राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा NCF-2020 pdf राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ncf national curriculum
राज्य अभ्यासक्रम आराखड्याबद्दल…
राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण
भारत सरकारने २०२० मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले. त्या धोरणानुसार सन २०२३ मध्ये राष्ट्रीय शालेय शिक्षणाचा आराखडा प्रसिद्ध केला. हा आराखडा केंद्र शासनाच्या पायाभूत अभ्यासक्रमाच्या आराखड्याशी सुसंगत असाच होता. महाराष्ट्र शासनाने देखील केंद्र शासनाच्या पायाभूत अभ्यासक्रम आराखड्यानुसार महाराष्ट्राच्या गरजा, वैशिष्ट्ये व सदयः स्थिती विचारात घेऊन, पायाभूत अभ्यासक्रमाचा आराखडा तयार केला, साहजिकच शालेय अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करणे आवश्यक झाले.
हा अभ्यासक्रम आराखडा, आपल्या येथील संपूर्ण शालेय शिक्षणाचा अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी मार्गदर्शक ठरणार असल्याने तो तितकाच दर्जेदार व्हावा या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षणतज्ज्ञांच्या मदतीने हा आराखडा करण्याचे ठरविले. केंद्र शासनाने तयार केलेल्या अभ्यासक्रमाला प्रमाण मानून व तरीही महाराष्ट्राच्या गरजा, वैशिष्ट्ये, परंपरा या विचारात घेऊन हा आराखडा तयार करण्याचे निश्चित केले.
अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यासाठी विविध शालेय विषय त्याबरोबरच आंतरविद्याशाखीय विषय तसेच असे विषय की जे सर्वच विषयातून शिकविले जावेत अशा विविध घटकांचा विचार करून एकूण अकरा गटामध्ये तज्ज्ञांच्या साहाय्याने त्या त्या गटाचा अभ्यासक्रम आराखडा तयार केला गेला. हे करीत असताना केंद्रीय अभ्यासक्रम आराखड्यातील कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली. यासाठी गरजेनुसार कार्यशाळा घेऊन अत्यंत बारकाईने हे काम केले गेले.
हा आराखडा म्हणजे केवळ केंद्र शासनाच्या अभ्यासक्रम आराखड्याचे भाषांतर किंवा रुपांतर नाही, तर महाराष्ट्रातील जनतेच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब पडावे म्हणून हा आराखडा जनतेसमोर ठेवून तज्ज्ञांच्या सूचना मागविण्यात आल्या. या सर्व सूचनांचे विश्लेषण करून त्यांचे यथायोग्य ठिकाणी समावेशन करण्यात आले. त्यामुळे हा आराखडा खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्याच्या अभ्यासक्रमाचा आराखडा झालेला आहे.
या आराखड्याचा उपयोग अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी होणार असल्याने संबंधितांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक ठरते. महाराष्ट्र राज्याच्या गरजा, आपल्या परंपरा, महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती, ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी, महाराष्ट्रातील विविधता, तसेच महाराष्ट्राचे देश पातळीवरील आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक योगदान यांचे प्रतिबिंब अभ्यासक्रमात व पाठ्यपुस्तकात दिसावे अशी अपेक्षा आहे. यासाठी हा अभ्यासक्रम आराखडा निश्चितच मार्गदर्शक ठरेल. अगदी उदाहरणच दयायचे तर भाषेसारख्या विषयामध्ये संत वाङ्मयाचा समावेश, इतिहासामध्ये स्थानिक परिसराचा उल्लेख, विविध गड, किल्ले यांचा उल्लेख, आंतरविद्याशाखीय विषयांमध्ये महाराष्ट्रातील उदाहरणे घेता येतील. विज्ञानासारख्या विषयामध्ये देखील महाराष्ट्रातील शास्त्रज्ञांची परंपरा सांगता येईल तसेच विविध विज्ञान संस्थांचा परिचय देता येईल. कलेच्या क्षेत्रामध्ये अत्यंत दिग्गज कलावंताचा व सांस्कृतिक केंद्रांचा परिचय देता येईल.
या आराखड्याच्या साहाय्याने अत्यंत दर्जेदार अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके तयार होतील याबद्दल विश्वास वाटतो.