राज्यातील १५ हजार शाळा बंद होणार : शाळा बचाव समिती आंदोलनाच्या पावित्र्यात zilha parishad school
नीरज आवंडेकर, अकोला राज्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद आणि खासगी मिळून सुमारे १५ हजार शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. एकट्या विदर्भात अशा शाळांची संख्या ३ हजार ५२३ इतकी आहे. यासंदर्भात तातडीने पाऊले उचलण्यात न आल्यास हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका व्यक्त होत आहे.
सरकारी शाळांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तळागाळात शिक्षणाचा प्रवाह पोहचविला जातो. या शाळाच बंद होत असल्याने शिक्षण व्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बंद होणाऱ्या विभागनिहाय शाळांमध्ये मराठवाड्यात औरंगाबाद ३४७, नांदेड ३९४, हिंगोली ९३, परभणी १२६, जालना १९०, बीड ६३३, लातूर २०२, उस्मानाबाद १७८; खान्देशमध्ये जळगाव १०७, धुळे ९२, नंदुरबार १९२; पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर ३४२, सातारा १४०, रत्नागिरी १,३७५, सिंधुदुर्ग ८३५, कोल्हापूर ५०७, सांगली ४१५, पालघर ३१७; मुंबई उपनगरांतील ८६, मुंबई-२मधील ३१, ठाणे ४४१, रायगड १,२९५, पुणे १,१३२, पुणे १,१३२, नाशिक ३३१ आणि अहमदनगरमधील ७७५ शाळांचा समावेश आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी अकोल्यामध्ये शाळा बचाव समितीची स्थापना करण्यात आली. शाळा बचाव समितीचे पदाधिकारी गावोगावी भेटी देऊन, जनजागृती
करीत आहेत. विद्यार्थी संख्या कशी वाढवली जाईल, शाळा टिकवण्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करीत आहेत. प्रसंगी जनआंदोलन उभारण्याचाही इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील पंचायत समितीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पातूरमध्येही दुसरी बैठक घेण्यात आली. या बैठकीला सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गावंडे यांच्यासह शाळा बचाव समितीचे पदाधिकारी गजानन हरणे, जयदीप सोनखास्कर, विजय कौसल, दिनेश काठोके,सुरेश मेश्राम, राजेश देशमुख, व शशिकांत गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.