शाळकरी मुलाला जबर मारहाण; मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल;पायावर उमटले वळ : शहागड जि.प.शाळेतील घटना zp school primary
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदी: अभ्यास न केल्याने आणि या वर्गात कसे काय बसला, असा जाब विचारत शाळकरी मुलास मारहाण करणाऱ्या मुख्याध्यापकाविरुद्ध गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ६ जानेवारी रोजी शहागड येथील जिल्हा परिषद शाळेत घडली.
शहागड येथीलच एक मुलगा उर्दू माध्यमात शिक्षण घेत होता. परंतु, त्याचा अभ्यास पाहता पालकांनी त्याला शहागड येथील जिल्हा परिषद शाळेत दुसरीच्या वर्गात टाकले होते. तो सध्या सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. परंतु, त्याचे वय अधिक असल्याने वर्गशिक्षक नरसाळे यांनी २३ डिसेंबर २०२४ पासून त्याला नववीच्या वर्गात बसविले तसेच संबंधित वर्गशिक्षिकेला त्याला बसू देण्यास सांगितले. ६ जानेवारी रोजी दुपारी मुख्याध्यापक भारत खेडकर वर्गावर आले आणि प्रश्नोत्तरे लिहिली का, अशी विचारणा केली. त्यामुळे इतर मुलांसोबत तो मुलगाही उभा राहिला. खेडकर यांनी त्याला विचारणा करताच ‘मी आठ दिवसांपासून या वर्गात बसत आहे. मी नवीन आहे’, असे त्याने सांगितले. त्यावेळी ‘तू नववीच्या वर्गात कसे काय’ असा प्रश्न करीत खेडकर यांनी लिंबाच्या काठीने पायावर मारहाण केली. शाळा सुटल्यानंतर संबंधित मुलाने घरी जाऊन पालकांना प्रकार सांगितला. त्यानंतर या प्रकरणात पीडित मुलाने गोंदी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार मुख्याध्यापक भारत रामराव खेडकरविरुद्ध अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ कलम ७५, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ कलम ११८ (१) व भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ कलम ३५२ नुसार गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.