गलेलठ्ठ पगार घेतात पण कर्तव्य बजावत नाहीत; शिक्षकांवर पुन्हा निशाणा shikshakanvar nishana
आ.बंब यांचा कामचुकार शिक्षकांवर पुन्हा निशाणा
गंगापुर प्रतिनिधीः भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी पुन्हा एकदा कामचुकार शिक्षकांवर टीकास्त्र सोडले आहे. राज्यातील शाळांतील शिक्षक मुख्यालयी थांबत नसल्यावर प्रकाश टाकत त्यांनी शिक्षक खोटी कागदपत्रे देऊन शासनाकडून विनाकारण पैशांची लूट करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. १० ते ४ या वेळेत शिकवण्याचे केवळ शिक्षकांचे काम नाही, तर त्यांनी २४ तास गावात संस्कार आणि व्यसनमुक्तीचे काम करावे. शिक्षक त्यांची कर्तव्ये बजावत नाहीत, असे बंब म्हणाले.
आ. बंब म्हणाले, की मी ७-८ वर्षांपासून राज्यातील सरकारी शिक्षणाची दुरवस्था मांडतोय. देशातील पिढी घडवण्याची सर्वात मोठी जबाबदारी शिक्षकांची आहे. त्यामुळेच शिक्षकांना गलेलठ्ठ पगार दिला जातो. आजही त्यांना विनंती
करतो की गावात जाऊन मुक्कामी राहावे. मी दर्जे दार शिक्षणसाठी मोहीम हाती घेत असून, कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळायला हवे, असे माझे मत आहे. त्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून प्रयत्न करणार आहे. वेळप्रसंगी शिक्षकांवर कठोर कारवाई करायलाही शासनाला भाग पाडणार, असा इशाराही त्यांनी कामचुकार शिक्षकांना दिला. शिक्षकांची मुले ज्या खासगी शाळेत शिकतात त्या शाळांतील शिक्षकांना १५ हजारसुद्धा पगार नसतो. मात्र सरकारी शाळेतील शिक्षकांना ६० हजार ते दीड लाखांपर्यंत पगार असतो, असे बंब यांनी सांगितले. शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन दर्जेदार शिक्षणासाठी पावले उचलणार असल्याचे ते म्हणाले.