जिल्हा परिषद शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्यांची पंतप्रधानांकडे तक्रार teacher transfer complaint
छत्रपती संभाजीनगर, दि. ४ (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या, नियमबाह्य दुरुस्त्या, नियमबाह्य प्रतिनियुक्त्या करण्यात आल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाने केलेल्या चौकशीनंतर सिद्ध झालेले असताना संबंधितांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करीत महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीने थेट पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडे दाद मागितली आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केलेल्या शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करीत आदर्श शिक्षक समितीचे संस्थापक दिलीप ढाकणे, राज्याध्यक्ष शिवाजीराव साखरे, राज्य महासचिव अंजूम पठाण यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्याची चौकशी करून यामध्ये अनियमितता झालेली असल्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, असे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले. परंतु, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी कसलीही कारवाई केली नसल्याचा आरोप शिक्षक समितीने केला होता. दरम्यान, कारवाई होत नसल्यामुळे दिलीप ढाकणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय शिक्षणमंत्री, केंद्रीय सतर्कता आयोगाकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.