोजी दादाभाईंचं निधन झालं. त्यांना श्रद्धांजली वाहताना न्यायमूर्ती चंदावरकर म्हणाले –
‘दादाभाईंच्या रूपानं भारताच्या क्षितिजावर जो सूर्य उगवला, तो आज जरी मावळला असला, तरी पुन्हा नव्या भारताच्या रूपानं तो उदयास येणार आहे. या नव्या भारताच्या उभारणीसाठीच ते जगले, पराकाष्ठेनं झटले आणि त्यांनी आपलं जीवनकार्य निष्ठेनं पार पाडलं.’
***