26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी छोटे भाषण speech on republic day
“दिवस हा सोन्याचा, तुमच्या माझ्या आनंदाचा, देशाच्या गौरवाचा… अभिमानाचा आणि उत्साहाचा,
दिवस हा आपुल्या न्यायाचा, विजय असो प्रजासत्ताकदिनाचा !”
सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर, वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या बालमित्रांनो… आज २६ जानेवारी म्हणजेच आपला ‘प्रजासत्ताक दिन’. आपल्या सर्वांच्या या गौरवपूर्ण राष्ट्रीय सणानिमित्त मी आपणास काही चार शब्द सांगणार आहे ते आपण शांतपणे ऐकून घ्यावेत अशी मी नम्रतापूर्वक विनंती करत आहे.
सन १९५० पासून दरवर्षी या दिवशी आपण सारे हा दिवस संपूर्ण देशभर ‘प्रजासत्ताक दिन’ किंवा ‘गणराज्य दिन’ म्हणून साजरा करत आहोत. भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे. म्हणजेच ‘लोकांनी, लोकांच्यासाठी, लोकांच्याकडून चालवलेले राज्य आहे.’ देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि आपण ब्रिटीश राजवटीच्या गुलामी जोखडातून मुक्त झालो. स्वातंत्र, समता व न्याय देणारी; शिवाय माणसाला माणुसकीने जगण्यास हक्क देणारी राजवट सुरु झाली. या सर्वांचा पाया होता ‘भारताची राज्यघटना’.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला नवा आकार, नवी दिशा देणाऱ्या घटनेची निर्मिती करणे हे देशासमोर मोठे आव्हान होते.
शेवटी ही जबाबदारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवण्यात आली आणि त्यांनी ती लिलया पेलली. त्यामुळेच सर्व जगात श्रेष्ठ आणि आदर्श म्हणून ओळखली जाणारी ‘भारतीय राज्यघटना’ आकारास आली. त्यांच्या या महान कार्याबद्दल त्यांना ‘भारतीय राज्यघटनेचे’ शिल्पकार असे म्हणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद यासारख्या अनेक विभूतींचे घटना निर्मितीत मोलाचे कार्य आहे.
२६ नोव्हेबर १९४९ ला भारतीय राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आला आणि २६ जानेवारी १९५० पासून हे संविधान संपूर्णपणे लागू करण्यात आले. साऱ्या देशाने अन्यायाची, गुलामगिरीची कात टाकली… आणि मायभूमीत स्वातंत्र,न्याय व लोकशाहीचा सोनेरी उदय झाला. म्हणूनच स्वातंत्र्य दिनाप्रमाणेच हा दिवसही आपणा सर्वासाठी गर्वाचा आहे.
याच दिवशी आपल्या पवित्र मातृभूमीवर एका नव्या युगाचा प्रारंभ झाला. प्रत्येक मानवास सन्मानाने जगण्याचे व उंच भरारी घेण्याचे बळ या घटनेने दिले. यासाठीच आजच्या या सोनेरी दिवशी हा आनंदोत्सव साजरा करत आहोत आणि करतच राहणार ! भारतमातेच्या कणाकणावर म्हणजेच गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत हा दिन मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो. या मंगलदिनी आपल्या सर्वाना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. त्याचबरोबर देशासाठी बलिदान दिलेल्या व सर्वस्व अर्पण केलेल्या सर्व थोर व्यक्तींना या प्रसंगी वंदन करतो आणि माझे दोन शब्द पुरे करतो.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !