‘अनफिट’ आहे म्हणून नोकरीतून काढता येत नाही : ‘मॅट’चा निर्वाळा : निवृत्तीपर्यंत सर्व लाभ देण्याचे आदेश unfit servant
लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : नोकरीत असताना एखादा कर्मचारी अपघातामुळे अनफिट झाल्यास त्याला नोकरीतून काढून टाकता येत नाही, तर तो सेवेत आहे असे समजून त्याला सेवानिवृत्तीपर्यंत सर्व लाभ देणे बंधनकारक ठरते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुन्हेकर यांनी ९ जून रोजी दिला आहे.
चनबसय्या संगमठ असे या प्रकरणातील याचिकाकर्त्यांचे नाव – आहे. ते सोलापूर जिल्ह्यातील सदरबाजार पोलिस ठाण्यात नायक पोलिस शिपाई पदावर कार्यरत होते. खाजगी कामाने संगमठ हे रजेवर होते. दरम्यान, देवदर्शन करून परत येताना २८ ऑक्टोबर २०२२ ला अपघात झाला. त्यात पत्नी व ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, त्यांना काम करता
शक्य नव्हते म्हणून सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात त्यांची नेमणूक करण्यात आली. त्यातच त्यांना पक्षाघाताचा (पॅरालिसिस) झटका आला. त्यांना मेडिकल बोर्डापुढे पाठविले गेले. तेव्हा बोर्डाने त्यांना अनफिट हाच आधार घेऊन सोलापूरच्या पोलिस आयुक्तांनी त्यांना नोकरीवरून काढून टाकले. पेन्शन देण्याची तयारी दर्शवून तसा आदेश जारी केला गेला. अखेर संगमठ यांनी या निर्णयाविरोधात अॅड. अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत मुंबई मॅटमध्ये आव्हान दिले. तेथे अपंग
कायद्यावर खल झाला.
या प्रकरणात संगमठ यांच्या वतीने कुणालसिंग प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला दिला गेला. अखेर मॅटने संगमठ यांना दिलासा देत त्यांचा १८ नोव्हेंबर २०२२ चा इनव्हॅलिड पेन्शनचा आदेश रद्द केला. पेन्शन रूलच्या कलम २० (४) नुसार सरकारी कर्मचारी निवृत्तीपर्यंत नोकरीत आहे असे ग्राह्य धरावे, ते २४ तास नेमणुकीवर असतात असे समजावे, असे स्पष्ट करीत संगमठ यांना सेवानिवृत्त होईपर्यंत सर्व आर्थिक लाभ देण्याचे आदेश जारी केले. शासनाच्या निर्णयाचा एवढ्या सूक्ष्म पद्धतीने अर्थ लावू नये, असेही मॅटने बजावले. याप्रकरणात याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड. भूषण बांदिवडेकर, अॅड. गौरव बांदिवडेकर यांनी सहकार्य केले.
कायदा काय म्हणतो…
केंद्र शासनाच्या १९९५ व २०१६ च्या कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले गेले आहे. कर्मचारी अनफिट असेल तर त्याला नोकरीवरून काढता येत नाही, त्याला हलकी कामे देण्याची तरतूद आहे, शक्य नसेल तर त्याला अतिरिक्त पदावर सामावून घ्यावे, निवृत्तीपर्यंत तो सेवेत आहे असे समजून त्याला घरबसल्या पगार देण्याची तरतूद असल्याकडे मॅटचे लक्ष वेधले गेले.
म्हणे, कर्तव्यावर नसताना अपघात झाला
शासनातर्फे सादरकर्ता अधिकारी क्रांती गायकवाड यांनी सांगितले की, संगमठ हे अॅक्टिव्ह ड्यूटीवर कार्यरत नव्हते, ते कर्तव्यावर नसताना अपघात झाला आहे. म्हणून त्यांना केंद्राच्या कायद्यानुसार लाभ देता येणार नाही. मात्र, मॅटने हा युक्तिवाद फेटाळून लावला.