भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी मराठी भाषण speech on republic day 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी मराठी भाषण speech on republic day 

या लोकशाही राष्ट्रातील …. या स्वतंत्र देशातील या पवित्र भारतमातेच्या उदरात जन्म घेऊन स्वराज्याचा आणि सुराज्याचा जयघोष करणाऱ्या माझ्या प्रत्येक बांधवास आज प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्या…!

मित्रहो…! लोकजनहो…! आजचा हा दिवस केवळ माझ्यासाठीच नाही तर आपल्या सर्वांसाठीच लाख मोलाचा आहे ! मोठ्या आनंदाचा आहे ! मोठ्या गर्वाचा आहे ! अन गौरवशाली स्मरणाचा आहे ! सन १९५० साली याच दिवसापासून तुम्हा-आम्हाला जगण्याची खऱ्या अर्थाने दिशा मिळाली, कल्याणकारी नवजीवनाची एक सोनेरी आशा मिळाली, समस्त भारतवासीयांना स्वतंत्रपणे आपला आवाज, आपले शब्द, आपले विचार मांडण्याची एक मुक्त परिभाषा मिळाली.

साऱ्या विश्वाला क्रांतीचा आणि शांतीचा संदेश देणारा आपला अजरामर इतिहास आहे. आज या उंच गगनात दिमाखात डोलणारा माझा तिरंगा पाहून माझी छाती गर्वाने आणि अभिमानाने फुलून येते. गौरवशाली इतिहासाचे आणि त्यातील पराक्रमाचे रंग मनाच्या गाभाऱ्यात चौफेर उडू लागतात. आपण एका सार्वभौम प्रजासत्ताक देशात राहतोय…. आपण स्वतंत्र आहोत…. आपण समान आहोत……. आणि आपण सारे एक आहोत ! यासारखे प्रखर राष्ट्रवादी विचारांच्या ज्वाला मनामध्ये पेटून उठतात. अनेक थोरांचे स्मरण आणि पूजन करण्यासाठी त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मन व्याकूळ होते .

म्हणूनच…. या तेजोमय प्रसंगी, शतकानुशतके प्रत्येक मराठी मनगटात स्वराज्य प्राप्तीचा भक्ती आणि शक्तीची प्रेरणा देणाऱ्या माझ्या शिवाजी राजांना माझे मनोभावे वंदन ! स्वतःच्या आयुष्याची होळी करून देशबांधवांच्या आयुष्याची दिवाळी करण्यासाठी ज्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले असे… भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आजाद, वासुदेव बळवंत फडके यासारख्या अनेक वीर भूमिपुत्रांना मानाचा मुजरा !

देशसेवेसाठी त्यांनी आपले आयुष्य पणाला लावले, ज्यांच्या वक्तृत्व कर्तुत्व आणि नेतृत्वाने स्वातंत्र्य चळवळ प्रज्ज्ज्वलित झाली… या देशात सुराज्याची मुहूर्तमेढ लावली गेली असे… गांधी, नेहरू, टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस यासारख्या राष्ट्रापुरुषांना त्रिवार वंदन ! शिवाय ज्यांच्या लेखणीतून देशाला आधारभूत ठरणारी, नवी दिशा आणि संजीवनी देणारी ‘राज्यघटना’ साकार झाली असे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम !

आज तुमच्यासमोर मी भाषण करत आहे. हा भाषणाचा अधिकार या घटनेमुळेच मला मिळालेला आहे. हे भाषण स्वातंत्र्य असो की संपूर्ण स्वातंत्र्य असो… समता, समानता असो की बंधुता असो…. न्याय हक्क असो की, मानवी अधिकार असो ही सारी कवचकुंडले याच पवित्रदिनी घटनेनेच आपणास बहाल केली आहेत. प्रजासत्ताकदिनी पुनः आपल्या सर्वाना खूप साऱ्या शुभेच्छा देऊन समारोप समयी दोन शब्द बोलू इच्छितो,

“लहरतो तिरंगा अभिमानाने, आज उंच आकाशी, उजळू दे सारे रंग तयाचे, प्रण हा आज एकाच मुखाशी”

Leave a Comment