जागतिक महिला दिन भाषण speech on women’s day 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जागतिक महिला दिन भाषण speech on women’s day 

व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर, वंदनीय गुरुवर्य आणि या स्वतंत्र भारताचे भावी नागरिक असणाऱ्या माझ्या सर्व सुजाण बंधु- भगिनिंनो…! आज राष्ट्र गौरवाचा हा देखणा सोहळा साजरा करण्यास आपण सारे या पवित्र ज्ञानमंदिराच्या प्रांगणात जमलो आहोत. सर्वप्रथम देशाचा मान, अभिमान व सर्वोच्च सन्मान असणाऱ्या तिरंग्याला माझे वंदन ! आपणास मनापासून शुभेच्छा ! आणि माझ्या भारतमातेचा विजय असो !

आज या राष्ट्रीय उत्सवाच्या निमित्ताने माझ्या मनोगताचा विषय आहे, ‘अजूनही लढ्तेच मी !’ खरे तर हा केवळ विषय नाही तर… मुक्त आवाज आहे प्रत्येक भारतीय नारीचा, आर्त किंकाळी आहे प्रत्येक माता-भगिनीची, एक हुंकार आहे या प्रत्येक स्त्री मनाचा ! ज्याला वाचा फोडण्याचा व कित्येक वर्षे गुदमरलेला श्वास मोकळा करण्याचा मी एक अल्प प्रयास करणार आहे.

दरवर्षी १५ ऑगस्ट आला की, आपण मोठमोठ्याने ढोल बडवून ‘आम्ही आता स्वतंत्र आहोत !’ असे साऱ्या विश्वाला ओरडून सांगतो. पण खरे सांगा…! आज या भारतात पुरुषाइतकी स्त्री स्वतंत्र आहे का ? बंधनमुक्त आहे का ? पुन्हा २६ जानेवारी आला की, गर्वाने सांगतो ‘आता आम्ही एका गौरवशाली लोकशाही राष्ट्रात राहतो’ पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या लेखणीतून साकारलेल्या पवित्र घटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समता इत्यादी अनेक आभूषणांचा वास्तवामध्ये कोणत्याही स्त्रीला पुरुषाइतका उपभोग घेण्याची मुक्ती आहे का ? या प्रत्येक प्रश्नाचे ‘नाही’ हे एकच उत्तर येईल. सांगा मग

आता…! या स्वातंत्र्याला, या लोकराज्याला खरा अर्थ येईल का ? देशाच्या स्वातंत्र्याला आज जरी सात दशके लोटली असली तरीही आज भारतीय स्त्री झगडत आहे, लढत आहे एका नव्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या अस्तित्वासाठी !

स्वराज्यात स्त्री जातीवर अत्याचार कमी होणे तर दूरच..! तो दिवसेंदिवस वाढतच चाललाय ! रोज पेपर उघडून पहावा तर रोज कुठल्यातरी एका निष्पाप निर्भयावर झालेल्या अमानवी क्रौर्याचे शोककारी वास्तव वाचण्यास मिळते. या देशाला गौरवशाली संस्कृतीची परंपरा आहे. पुराणकाळापासून स्त्रीला समाजात मातेचे, देवीचे स्थान होते. प्रत्येक मराठी माणसाचे आराध्य दैवत छ. शिवरायांनीही स्त्रीला मातेसमान मानण्याची शिकवण दिलीय ! शिवाय अभिमान आहे की, याच मराठी मातीत फुले, शाहू, आंबेडकर महर्षी कर्वे सारखी पुरोगामी विचाराची मुहूर्तमेढ लावणारी आणि स्त्रीजातीचा उद्धार करणारी कैक रत्ने जन्माला आली. पण या सर्वाचे सार्थक तेंव्हाच होईल जेव्हा देशात स्त्रीला पुरुषाइतकाच दर्जा आणि समानता मिळेल; कारण तीच या राष्ट्रविकासाच्या विजयीरथाची दोन चाके आहेत.

प्रश्न एवढ्यावरच संपत नाही. खरा प्रश्न उभा राहिलाय तो स्त्रीजातीच्या संरक्षणाचा आणि अस्तित्वचा ! साऱ्या विश्वाच्या जननीला आज जन्म घेण्याचीही मुभा राहिली नाय ! कित्येक निष्पाप कळ्या गर्भातच खुडल्या जात आहेत. त्यातून सुदैवाने जन्म झालच तर…! नशिबी येतयं एखादी गटार, एखादा कचऱ्याचा ढीग यामध्ये फेकलेलं भयावह जीवन… पर्यायाने होत आहे लचके तोडून खाण्यासाठी एखाद्या कुत्र्याचाच आहार ! ही कल्पना नाही तर आपल्या आजूबाजूचे मन सुन्न करणारे विदारक सत्य आहे. आज

कित्येक गर्भात असणाऱ्या माझ्या चिमुकल्या भगिनींना कंप सुटत असेल… मला हे जग बघाय मिळेल की नाही ? मी मुलगी म्हणून जन्मला आले हा माझा गुन्हा आहे की काय ? का माझेच आई-बाप माझे वैरी झालेत ?

आज या पवित्रदिनी माझ्या सर्व वडीलधाऱ्यांना, आयांना व जेष्ठ बंधुना माझे ठोक प्रश्न आहेत, स्वतःच्याच मुलीच्या जीवनाशी आपण हा अघोरी खेळ का खेळत आहात ? “तुमच्या पोटच्या गोळ्याला मारु नका” असं शासनाला विनंती करुन सांगायला आज करोडो रुपये खर्च करावे लागत आहेत. इतके बधीर झालो आहोत का आपण ? स्वार्थी झालो आहोत का सारे ?

एकीकडे सतीची चाल बंद केली म्हणून डांगोरा पिटायचा आणि

दुसरीकडे अशी छुपी क्रूर प्रथा सुरु करायची हे या देशाच्या संस्कृतीला

शोभनीय आहे का ? एक माणूस म्हणून याचा खेद कसा काय वाटत

नाही ? हे सर्व थांबण्यास.. बदलण्यास कायद्याची गरज नाही तर गरज

आहे आपल्या विचारात बदल करण्याची.

जन्म देणारी ही देखील एकच स्त्रीच असते. तरीही या गर्भकाळात

“मला मुलगी झाली तर ?” या विचाराने चिंता करत असते. मुलगा

झाला तरच आनंदोत्सव साजरा करायचा, पेढे वाटायचे. इतकेच काय

पेढे देताना कोणी म्हंटले, “अहो पेढे घ्या मुलगा झाला” समोरचा माणूसही आपसुकच म्हणतो, “अरे वाss बरे झाले !” म्हणजे मुलगी झाली असती तर वाईट झाले असते का ? आपल्या भावना इतक्या बोथट झाल्या आहेत का ? माकडीण आणि पिल्ली यांच्या गोष्टीतील ती स्वार्थी आई आज सर्वत्र दिसत आहे.

आज वंशाला दिवा म्हणून प्रत्येकाला मुलगा हवा; पण पणती म्हणून दोन कुळांचा उद्धार करणारी मुलगी मात्र कोणाला नको.

आई पाहिजे, बायको पाहिजे, बहिण पाहिजे पण तुम्हाला मुलगी मात्र नकोशी झालीय ! या सर्वांचे आत्मचिंतन आज या सुवर्णदिनी करुया, एक नवा संकल्प याप्रसंगी करुया, एक व्यक्ती म्हणून पुरुषाइतकेच स्थान, मान आणि सन्मान देवून मानवता जपूया… स्वराज्यात मानवतेचा समतोल साधून नवराष्ट्रनिर्मिती करूया.

शेवटी आपणा सर्वांना कळकळीचे आवाहन करते, या मानिनी, स्वामिनी व संगिनी असणाऱ्या या स्त्रीशक्ती दामिनीला, बंदिनी, कालकिनी बनवू नका; कारण स्त्री असेल तरच हे विश्व असेल ! म्हणूनच तर म्हणतात,

“तुजवाचून ना कुठला जीव, तुजवाचून ना कुठली नीव, वंदितो तुजला हे स्त्रीशक्ती, तुझ्याअभावी कुठला चंद्र अन् कुठला शिव !”

यासाठीच.. वाळूच्या कणातून कणांच्या रेणुतून मानवाच्या मनातून मनाच्या स्पंदनातून एक निश्चय करूया ! लेक वाचवुया ! देश वाचवुया ! इतके बोलून विराम घेते.

जय हिंद ! जय भारत !

Leave a Comment