जुन्या पेंशन समितीच्या शिफारसी GPS योजनेऐवजी जुनी पेंशन योजना पुर्ववत लागू करण्याबाबत old penshan yojna
जुन्या पेंशनच्या समिती शिफारसीच्या GPS योजनेऐवजी म.ना.से.अधि. १९८२ व १९८४ अंतर्गत जुनी पेंशन योजना पुर्ववत लागू करण्याबाबत
महोदय,
मागील अनेक वर्षापासून दि. १ नोव्हेंबर २००५ रोजी नंतर शासन सेवेत नियुक्त कर्मचाऱ्यांना म.ना.से.अधि. १९८२ व १९८४ अंतर्गत जुनी पेंशन योजना पूर्ववत लागू करण्याची मागणी संघटनेद्वारे विविध आंदोलने करून केली जात आहे. मागील वर्षी नागपूर येथील राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशन दि.२७ डिसेंबर २०२२ रोजी दिड लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांनी पेंशन संकल्प यात्रा काढून राज्य शासनाच्या जुनी पेंशन विषयक आंदोलन केले होते. त्यानंतरच्या काळात मार्च २०२३ मध्ये राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप करून जुनी पेंशनची मागणी केली होती. त्यावेळी शासनाने जुनी पेंशन लागू करण्यासाठी समिती स्थापन करून तीन महिन्यात निर्णय घेऊ असे आश्वासित केले होते. नुकतेच दि.१२ डिसेंबर २०२३ ला नागपूर येथे विधानभवनावर तीन लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या उपस्थित पेंशन जनक्रांती महामोर्चा काढण्यात आला. त्यावेळी जुन्या पेंशनच्या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून जुनी पेंशन लागू करण्यासंबंधीत निर्णय घेऊ असे आश्वासित केले होते.
महाराष्ट्रातील १ नोव्हें.२००५ व त्यानंतर नियुक्त कर्मचारी व अधिकारी यांची एकमेव मागणी ही सरसकट जुनी पेंशन योजना अर्थात ‘महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ व महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण) १९८४’ तसेच भविष्य निर्वाह निधी (GPF) सह लागू करणे ही आहे.
आपण नेहमी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहात. तरी राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना म.ना.से.अधि. १९८२ व १९८४ अंतर्गत जुनी पेंशन योजना पूर्ववत लागू करण्यासंबंधीत आपण योग्य ती कार्यवाही करावी, हि विनंती.