अर्जित रजेचे रोखीकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करणेबाबत arjit rajeche rokhikaran
वाचा:-१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक:-वेतन-१२२१/प्र.क्र.११६/टीएनटी-३, दिनांक ०४.०५.२०२२
पूरकपत्र :-उपरोक्त शासन निर्णय दिनांक ०४.०५.२०२२ मधील परिच्छेद क्र. २ नंतर खालील परिच्छेद
वाचावा :-

महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील नियम १६ मधील खालीलप्रमाणे पोटनियम क्र. १८ (अ) व २९ येथे नमूद कर्मचा-यांनाच रजा रोखीकरण लागू राहील.
“१८(अ) जर माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाव्यतिरिक्त (परंतु उप-मुख्याध्यापकासहित) एखादा स्थायी कर्मचारी मोठया सुट्यांना हक्कदार असूनही एखाद्या वर्षात पूर्ण मोठया सुट्यांचा किंवा त्यांच्या एखाद्या भागाचा लाभ घेण्यात प्रतिबंध झालेला असेल तर, त्याबद्दल त्याला पूर्ण सुटीशी त्याने सुटीच्या न उपभोगलेल्या दिवसांच्या संख्येचे जे प्रमाण असेल त्या प्रमाणात वार्षिक ३० दिवसांच्या अर्जित रजेशी प्रमाणशीर असलेल्या संख्याऐवढी अर्जित रजा अनुज्ञेय राहील”.
“(२९) ज्याला पोट-नियम (१८) च्या तरतूदी लागू आहेत असा कर्मचारी धरुन नियत वयोमानामुळे सेवानिवृत्त होणारा कोणीही कर्मचारी, सेवानिवृत्तीच्या वेळी त्याच्या खाती ३०० दिवस इतक्या कमाल मर्यादेपर्यंत जितकी अर्जित रजा शिल्लक असेल तेवढया रजेच्या बाबतीतील रजावेतनाइतकी रोख रक्कम मिळण्यास पात्र असेल.”
२.उक्त शासन निर्णयातील परिच्छेद क्र. ३ वगळण्यात येत आहे.
३. सदर शासन पूरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०२२७१२०८०४२३२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,