आता शाळा सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत : नवीन शैक्षणिक वर्षापासून वेळापत्रक, सुट्यांमध्ये बदल school timetable
छत्रपती संभाजीनगर, ता. २८ :राज्यातील शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला. येणाऱ्या शैक्षणिक वर्षात सर्वच शाळा सकाळी ९ वाजता सुरू होऊन दुपारी ३.५५ वाजता सुटणार आहेत. नव्या वेळापत्रकानुसार तासिकांचे आणि सुट्यांचे नियोजनही बदलण्यात आले.
शाळा सकाळी ९ वाजता सुरू झाल्यानंतर ९ ते ९.२५ या वेळेत परिपाठ होणार आहे. त्यानंतर पहिल्या तीन तासिका ११.२५ पर्यंत चालतील. विद्यार्थ्यांना त्यानंतर १० मिनिटांची छोटी सुटी (११.२५ ते ११.३५) मिळणार आहे. त्यानंतर ११.३५ ते १२.५० या कालावधीत दोन तासिका घेतल्या जातील. यानंतर विद्यार्थ्यांना ४० मिनिटांची मोठी सुटी (१२.५० ते १.३०) असेल. दुपारी १.३० वाजता पुन्हा तासिका सुरू होऊन ३.५५ पर्यंत तीन तासिका घेतल्या जातील. प्रत्येक तासिकेनंतर ५ मिनिटे पुढील विषयाच्या तयारीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. राज्यातील शालेय कामकाजाचे २३४ दिवस निश्चित करण्यात आले. त्यानुसार इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी १,८७२ तासिका, सहावी ते आठवीसाठी १,८७२ तासिका, तर नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी १,६३८ तासिका असतील. प्रत्येक भाषेसाठी २३४ तासिका राखीव असतील. गणितासाठी ३१२ तासिका, विज्ञानासाठी १८२ तासिका, आणि कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण व कार्यशिक्षणासाठी १५६ तासिका उपलब्ध असतील. या नव्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा ताण कमी होणार आहे.
नवे वेळापत्रक लवकरच लागू
■ दिवसभरात दोन सुट्या मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना थोडी विश्रांती मिळणार आहे. शारीरिक शिक्षण व कला विषयांना अधिक वेळ दिल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासही होईल. राज्यातील सर्व शाळांमध्ये हे नवे वेळापत्रक लवकरच लागू होणार असून, शिक्षण विभाग त्यासाठी तयारी करत आहे. विद्यार्थ्यांना या बदलाची सवय लावण्यासाठी शाळांना मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार आहेत. शिक्षण अधिक नियोजनबद्ध आणि उपयुक्त करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेला हा बदल राज्यभर लागू होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.