प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत teacher eligibility test
आदिवासी विकास विभागात विशेष भरती प्रक्रीयेद्वारे नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत.
प्रस्तावना:-आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त असलेल्या आश्रमशाळा दुर्गम, अतिदुर्गम व डोंगराळ भागात असून, अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर पदे रिक्त राहत होती. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता, सदरहू पदे स्थानिक उमेदवारांमधून तासिका / रोजंदारी तत्वावर भरण्यात येत होती. सबब, दुर्गम आदिवासी भागातील आश्रमशाळांमधील रिक्त पदे भरण्याच्या दृष्टीने मा. मंत्रिमंडळाच्या मान्यतेने विभागाच्या दिनांक ०१/१२/२०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये विशेष भरती प्रक्रीया राबविण्यात आली होती. सदर विशेष भरती प्रक्रीयेद्वारे अगोदरच शासकीय आश्रमशाळेमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून तासिका तत्वावर शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या उमेदवारांची प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाल्यास, अशा उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण करण्यासाठी ३ वर्षाचा कालावधी देण्यात आला होता.
२. सदर विशेष भरती प्रक्रीयेद्वारे निवड झालेल्या प्राथमिक शिक्षकांची शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण होण्यासाठीची ३ वर्षांची मुदत माहे जुलै-ऑगस्ट, २०२२ मध्ये संपुष्टात आली आहे. तथापि, राज्यात उद्भवलेल्या कोविड-१९ विषाणुच्या प्रादुर्भावामुळे सन २०२० मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा (TET) झाली नाही. सन २०२०- २०२२ या कालावधीत केवळ दोन वेळाच शिक्षक पात्रता परीक्षा (TET) आयोजित करण्यात आली होती. सबब, सदरहू भरती प्रक्रीयेद्वारे निवड झालेल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण होण्यासाठी पुरेशा संधी न
मिळाल्याने, अशा प्राथमिक शिक्षकांना TET/CTET उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः-
आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय दिनांक ०१/१२/२०१८ अन्वये राबविण्यात आलेल्या विशेष भरती प्रक्रीयेद्वारे नियुक्ती मिळालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या शिक्षक पात्रता परीक्षेसंबंधी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.
१) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय दिनांक ०१/१२/२०१८ अन्वये राबविण्यात आलेल्या विशेष भरती प्रक्रीयेद्वारे नियुक्ती मिळालेल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण होण्यासाठी या शासन निर्णयाच्या दिनांकापासून दोन वर्षे मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून पुढील अनुज्ञेय सेवाविषयक लाभ देण्यात यावेत.
२) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय दिनांक ०१/१२/२०१८ अन्वये देण्यात आलेली मुदत संपुष्टात आल्यांनतर व सदरची मुतदवाढ देण्यापूर्वी, दरम्यानच्या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांना त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण केल्याच्या दिनांकापासून पुढील अनुज्ञेय सेवाविषयक लाभ देण्यात यावेत.
३) सदर मुदतवाढ केवळ एक वेळची बाब म्हणून देण्यात येत आहे. यापुढे अशा प्रकारची कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. सदर मुदतवाढीनंतरही शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण न केलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्यात याव्यात.
२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आला असून, त्याचा संगणक क्रमांक २०२४०८२०११५९५७००२४ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सर्व वशिलेबाजीने लागलेले आहेत , जे TET/CTET पात्र आहेत ते बेरोजगार आहेत यांना कोणतीही मुदतवाढ देण्यात येऊ नये तर जे TET /CTET पात्र आहेत त्यांची भरती करावी