स्वतः चा जीव धोक्यात घालून करोडो लोकांचा जीव वाचवणारा रसायनशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ: लुई पाश्चर scientists lui paschher 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्वतः चा जीव धोक्यात घालून करोडो लोकांचा जीव वाचवणारा रसायनशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ: लुई पाश्चर scientists lui paschher

*27 डिसेंबर 1822.*
28 सप्टेंबर 1895.
फ्रान्सच्या पूर्व भागातील डल या गावात लुई पाश्चर यांचा जन्म चामडी कमावणाऱ्या एका गरीब कुटुंबात झाला होता. चित्र काढण्यात आणि मासे पकडण्यात रमणाऱ्या छोटया लुईचे अभ्यासात फारसे लक्ष नव्हते. त्याने किशोरवयात रंगीत पेन्सिलींनी काढलेली चित्रे पाश्चर संग्रहालयात ठेवलेली आहेत.

*लूई पाश्चर हे फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आणी सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते*
.
विज्ञानाच्या प्रगतीत आपल्या विविध क्षेत्रांतील संशोधनाने त्यांनी मौल्यवान भर घातली.

*रसायनशास्त्र*
त्यांचे सुरुवातीचे संशोधन रसायनशास्त्राशी निगडित होते. टार्टारिक आम्लाच्या रेणूच्या रचनेचा त्यांनी अभ्यास केला. नैसर्गिक पदार्थांमध्ये असणाऱ्या आणि कृत्रिमरित्या तयार केलेल्या टार्टारिक आम्लाच्या रेणूंच्या रचनेत काही फरक आढळून आला होता. नैसर्गिक पदार्थांमधील टार्टारिक आम्लाचा रेणू ध्रुवीकृत प्रकाशाची दिशा बदलतो तर कृत्रिमरित्या तयार केलेला रेणू मात्र हे परिवर्तन घडवून आणू शकत नव्हता. त्यांचे बाकीचे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म मात्र अगदीसारखेच होते. या रहस्यांचा उलगडा करतांना लुई पाश्चर यांनी नैसर्गिक टार्टारिक आम्लाच्या रेणूची स्फटिक रचना कृत्रिम टार्टारिक आम्लाच्या स्फटिक रचनेपेक्षा वेगळी असून त्यातील प्रमाणबद्धतेसाठी आवश्यक असलेल्या कार्बनच्या अणुमुळे या अणूची आरशातील प्रतिमा आणि त्या रेणूची रचना यांचे परस्परांवर अध्यारोपण होऊ शकत नाही. असे रेणू प्रकाशीय प्रतिसाद देतात आणि ध्रुवीकृत प्रकाश फिरवू शकतात. रेणूंच्या बहुरूपतेविषयी प्रथमच इतके सुस्पष्ट विवेचन पहिल्यांदाच दिले गेले होते.

*सूक्ष्मजीव शास्त्र*
लुई पाश्चर यांनी अनेक महत्त्वाचे शोध लावले. सूक्ष्मजंतू हे काही रोगांना तसेच कार्बनी (जैव) पदार्थांच्या किण्वनाला (आंबण्याला वा कुजण्याला) कारणीभूत असतात, हे त्यांनी सिद्ध केले.
जीवाची उत्पत्ति निर्जीव पदार्थांपासून होते असा समज त्या काळात प्रचलित होता. तत्कालीन समाजातील अनेक मान्यवर ह्या समजाचे खंदे पुरस्कर्ते होते. परंतु लुई पाश्चर यांनी आपल्या प्रयोगांनी ह्या समजामागील शास्त्रीय फोलपणा स्पष्ट केला आणि *जीवाची उत्पत्ती जीवापासूनच होते हे सिद्ध करून दाखविले.*

*पाश्चरीकरण प्रक्रिया*
फ्रान्स मधील व इतर देशांतील मद्यनिर्मिती व रेशीम उत्पादन या धंद्यांना पडत्या काळात आपल्या शास्त्रीय ज्ञानाचा उपयोग करून ऊर्जितावस्था आणण्यास ते कारणीभूत झाले.

त्रिमितीय रसायनशास्त्राचा पाया घालण्याच्या कार्यात त्यांनी महत्त्वाचा भाग घेतला होता. द्रव अन्न (उदा. दूध) आणि मादक पेये टिकाऊ बनविण्याकरिता तसेच त्यांमधील सूक्ष्मजंतूंचा नाश करण्याकरिता सौम्य उष्णता उपचाराची त्यांनी शोधून काढलेली पद्धत आजही त्यांच्या नावावरून ‘पाश्चरीकरण’ म्हणूनच संबोधिली जाते.

द्राक्षापासून अल्कोहोल बनविण्यासाठी त्या फळाच्या पृष्ठभागावर असलेल्या यीस्ट नावाच्या एकक पेशी जबाबदार असतात हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी उकळलेल्या द्राक्षांचे अल्कोहोल होत नाही हे दाखवून दिले. आपल्या एका साध्या प्रयोगाने लुई पाश्चर यांनी आपले म्हणणे सप्रमाण सिद्ध केले. बदकासारखी लांब मान असलेल्या काच पात्रात लुई पाश्चर यांनी उकळलेले खाद्य द्रावण ठेवले व त्या पात्राच्या मानेत कोणतेही सूक्ष्म कण न जातील अशी बारीक जाळीदार योजना करून त्यात फक्त हवा जाईल अशी व्यवस्था केली. ते खाद्य द्रावण कित्येक दिवस अगदी संपूर्णपणे निर्जंतुक राहिले. पण ते द्रावण उघड्या हवेला ठेवले तर मात्र जंतु, अळ्या, बुरशी यासारखे जीव त्यात वाढतांना दिसून आले. यावरून जीवाची उत्पत्ति जीवापासूनच होते हे सिद्ध झाले.

*किण्वन प्रक्रियेत यीस्ट महत्त्वाचे कार्य करतात आणि त्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता नसते हे त्यांनी प्रयोगाने सिद्ध केले.*

अल्कोहोल निर्मितीसाठी जशी यीस्ट ची गरज असते आणखी साखरेचे विघटन करून ही यीस्ट त्यापासून अल्कोहोल आणि कार्बनिक आम्ल तयार करते तशाच प्रकारे लॅक्टिक यीस्ट देखील असली पाहिजे असा एक निरीक्षणावर आधारित निष्कर्ष त्यांनी काढला. या यीस्टमुळे साखरेचे रूपांतर लॅक्टिक आम्लात होते. दुधाच्या आम्लीकरणात लॅक्टिक यीस्टच्या पेशी महत्त्वाचे कार्य बजावतात अशा स्वरूपाचा एक शोधनिबंध त्यांनी प्रसिद्ध केला. हे संशोधन चालू असतांना त्यांच्या असे लक्षात आले सूक्ष्मजीवांमुळे किण्वन प्रक्रियेत बाधा निर्माण होते आणि दूध नासणे, बियर आणि मद्य खराब होण्याससूक्ष्म जीवच जबाबदार असतात. या सूक्ष्म जीवांना दूर ठेवायचे असेल तर त्यासाठी दूध, बियर मद्य इत्यादी द्रव पदार्थ जर ६० ते १०० अंश सेल्सियसला तापविले तर हे सूक्ष्म जीव तग धरू शकत नाहीत आणि ह्या द्रव पदार्थांचे रक्षण होते. या प्रक्रियेला पाश्चरायझेशन असे संबोधले जाते. सूक्ष्मजीवांमुळे जसे दूध आणि इतर द्रव पदार्थ नासू शकतात तसेच या सूक्ष्म जीवांमुळे मानवी शरीराला देखील अपाय होऊ शकतो असा सिद्धांत त्यांनी मांडला आणि संसर्गजन्य रोग त्यामुळे आपल्याला माहिती झाले.

*सांसर्गिक रोग आणि लस*
अलर्क रोग (पिसाळ रोग), सांसर्गिक काळपुळी आणि कोंबड्यांतील पटकी या रोगांवरील प्रतिबंधक लस शोधून ती वापरणारे ते पहिले शास्त्रज्ञ होत.

*अँथ्रॅक्स आणी रेबीज ची लस*
लुई पाश्चर यांचे आणखी एक महत्त्वाचे संशोधन समस्त मानव जातीसाठी वरदान ठरले आहे. रेबीज आणि अँथ्रॅक्स या दोन रोगांवर त्यांनी प्रतिबंधक लशींची निर्मिती यशस्वीपणे केली होती. कोंबडयांच्या पिल्लांमध्ये कॉलरा यारोगाचा प्रादुर्भाव नेहेमी होत असतो. त्या रोगाच्या जीवाणूंना प्रयोगशाळेत वाढवून पाश्चर यांचे प्रयोग सुरु होते. अनवधानाने त्यातील काही कल्चर खराब झाले. ते टोचल्यानंतर कोंबडया आजारी पडल्या परंतु नंतर मात्र त्या अगदी ठीक झाल्या, एवढेच नव्हे तर त्यांना रोग निर्माण करणारे जंतू टोचले तरी त्यांना कॉलरा झाला नाही. यावरून त्या कोंबडयांच्या शरीरात रोग प्रतिकार शक्ती निर्माण झाली असा निष्कर्ष त्यांनी काढला. या निष्कर्षावर आधारित काम त्यांनी अँथ्रॅक्स जीवाणूंवर अशीच लस निर्माण करण्यासाठी केले आणि अँथ्रॅक्सवर लस उपलब्ध झाली

*रेबीज*
पिसाळलेले कुत्रे चावल्यानंतर होणाया हायड्रोफोबिया रेबीज या जीवघेण्या आणि दुर्धर रोगावर रामबाण ठरणारी लस हेपाश्चर यांच्या संशोधनाचेच फलित. ही लस तयार करतांना पाश्चर यांनी स्वतः पिसाळलेल्या कुत्र्याच्या तोंडातून लाळ काढली होती! ही लस वापरतांना देखील पाश्चर यांनी फार मोठा धोका पत्करला होता. जोसेफ मायस्टर नावाच्या एका ९ वर्षाच्या मुलावर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून त्याचे लचके तोडले होते. या मुलावर पाश्चर यांनी या लसीचा उपयोग केला आणि तो मूलगा आश्चर्यकारकरित्या बरा झाला.

*पाश्चर विद्यापीठ आणी संस्था*
लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्यत्व त्यांना प्राप्त झाले, त्यांना हॉलंडचा कला आणि विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा पुरस्कार म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्रातील ल्यूएनहॉक पदक मिळाले. त्यांच्या सन्मानार्थस्ट्रॉसबर्ग येथील विद्यापीठाचे पाश्चर विद्यापीठ असे नामांकन केले गेले.
त्यांनी सुरु केलेल्या संशोधन प्रयोगशाळेला सुद्धा पाश्चर संशोधन संस्था असे नाव दिले गेले आहे.