भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी भाषण पीडीएफ speech on republic day
स्वराज्याचे बांधिले तोरण, उगवला न्याय, समतेचा दिन, घटनेने केले सर्व मानवां अधिकार अर्पण, सर्व देशवासीयांचे झाले समृद्ध जीवन | देशसेवेसाठी चंदनासम झिजणाऱ्या.. थोर हुतात्म्यांचे स्मरण करूया, गाऊनी गाथा स्वातंत्रलढयाची.. बलशाली राष्ट्रनिर्मितीचा निश्चय या गणराज्यदिनी करूया |
महोदय अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, माझे वंदनीय गुरुजन आणि माझ्या प्रिय बंधुनो… आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मला मनोगत मांडण्याची संधी मिळाली आहे याचा आंनद तर होतच आहे शिवाय खूप अभिमानही वाटत आहे; कारण ज्या दिवशी स्वतंत्र भारतात लोककल्याणकारी सुराज्याचा अरणोदय झाला, ज्या दिवसापासून या पवित्र मायभूमीच्या सर्व लेकरांना घटनेने सर्व हक्क व अधिकार यांची अभेद्य कवचकुंडले बहाल केली त्या दिवशी चार शब्दांची सुमनमाला गुंफण्यासारखे मोठेपण कशातच नसेल.
असे सांगतात की, पूर्वी या भारत देशात सोन्याचा धूर निघत होता. संपन्न राष्ट्रात सर्व लोक गुण्यागोविंदाने नांदत होते. आणि या सगळ्याला जणू दृष्ट लागावी असे घडले. सत्ता आणि संपत्तीच्या हव्यासाने पछाडलेल्या इंग्रजांची नजर या भूमीवर पडली. व्यापारी म्हणून आलेले हे इंग्रज या देशाचे राज्यकर्तेच बनले.
‘फोडा झोडा आणि राज्य करा या कुटनितीचा अवलंब करत.. जुलूम अन्याय यांचा अघोरी प्रहार करत या ब्रिटिशांनी भारतमातेला गुलामीच्या जोखडात बंदिस्त केले. ब्रिटीशांचे हे जुलमी साम्राज्य पुढे जवळपास दीडशे वर्षे राहिले.
मायभूमीला या जुलमी जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेक भूमिपुत्र बंड करु लागले, इंग्रजाविरुद्ध उठाव करु लागले. क्रांतीची ज्वाला दिवसेंदिवस भडकतच राहिली. स्वराज्याच्या कामी अनेकांनी घरादारावर तुळसीपत्र ठेवले. वासुदेव फडके, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, यासारख्या अनेक निधड्या छातीच्या क्रांतिकारकांनी हुतात्म्य पत्करले. टिळकांच्या सिंहगर्जनेने इंग्रजांना धडकी भरु लागली. महात्मा गांधींनी दाखवलेल्या सत्य आणि अहिंसात्मक मार्गावर सारा देश एकत्र येवून इंग्रजांना ‘चले जाव’ म्हणून धिक्कारु लागला. स्वातंत्रवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य लढ्याची मोहीम अटकेपार पोहचवली.
सरतेशेवटी सत्याचा विजय झाला. सर्वांच्या त्याग, बलिदानातून स्वराज्याचा अरुणोदय झाला. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताचा ‘स्वतंत्र राष्ट्र’ म्हणून जणू काही पुनर्जन्मच झाला. पंडित नेहरू पहिले पंतप्रधान बनले. अनेक वर्षे अन्यायात, खितपत पडलेल्या भारतीयांना न्याय, स्वातंत्र देणारी शिवाय समता, बंधुता व लोकशाही यांचे बीजारोपण करणारी घटना निर्मिती करण्याचे ठरले. त्यासाठी घटना समिती स्थापन झाली. या समितीने स्वतंत्र भारतास उद्धारक होईल. सर्व राष्ट्राला नवसंजीवनी मिळेल अशी आदर्श राज्यघटना तयार केली. या निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता म्हणून त्यांना ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार’ असे म्हणतात.
या राज्यघटनेचा अंमल दि. २६ जानेवारी १९५० पासून सुरु झाला. एक प्रकारे देशात सुराज्याची व लोकशाहीची मुहूर्तमेढच रोवली गेली. म्हणूनच या पवित्रदिनाच्या….. लोकशाहीच्या जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा ! शिवाय घटनेने बहाल केलेल्या हक्क, अधिकार सोबत कर्तव्यांचे, जबाबदारीचे भान ठेवण्याचे तुम्हाला आवाहन करतो आणि थांबतो.
जय हिंद ! जय महाराष्ट्र ! जय जवान ! जय किसान ! जय विज्ञान !