‘झेडपी’त गुरुजींच्या बदल्यांचाही खेळ teacher request transfer
अहमदनगर, ता. २९: जिल्हा परिषदेचा महत्त्वाचा कणा म्हणजे शिक्षक. अकरा हजार शिक्षकांवर शिक्षण विभागाचा भार आहे. शालाबाह्य कामांनी पिचलेल्या गुरुजींना रोज नव्या संकटांना सामोरे जावे लागते. बहुतांशी गुरुजी कुटुंबापासून दूरवर कर्तव्य बजावत आहेत. रायगड, सातारा, सांगली, रत्नागिरी, परभणी, सिंधुदुर्गात बदल्यांची प्रक्रिया पार पाडली. इथे मात्र, बदल्यांच्या अध्यादेशाचा किस पाडण्याचे काम सुरू आहे.
जिल्ह्यात बदल्यांची प्रक्रिया राबवली गेली नसल्याने शिक्षकांच्या सर्वच संघटनांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे दाद मागितली; परंतु याबाबत कोणतीच कार्यवाही झालेली
दिसत नाही. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत उद्यापासून दोन बदल्यांची प्रक्रिया राबवली जाणार आहे. मग अहमदनगर जिल्हा परिषदेला वेगळा अध्यादेश आहे काय, असा सवाल केला जात आहे.
एक तर निवडणूक आचारसंहितेमुळे गुरजीच्या बदल्या लांबल्या. शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे अर्ध्या महाराष्ट्राने बदली प्रक्रिया राबवली असताना नगरमध्ये वाट पाहण्याचे काम सुरू आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही बदली प्रक्रिया राबवायची असते. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या १२५ शिक्षकांना समुपदेशनाने बदल्या मिळाल्या. मात्र, जिल्हांतर्गत बदल्या
लटकल्या आहेत.
जिल्ह्यातील ३ हजार ८६० शिक्षकांनी बदल्यांसाठी अर्ज केले आहेत. त्यातील किती बदली पात्र आहेत, हा भाग वेगळा ही विनंती बदल्यांची प्रक्रिया आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी ठरवले, तर जास्तीत जास्त शिक्षकांना न्याय मिळू शकतो. अगोदर पदोन्नती प्रक्रिया राबवल्यास जास्त जागा रिक्त राहतील. सध्या २६७ जागा रिक्त असल्याचे सूत्रांनी सांगितले. पवित्र पोर्टलमधून काहींना
नियुक्त्या दिल्या आहेत. कमी पटाच्या शाळांवरील कोणी घेणार नाही, हेही तितकेच खरे. अर्ज केलेल्यांना तो माघारी घेण्याची संधी दिल्यास कमी अर्ज राहतील. त्यामुळे जास्त शिक्षकांना
संधी मिळू शकते, असे शिक्षण संघटनांचे म्हणणे आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही.
घ्यायची असेल. त्यांना तो हक्क द्यावा. १५ ऑगस्टपूर्वी
आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करावी.
– बबन गाडेकर, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ.
बदल्यांसाठी संघटनेमार्फत अनेकदा पाठपुरावा केला. राज्य
सरकारचे आदेश असताना जिल्हा परिषद कोणत्या कारणाने बदल्या करीत नाही, हे कळायला मार्ग नाही. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे शिक्षक विनंती बदल्यांपासून वंचित आहेत. त्यांनी सकारात्मक निर्णय घेऊन शिक्षकांना न्याय द्यावा.
– प्रवीण ठुबे, राज्य प्राथमिक शिक्षक संघ.
बदल्यांमध्ये खंड पडला आहे. अनेक शिक्षिका अडचणीच्या
ठिकाणी स्थानबद्ध झाल्या आहेत. शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य टिकणे गुणवत्तेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सर्व संघटनांनी बदल्यांसाठी विनंती
केली आहे. प्रशासनाने ही मागणी मनावर घ्यावी. डॉ. संजय कळमकर, राज्य संपर्क नेते, प्राथमिक शिक्षक संघ.
नेमके अडले कुठे…
■ राज्यात काही जिल्ह्यांनी बदल्या केल्या आहेत; परंतु त्यांनी कोणत्या निकषानुसार या बदल्या केल्या, हे तपासले पाहिजे. बदल्यांच्या आदेशात संदिग्धता आहे. नाशिक विभागात कोठेही शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया राबवलेली नाही. नगर जिल्हा मोठा आहे. या मोठ्या विस्तारामुळेही प्रशासन आस्ते कदम चालत आहे. त्यामुळेच नगरमध्येही निर्णय होत नसल्याचे प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे.