सन २०२४-२५ अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना तीन महिन्यांचा कालावधी देण्याबाबत caste validity engineering and medical
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना तीन महिन्यांचा कालावधी देण्याबाबत…
संदर्भ-
१. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ (सन २०२४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६)
२. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२४/प्र.क्र. ७५/आरक्षण-५ दि. २२.०७.२०२४.
३. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२४/प्र.क्र. ७५/आरक्षण-५ दि. ०५.०९.२०२४
प्रस्तावना –
सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दि. २२.०७.२०२४ व दि. ०५.०९.२०२४ अन्वये एसईबीसी व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास, प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु, सदरच्या कालावधीत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांपैकी काही उमेदवार विहित कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकले नाहित. सदर जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या उमेदवारांचे शैक्षणिक हित लक्षात घेता शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.
शासन निर्णय-
राज्यात सध्या सुरू असलेल्या सन २०२४-२५ मधील विविध शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी (अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित) एसईबीसी व ओबीसी प्रवर्गातील ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झालेले आहे परंतु विहित कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकलेले नाहित, अशा उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास या आदेशाच्या दिनांकापासून अधिकचा तीन महिन्यांचा कालावधी देण्यात येत आहे.
२. सदरचा अधिकचा तीन महिन्यांचा कालावधी हा एसईबीसी व ओबीसी प्रवर्गातील ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत परंतु जात वैधता प्रमाणपत्र विहित वेळेत सादर करू शकले नाहित केवळ अश्या उमेदवारांसाठीच राहिल. तसेच जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सदर तीन महिन्यांचा कालावधी हा अंतिम असेल व त्यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.
३. या अधिकच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या उमेदवारांचे प्रवेश होऊ न शकल्यास त्यास संबंधित उमेदवार जबाबदार राहतील.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०१०७१६०१३५१९०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.