नोकरी टिकवायची असेल तर विद्यार्थी आणा !विद्यार्थ्यांसाठी गुरुजींचा पगार होतो खर्च save teacher post
लोकमत न्यूज नेटवर्क वरूड : खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा कल वाढल्याने शासकीय शाळा ओस पडू लागल्या. यामुळे अनेक शाळांतील वर्ग बंद पडले. अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटल्याने शिक्षकांमध्ये चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे नोकरी टिकविण्यासाठी गुरुजींवर विद्यार्थ्यांना शोधण्याची वेळ आलेली आहे. प्रसंगी पालकांना खर्च द्यावा लागत असल्याने शिक्षकाचा एक महिन्याचा पगार विद्यार्थ्यावर खर्च होत असल्याचे गुरुजींकडून सांगण्यात येते.
ज्या शाळांनी उच्चपदस्थ अधिकारी, चांगले राजकारणी, मंत्री बनविले; परंतु आज याच शासकीय शाळांवर खासगीकरणाने घाला घातला असून फॅशनच्या दुनियेत पालकांचा अधिक कल खासगी शाळांकडे वळला आहे.
हजारो रुपये डोनेशन देऊन उच्चभ्रू शाळेत मुलांना प्रवेशित केल्या जाते; परंतु जिल्हा परिषद, नगरपरिषद; तसेच अनुदानित खासगी शाळांमध्ये गुणवत्ता असताना उच्चभ्रू शाळांकडे पालकांचा कल आहे.
यामुळे तालुक्यातील १७३ पैकी
१०० शाळांची विद्यार्थी संख्या
घटल्याने वर्ग बंद होण्याच्या मार्गावर
आहे. याचा परिणाम शिक्षकावर होऊन
नोकरी गमविण्याची वेळ आली आहे.
नोकरी वाचवायची असेल तर
संस्थाचालकांनी पाच-पाच विद्यार्थ्यांचे
टार्गेट दिल्याने शिक्षकांना रानोमाळ
भटकंती करून विद्यार्थी शोधण्याचे
आदेश दिले. सकाळपासून तर
सायंकाळपर्यंत बेड्या, पाड्यावरून तर
शेतावर राहणाऱ्या आदिवासी मुलांना
हायजॅक करणे सुरू केले.
जिल्हा परिषद शाळेचे दाखले मिळाले; मात्र नगरपरिषदेचा नकार
चौथ्या वर्गातून पाचवीत प्रवेश घेण्याकरिता खासगी अनुदानित शाळांचे वर्ग कायम राहावे, याकरिता शिक्षकांना संस्थाचालकांनी टार्गेट दिले. यामुळे ग्रामीण भागातून सुविधा देण्याचे आमिष दाखवून जिल्हा परिषदेच्या शाळांतून दाखले मिळाले आहेत. नगरपरिषद शाळांतून दाखले मिळत नाही. यामुळे अनुदानित शाळांना आडकाठी निर्माण होत आहे.
