प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत निश्चित केलेल्या पाककृतींमध्ये सुधारणा mid day meal pakakruti 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत निश्चित केलेल्या पाककृतींमध्ये सुधारणा mid day meal pakakruti 

वाचा:-

१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०१०/प्र.क्र.१८/प्राशि.४, दि.०२/०२/२०११.

२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०२२/प्र.क्र.११८/एस.डी.३, दि.१५/११/२०२२.

३) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना क्र.DO NO.१-३/२०२२-DESK (PM-POSHAN), दि. २१/१२/२०२२.

४) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०२२/प्र.क्र.११७/एस.डी.३, दि.१५/०३/२०२३.

५) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०२२/प्र.क्र.११७/एस.डी.३, दि.११/०६/२०२४.

प्रस्तावना:-

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. सदर योजनेतंर्गत इ.१ ली ते ५ वीच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिने युक्त तसेच इ.६ वी ते इ.८ वीच्या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. तसेच, शासन निर्णय दि.०२ फेब्रुवारी, २०११ मधील तरतूदीनुसार तांदूळापासून बनविलेल्या पाककृतीनुसार पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत होता. तथापि, विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात विविधता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार पध्दतीप्रमाणे (Three Course Meal) म्हणजेच तांदूळ, डाळी / कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व नाचणीसत्व यांचा समावेश करुन नविन पाककृती शासन निर्णय दि.११ जून, २०२४ अन्वये निश्चित करण्यात

आली होती. तथापि, तीन संरचित आहार पध्दतीप्रमाणे पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी क्षेत्रिय स्तरावर विविध अडचणी येत असल्यामुळे सदर पाककृतींमध्ये सुधारणा करण्याकरिता मा. लोकप्रतिनिधी, केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे आहाराचा पुरवठा करणाऱ्या नागरी भागातील संस्था/बचत गट, योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या संघटनांची निवेदने शासनास प्राप्त झाली आहेत. सदर निवेदने व केंद्र शासनाने निश्चित केलेला प्रति दिन प्रती विद्यार्थी आहार खर्चाची मर्यादा विचारात घेता, शासन निर्णय दि.११ जून, २०२४ मध्ये नमूद केलेल्या आहार पध्दतीत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

१) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे १२ प्रकारच्या पाककृतींच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर पाककृतींचा तपशील सोबत जोडलेल्या परिशिष्ट “अ” प्रमाणे राहील.

२) विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहारात वैविध्यता आणण्याच्या दृष्टीने उपरोक्त

तक्त्यातील अनु.क्र.१ ते १० पाककृती वेगवेगळ्या दिवसासाठी निश्चित करण्यात याव्यात. तसेच, प्रस्तुत अनु.क्र.१ ते १० पैकी कोणत्याही दोन अतिरिक्त पाककृतीची निवड करुन विद्यार्थ्यांना दोन आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ देण्यात यावेत.

३) उपरोक्त पाककृतींमधील अनु.क्र.११ (अंडा पुलाव) व अनु.क्र.१२ (गोड खिचडी/नाचणी सत्व) या पाककृती पर्यायी स्वरुपात देण्यात येत आहे. केंद्र शासनाने स्नेह भोजनाव्दारे योजनेंतर्गत लोकसहभाग वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शाळा

व्यवस्थापन समितीने सदर दोन पाककृतीचा लाभ व अन्य पाककृतीसाठी आवश्यक असणारी साखर लोकसहभागातून देण्याचा प्रयत्न करावा. याकरिता शासनाकडून कोणताही अतिरिक्त निधी उपलब्ध करुन देण्यात येत नाही.

४) परिशिष्ट “अ” मध्ये पाककृतीनिहाय दर्शविण्यात आलेले खाद्यपदार्थ व त्यांचे प्रमाण हे एका विद्यार्थ्यांसाठी एका दिवसाच्या आहारासाठी केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार आहे.

५) सदर योजनेंतर्गत पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना वेगवेगळया पदार्थाचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने पाककृती निर्धारित केल्या आहेत. त्यानुषंगाने आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणती पाककृती निश्चित करावयाची याबाबत संबंधित जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समितीव्दारे निर्णय घ्यावा. तसेच, मुंबई महानगरपालिका क्षेत्राकरीता शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निर्णय घ्यावा. प्रस्तुत समितीने घेतलेल्या निर्णयानुसारच विद्यार्थ्यांना आहार देणे आवश्यक राहील.

६) सदर विषयाच्या अनुषंगाने शिक्षण संचालक (प्राथ.), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या स्तरावरुन परिपत्रकान्वये आवश्यक त्या सविस्तर सूचना निर्गमित करण्यात याव्यात.

(७) प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०१२८१७५०३९३७२१ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Join Now