EBC,EWS,SEBC,OBC प्रवर्गातील विद्यार्थी/विद्यार्थीनींकडून प्रवेशाच्यावेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेणेबाबत educational shulk
आर्थिकदृष्ट्या मागास (EBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) व इतर मागासवर्ग (OBC) प्रवर्गातील पात्र विद्यार्थी व विद्यार्थीनींकडून प्रवेशाच्यावेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेणेबाबत…
शासन परिपत्रक : उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत विविध मान्यताप्राप्त व्यावसायिक व बिगर व्यावसायिक
अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रकियेद्वारे / विहित पध्दतीने प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागास (EBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) व इतर मागासवर्ग (OBC) प्रवर्गातील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येते. आतापर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या वरील प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना (मुले व मुली) शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या ५० टक्के रक्कमेची प्रतिपूर्ती करण्यात येत होती. परंतु, उपरोक्त वाचा क्र.०३ येथील शासन निर्णयान्वये, व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित वरील प्रवर्गातील मुलींना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून ५० टक्के ऐवजी १०० टक्के शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. २. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या विद्यार्थ्यांना १०० टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे, त्या
पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्यावेळी शिक्षण शुल्काची रक्कम भरण्याचा आग्रह करण्यात येऊ नये. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना ५० टक्के शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे, त्या पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना ५० टक्के शुल्क भरल्यास त्यांना प्रवेश देणे क्रमप्राप्त आहे. अशा पध्दतीने शिक्षण संस्थांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची संपूर्ण रक्कम भरावी, असा आग्रह धरल्यास किंवा मागणी केल्यास अशा संस्थांविरुध्द कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारच्या सूचना वाचा क्र.०२ येथील परिपत्रकान्वये यापूर्वी दिलेल्या आहेत. असे असतानाही राज्यातील काही शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना प्रवेश देताना प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्क भरण्याचा आग्रह धरत असल्याच्या किंबहुना शुल्क भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश देत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थी, पालक, विविध संघटना व लोकप्रतिनिधी यांच्याकडून प्राप्त होत आहेत.
३. वरील पार्श्वभूमीवर आर्थिकदृष्ट्या मागास (EBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) व इतर मागासवर्ग (OBC) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश देताना, त्यांच्याकडून शिक्षण शुल्क न आकारण्याबाबत शैक्षणिक संस्थांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत:-
१) सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या तसेच, विहित मार्गाने बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या वरील प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थीनींना १०० टक्के शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे, त्यांचेकडून प्रवेशाच्यावेळी कोणतेही शिक्षण शुल्क न आकारता त्यांना प्रवेश देण्यात यावा. ज्या विद्यार्थ्यांना ५० टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे, त्यांचेकडून फक्त ५० टक्के शिक्षण शुल्क घेऊन, त्यांना प्रवेश देण्यात यावा.
२) शैक्षणिक संस्थांनी योजनेबाबतची माहिती सर्व विद्यार्थ्यांना देऊन, संबंधित योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या वेळापत्रकानुसार अर्ज भरण्याबाबत कळवावे.
४. आर्थिकदृष्ट्या मागास (EBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) व इतर मागासवर्ग (OBC) या प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काच्या रकमेचा भरणा करावा.
५. संबंधित संचालनालयाने परीक्षा शुल्काची रक्कम योजनेंतर्गत अर्ज भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या आधार- संलग्नित बँक खात्यात थेट जमा करावी. तसेच, शिक्षण शुल्काची अनुज्ञेय रक्कम संस्थेच्या बँक खात्यात थेट जमा करावी. प्रवेशाच्यावेळी संस्थांनी विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्काचा भरणा करुन घेतला असल्यास, सदर रक्कम संस्थेने विद्यार्थ्यांना परत करावी.
६. वरील सूचना संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई, संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे व संचालक, कला संचालनालय, मुंबई यांनी त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व शिक्षण संस्थांच्या तसेच, विद्यापीठांच्या निदर्शनास आणून, त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश द्यावेत. सदर सूचनांचे पालन न करणाऱ्या संस्थांना समज द्यावी व आवश्यकता वाटल्यास सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांविरुध्द कारवाई करावी.
७ . संबंधित संचालकांनी सदर परिपत्रकास सर्व प्रसिध्दी माध्यमांद्वारे व्यापक प्रसिध्दी द्यावी. तसेच, संचालनालयांच्या संकेतस्थळावर हे परिपत्रक प्रसिध्द करावे.
८. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक २०२४०७१९१८५७३३५४०८ असा आहे. सदर परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने