राज्यातील सर्व शिक्षक संवर्गासाठी पेहरावासंदर्भात मागदर्शक सूचना निर्गमित करणे व शिक्षकांच्या संबोधनाबाबत teachers’ uniform shasan paripatrak 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील सर्व शिक्षक संवर्गासाठी पेहरावासंदर्भात मागदर्शक सूचना निर्गमित करणे व शिक्षकांच्या संबोधनाबाबत teachers’ uniform shasan paripatrak 

शासन परिपत्रक:-

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी, अल्पसंख्याक, इत्यादी सर्व व्यवस्थापना अंतर्गत अनुदानित/अंशतः अनुदानित/विनाअनुदानित/स्वयंअर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्यांक व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या व सर्व बोर्डाच्या शाळांतील कार्यरत शिक्षक हे भावी पिढी घडवीत असतात. तसेच, जनमानसात त्यांचेकडे गुरु/मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते. या शिक्षकांचा संबंध हा विद्यार्थी, पालक, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती व लोकप्रतिनिधी यांचेशी येत असतो. तसेच त्यांचे सोबत संवाद होत असतो. अशा वेळी त्यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणून पाहिला जातो. संबंधितांच्या वेशभूषेवरुनच ते कार्यरत असलेल्या पदाची एक विशिष्ट छाप पडत असते. त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करीत असताना वेशभूषेबद्दल जागरुक राहून आपली वेशभूषा ही आपल्या शाळेस व पदास किमान अनुरुप ठरेल, याची सर्वतोपरी काळजी घेणे अभिप्रेत आहे. सामान्यतः विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे जर शिक्षकीय पदाची वेशभूषा ही अशोभनीय, अव्यवस्थित किंवा अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या एकंदरीत व्यक्तीमत्वावर तसेच, त्यांचेसमोर अध्ययन करणाऱ्या विद्यार्थी यांचेवर होत असतो. ही बाब विचारात घेता, राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांकरीता दैनंदिन पेहराव कशा पध्दतीचा असावा याबाबत पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत :-

१) सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हा शिक्षकीय पदास अनुसरुन असावा.

२) सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा, जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार/चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पध्दतीने पेहराव करावा. तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर पॅन्ट, शर्ट इन करुन परिधान केलेला असावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले पेहराव परिधान करु नयेत. तसेच शिक्षकांनी जीन्स व टी-शर्ट चा वापर शाळेमध्ये करु नये.

३) परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा, याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी.,

४) उक्त प्रमाणे नमूद केल्यानुसार शाळेने सर्व शिक्षकांकरिता एकच ड्रेस कोड ठरविण्यात यावा.

५) पुरुष व महिला शिक्षकांकरीता परिधान करावयाच्या पेहरावाचा रंग कोणता असावा हे संबंधित शाळेने निश्चित करावे,

६) पुरुष शिक्षकांनी परिधान करावयाच्या शर्टचा रंग हा फिकट असावा व पॅन्टचा रंग गडद असावा.

७) महिला व पुरुष शिक्षकांनी पोषाखाला शोभतील अशी पादत्राणे (उदा. पुरुषांनी शूज) यांचा वापर करावा.

८) स्काऊट गाईड च्या शिक्षकांना स्काऊट गाईडचेच ड्रेस राहतील.

९) वैद्यकीय कारण असेल तर पुरुषांना/महिला शिक्षकांना बूट (शूज) वापरण्यातून सवलत देण्यात यावी.

०२. राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांच्या नावापूर्वी इंग्रजी भाषेत “Tr.” तर मराठी भाषेत “टि” असे संबोधन लावण्यात यावे. तसेच, यासंदर्भातील बोधचिन्ह आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सुनिश्चित करुन त्यास यथोचित प्रसिद्धी देण्यात यावी. सदर संबोधन व बोधचिन्ह शिक्षकांना त्यांच्या वाहनावर लावता येईल.

०३. सदर सूचना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित/अंशतः अनुदानित/विनाअनुदानित/स्वयंअर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्यांक व्यवस्थापनाच्या सर्व बोर्डाच्या व सर्व माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांना लागू राहतील.

०४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२४०३१५१८१२३३५५२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Join Now