जि.प.कर्मचारी बदल्या जुलै महिन्यात !उत्सुकता कायम : शासनाकडून मागविले जाणार मार्गदर्शन teacher request transfer
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : गत अनेक दिवसांपासून
प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यामुळे या बदल्याचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे. दरम्यान, बदल्यांच्या अनुषंगाने शासनाकडे मार्गदर्शन मागविण्याच्या झेडपीत हालचाली सुरू झाल्या आहेत.
दरवर्षी मे महिन्यात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबवली जाते. त्यामुळे फेब्रुवारी मार्चपासूनच कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागलेले असतात. त्यादृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाने बदल्यांसाठी आवश्यक असलेली सर्व पूर्वतयारी केली. याअनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने पत्र काढत २१ एप्रिलपर्यंत माहिती सादर करण्याचे निर्देश सर्व खातेप्रमुख व गटविकास अधिकारी यांना देण्यात दिले होते. यामध्ये सेवाज्येष्ठता यादी तयार करणे, ज्येष्ठता यादीवर हरकती, आक्षेप नोंदविणे, हरकतींचे यासारखी महत्त्वाच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने विभाग प्रमुखांकडून माहिती मागविली होती. कर्मचारी बदल्यांसाठी कर्मचाऱ्यांचा मोठा आग्रह आहे. आदिवासी भागातील कर्मचाऱ्यांचा यासाठी हट्ट आहे. यापूर्वी अनेकदा जुलै-ऑगस्ट महिन्यात बदली प्रक्रिया राबविली गेली असल्याचा दाखला कर्मचारीवर्गामध्ये बोलल्या जात आहे. त्यामुळे प्रशासनाने बदली प्रक्रियेबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविण्याची तयारी सुरू केली आहे. शासनाकडे मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेतील वर्ग तीन आणि चारमधील बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्यासाठी प्रक्रिया राबविली जाणार आहे.