रुब्रिक म्हणजे काय? what is rubrika
रुब्रिक या शब्दाची शैक्षणिक अंगाने केलेली व्याख्या कोणत्याही शब्दकोषात उपलब्ध नाही. ‘लाल रंगाने अधोरेखित केलेले किंवा लाल रंगात लिहिलेला संदेश’ असा काहीतरी अर्थ वाचायला मिळतो. ज्यातून नव्या संदर्भातील ध्वनित असणारा अर्थ किंवा त्याचे अपेक्षित उत्तर पण व्यक्त होत नाही. यातून रुब्रिकद्वारे काहीतरी महत्त्वाचे अधोरेखित केले जात असते, एवढेच समजते. ‘मेरियम वेबस्टर’ या डिक्श्नरीमध्ये ‘विद्यार्थ्यांच्या लेखी कामगिरीबद्दल, प्रकल्प किंवा चाचणीमधील संपादणुकीची प्रतवारी ठरवण्याकरिताचे निश्चित निकष देणारे मार्गदर्शक’ असा अर्थ व्यक्त करण्यात आला आहे. जो मूल्यमापनातील अपेक्षित व्याख्येशी जुळणारा आहे.
‘रुब्रिक’ हे एक विशिष्ट प्रकारचे मूल्यमापनाचे साधन आहे किंवा ती एक मार्गदर्शकाची यादी आहे. सातत्याने अध्ययनातून व्यक्त करण्यात आलेल्या अपेक्षा आणि अध्ययनाची उद्दिष्टे किंवा वर्गातील अध्ययनाची गुणवत्ता ठरवण्यासाठी किंवा संपादणुकीच्या मोजमापाची प्रतवारी निश्चित करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण निकषांची यादी असे रुब्रिकचे स्वरूप आहे. रुब्रिकद्वारे विद्यार्थ्यांकडून निश्चित अशा संपादणुकीचे अपेक्षित बदलांचे व त्याकरिता आवश्यक अशा निकषांचे सूचना देणारे साहित्य म्हणून पाहायला पाहिजे.
अपेक्षित संपादणुक व कामगिरीचे यथार्थ वर्णन रुब्रिकमध्ये केलेले असते. तसेच, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये दिलेल्या स्वाध्यायामध्ये मूल्यमापनाबाबत सारखेपणा, समानता राखण्यात रुब्रिकमध्ये दर्शविण्यात येणारे निकष उपयुक्त ठरणार आहेत. संपादणुकीच्या कोणत्या पातळीपर्यंत, टप्प्यापर्यंत, स्तरापर्यंत विद्यार्थ्यांने प्रगती केली आहे, हे रुब्रिकमध्ये निश्चित करण्यात आलेल्या, पूर्वनियोजित अपेक्षांच्या पायरींमुळे तपासणे शक्य होणार आहे. रुब्रिक म्हणजे विद्यार्थ्याने केलेल्या कामाबाबत त्याच्या संपादणुकीच्या स्तराच्या गुणवतेसंदर्भातील सर्वंकष असा निकषांचा गट.
रुब्रिक निश्चित करीत असताना उद्दिष्टांनुसार कोणत्याही कृतीबाबत संपादणुकीचा अत्यंत खालील स्तर निश्चित करतात. त्यानंतर संपादणुकीचे विविध स्तर ठरवून मग त्या उद्दिष्टांबाबतची किंवा कृतीबाबतची सर्वोत्तम कामगिरी कशाला संबोधायचे, ते ठरवले जाते. संपादणुकीतील अंतिम प्रावीण्य गाठण्यापूर्वी विद्यार्थी हा संपादणुकीच्या विविध टप्प्यांमधून जात असतो. तो संपादणुकीच्या कोणत्या टप्प्यावर आलेला आहे आणि त्याला पुढे कोणता टप्पा, पायरी गाठायची आहे हे निश्चितपणे समजते. अर्थात रुब्रिक हे एक प्रकारचे विद्यार्थी संपादणुकीबाबतचा दर्शक आहे.
अशा प्रकारे साध्य करण्याच्या कोणत्याही उद्दिष्टांबाबत निकृष्ट स्तरापासून ते उच्चतम स्तरापर्यंतच्या सातत्यपूर्ण प्रवासाला रुब्रिक असे संबोधता येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीचा अहवाल देत असताना केवळ गुण मिळतात, ज्याचा अर्थ काय हे कुणीही समजून घेत नाही आणि देत नाही. तसेच, ग्रेड म्हणून दिले जाणारे शेरेपण विद्यार्थ्यांना निश्चित असे काहीच मार्गदर्शन करू शकत नाही. म्हणूनच रुब्रिकची आवश्यकता आहे.
रुब्रिक निश्चित करीत असताना निकष ठरवले जातात. त्याचे विषलेष्णात्मक वर्णन केले जाते व त्यास अंकरूपी गुणपण निश्चित केले जातात. संपादणुकीचे वर्णन केवळ अंकरूपी गुणांत करून चालत नाही. त्यामुळे त्याला आपण प्रगतीबाबत नक्की कोठे येऊन पोहोचलो आहोत, हे समजतच नाही. संपादणुकीबाबत अंक काय दर्शवितात, हे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत मूल्यमापनाचा परिणाम दर्शविणारे कोणतेही समर्थ साधन निर्माण होणार नाही. त्यातून साध्य असे काहीच होणार नाही. म्हणूनच रुब्रिकची शालेय मूल्यमापनात नितांत आवश्यकता आहे. मूल्यमापनाचे एक साधन म्हणून रुब्रिक हे केवळ योग्य, की अयोग्य एवढेच सांगत नाही, तर संपादणुकीबाबत विस्तृत तपशीलवार वर्णन करते.