जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमांचे वर्ग सुरू करणेस मान्यता देणेबाबत semi class granted to zp school
संदर्भ : १. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. कोल्हापूर यांचे पत्र क्र. कोजिप/शिक्षण/प्राथ/वशि- ३०/१०९१/२०२४/दि.११/७/२०२४ प्राप्त दि.२२/७/२०२४
२. शासन निर्णय क्र.पीआरई-१७१३/(८६/१३/प्राशि-५, दि.१९.०६.२०१३
३. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २०११
उपरोक्त विषयान्वये केंद्र शासनाने बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ पारित केला असून त्याची अंमलबजावणी दि.०१.०४.२०१० पासून राज्यामध्ये सुरू झाली आहे. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने दि.१२.०४.२०१२ रोजी हा कायदा वैध ठरविला आहे. त्याअनुषंगाने शासन निर्णय दि.१९.०६.२०१३ नूसार राज्यातील बिगर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इ.१ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांना गणित व इ.६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान हे ऐच्छिक स्वरूपात इंग्रजी भाषेतून शिकविण्यास परवानगी देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे अटी व शर्ती देण्यात आलेल्या आहेत.
१. बिगर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इ.१ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांना गणित व इ.६ वी ते ८ वी च्या विद्याध्यौना गणित व विज्ञान हे ऐच्छिक स्वरूपात इंग्रजी भाषेतून शिकविण्याची परवानगी संबंधित शाळांची विषय शिकविण्याची क्षमता व पालकांची इच्छा विचारात घेऊन देण्यात यावी.
२. गणित व विज्ञान विषय शिकविण्यासाठी अतिरिक्त शिक्षकांची पदे निर्माण करता येणार नाहीत. तसेच विषयासाठी कोणतेही अतिरिक्त अनुदान उपलब्ध करण्यात येणार नाही. ३ . बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील तरतूदीनुसार प्राथमिक
शिक्षकांकरिता (इ.१ली ते इ.८वी) शिक्षकांची शैक्षणिक व व्यवसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परिक्षा अनिवार्य करणेबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक आरटीई-२०१०/प्र.क्र.५७२/प्राशि-१, दिनांक १३.०२.२०१३ मधील तरतुदीनुसारच सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पध्दती अवलंबविणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षण पात्रता अनिवार्य राहील. तसेच संबंधित शाळांकरीता मंजूर शिक्षकांपैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षण शास्त्रातील पदविका (डीटीएड) धारक असणे आवश्यक राहील.
👉👉👉👉👉शाळांची यादी व शासन निर्णय pdf download
४. वरील विषय शिकविणाऱ्या शिक्षकांना संबंधित शाळेच्या विनंतीनुसार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्यापरिषद), पुणे यांचेमार्फत प्रशिक्षण देण्यात येईल.
५. वरील विषय शिकविण्याबाबतचा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद), पुणे यांच्याकडून तयार केला जाईल तसेच अभ्यासक्रमावर आधारित शिक्षण साहित्य व पाठयपुस्तके महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे यांचेकडून तयार करण्यात येईल.
६. वरील शैक्षणिक अभ्यासक्रमाची अंमलबजावणी शाळांना देण्यात आलेल्या परवानगीचे शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल.
७. ज्या शैक्षणिक वर्षापासून वरील अभ्यासक्रम शिकविण्यास सुरूवात करावयाची आहे त्या वर्षापूर्वीच्या माहे डिसेंबर अखेर पर्यंत संबंधित शाळेने पाठ्यपुस्तक व शिक्षण साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) पुणे यांचेकडे मागणी नोंदविणे अनिवार्य राहील.
वरील संदर्भीय पत्रान्वये जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमांचे वर्ग सुरू करणेस मान्यता मिळणेबाबत प्रस्ताव प्राप्त झाला असून प्राप्त प्रस्तावांची शासन निर्णय दि.१९.०६.२०१३ नुसार तपासणी करण्यात आली आहे.
सबब, शासन निर्णय दि.१९.०६.२०१३ मधील अटी शर्तीच्या अधीन राहून आपल्या जिल्हयातील प्रपत्र- अ मधील जिल्हा परिषद १२० शाळांमध्ये इयत्ता पहिली पासून सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यास शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ पासून मान्यता देण्यात येत आहे.