स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती मराठी भाषण speech on chatrapati shivaji Maharaj
हिंदवी स्वराज्याचे दिव्य स्वप्न उराशी बाळगणाऱ्या राष्ट्रमाता… राजमाता माँसाहेब जिजाऊ ! प्रत्येक मराठी मनाचा श्वास.. पंचप्राण स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती ! आपल्या हुतात्म्याने महाराष्ट्रात अस्मितेची आणि क्रांतीची अखंड ज्योत पेटविणारे स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांना प्रथमतः त्रिवार वंदन !
माझ्या राज्यांच्या विचाराने, आदर्शाने आणि प्रेरणेने कार्य माझ्य करणारे व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर आम्हास राजांचा इतिहास, कार्य व शौर्य यांचे भव्य दर्शन घडवणारे अन् आम्हावर शिवसंस्कार करणारे आमचे आदरणीय गुरुवर्य, आपणा सर्वांना मानाचा मुजरा ! शिवाय कणखर मराठी बाणा आणि कणा असणारे इथे जमलेल्या सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या अनंत शुभेच्छा !
मित्रहो..! आज १९ फेब्रुवारी ! हाच तो दिवस ज्या दिवशी हिंदवी स्वराज्याचे व सुराज्याचे स्वप्न दाखवणाऱ्या अन् सत्यात उतरवणाऱ्या एका राष्ट्रपुरुषाचा, युगपुरुषाचा जन्म झाला ! हाच तो दिवस ज्यावेळी जुलमी साम्राज्याला तिलांजली देऊन स्वराज्याचे देखणे स्वप्न पाहणाऱ्या वीर मातेच्या पोटी शिवरत्न जन्माला आले ! अहो ! हाच तो मंगल दिन जेव्हा तुमचा.. माझा.. सर्वांचा मान, अभिमान आणि आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा जन्म या पवित्र मराठी भूमीत सन १६३० साली झाला.
कोणतेही मंदिर नसताना घराघरात.. मनामनात सदैव ज्यांची ईश्वरतुल्य पूजा केली जाते अशा तुमच्या, माझ्या, सर्वांच्या मनाच्या गाभाऱ्यातील आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची किर्ती गाताना, गर्जना करताना आज एक वेगळाच आनंद आणि अभिमान वाटतोय.
राजेंचा जन्म होऊन जवळपास चारशे वर्षे होत आलीत; तरीही शिवाजी महाराज की ! असा शब्द कोणाच्याही कानावर पडला तर ‘जय !’ हा जयघोष ओठावर आल्याशिवाय राहत नाही. रक्त सळसळल्याशिवाय रहात नाही. यावर विचार केलाय का तुम्ही कधी ? इतकी मोठी शक्ती इतकी ऊर्जा कशी काय संचारते तुमच्यात ? इतकी काय मोठी विलक्षण ताकद आहे माझ्या राजांच्या नावात ? किती मोठे कार्य केले असेल माझ्या राजाने ! या माझ्या देवाने ! केवढे मोठे आपले भाग्य आहे की स्फूर्तीचा हा अखंड झरा आपल्या मायभूमीत उगम पावला ! जुलमी मोगली सत्तेच्या आक्रमणाने धूळधाण झालेल्या या पवित्र भूमीत न्यायाचे, सुखाचे आणि कल्याणाचे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे देखणं स्वप्न जिजाऊंनी पाहिले. आपल्या मातेच्या डोळ्यातील आस आणि परकीय सत्तेच्या जुलमी राजवटीचा रयतेला होणारा त्रास पाहून माझ्या बालशिवाजीने घेतला होता स्वराज्य स्थापनेचा ध्यास ! खरंतर ज्याप्रमाणे कोणतही रत्न आपोआप तयार होत नाही ते घडवावं लागतं; त्याप्रमाणे या शिवरत्नाला घडवण्याचे.. पैलू पाडण्याचे थोर कार्य जिजाऊंनी केले होते म्हणून तर म्हणतात,
“ लखलखणारी तलवार पाहून,
व्हायचे शत्रू ढेर
जिजाऊचा शिवबा होता,
शेरांचा सव्वाशेर ।’
राजांनी महाराष्ट्रात स्वराज्याचे तोरण बांधलं. अठरा पगड जातींना सर्व धर्मांना न्यायाची समतेची आणि ममतेची छत्रसावली दिली. प्रत्येक माता-भगिनींना मान-पान आणि संरक्षण दिले.
कुशल प्रशासनाचा व युद्धनीतीचा आदर्श जगाला घालून दिला म्हणूनच आजपर्यंतचे सर्वात मोठे दुसरे महायुद्ध जिंकल्यावर विस्टन चर्चिल यांनी आपला आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत असे साऱ्या जगाला अभिमानाने सांगितले होते. शिवरायांनी पेरलेल्या विचारामुळेच या महाराष्ट्राला पुरोगामीचे रूप प्राप्त झाले आहे आणि म्हणूनच याच भूमीत फुले, शाहू, आंबेडकर यांच्यासारखे कित्येक सुधारणावादी विचारांचे सावली देणारे वटवृक्ष समाजात निर्माण झालेत. शिवरायांच्या शिवाय या महाराष्ट्राचा तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास अपुरा आहे म्हणूनच तर म्हणतात,
झालेत बहु, आहेत बहु, होतीलही बहु, परि यासमहाः शेवटी आपल्या या राजाला ! या देवाला ! पुन्हा एकदा शिरसाष्टांग नमस्कार करतो ! मानाचा मुजरा करतो ! आणि सर्वांना गर्वाने सांगू इच्छितो,
ना शिवशंकर… तो कैलासपती, ना लंबोदर… तो गणपती, नतमस्तक तया चरणी, ज्याने केली स्वराज्य निर्मिती, देव माझा एकच तो, राजा शिवछत्रपती.. राजा शिवछत्रपती !
जय भवानी ! जय शिवाजी !