जिल्ह्यांतर्गत शिक्षक बदलीची प्रक्रिया १ जानेवारीपासून; १ जानेवारी ते ३१ मेपर्यंत विविध टप्प्यांमध्ये पार पडणार teacher online transfer
प्रतिनिधी। जालना
यंदा शिक्षकांची बदली प्रक्रिया न झाल्याने पुढील वर्षी होणाऱ्या शिक्षक बदली प्रक्रियेची प्रतीक्षा लागली होती. अखेर राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून बदली प्रक्रिया सुरू होणार आहे. १ जानेवारी ते ३१ मेपर्यंत विविध टप्प्यांत ही प्रक्रिया सुरू शाहील. ऑनलाइन पोर्टलद्वारे ही बदली
प्रक्रिया राबवली जाणार आहे. शासनाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांसाठी धोरण निश्चित केले असून त्यानुसार ही प्रक्रिया होत आहे. दरवर्षी राबवण्यात येणाऱ्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेसाठी संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण करीत शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यावर संबंधित जिल्हा परिषदेने ऑनलाइन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची पूर्वतयारी करण्याची प्रक्रिया सुरू करावी. तसेच जिल्हा
परिषदेने अवघड क्षेत्र घोषित अथवा घोषित क्षेत्र प्रसिद्ध सूचना जारी करावी असे आदेश शासनाने दिले आहेत. बदली प्रक्रियेत समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाइल तयार करणे, अद्ययावत करणे, पडताळणी करणे व त्यात दुरुस्ती करणे ही कार्यवाही २८ फेब्रुवारीपर्यंत अंतिम करावी. बदली प्रक्रिया सुरू झाल्यावर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाइलमध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
योग्य माहिती भरावी
शिक्षक बदली प्रक्रियेसाठी शिक्षकांनाच स्वतः फॉर्म भरून घ्यायचा आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारे खोटी माहिती तसेच चुकीची माहिती भरू नये. यामुळे स्वतः अर्ज करणारे तसेच इतर शिक्षकांनाही अडचण निर्माण होते. या बाबीचे लक्ष देत शिक्षकांनी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्ज भरावेत, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी केले आहे.
शिस्तभंगाच्या कारवाईच्या सूचना
सदर प्रक्रियेत एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्याच्या सूचनाही या आदेशात देण्यात आली आहे.