एसईबीसी आणि ओबीसी उमेदवारांकरीता महत्वाची सूचना Regarding Cast Validity Certificate for SEBC and OBC category Students
संदर्भ :-
१. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०२४/प्र.क्र.७५/आरक्षण-५ दिनांक २२ जुलै, २०२४
२. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०२४/प्र.क्र.७५/आरक्षण-५ दिनांक ०५ सप्टेंबर, २०२४
३. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०२४/प्र.क्र.७५/आरक्षण-५ दिनांक ०७ जानेवारी, २०२५
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये राबविण्यात आलेल्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेमधून एसईबीसी आणि ओबीसी संवर्गातून जात वैधता प्रमाणपत्राकरीता सादर केलेल्या अर्जाच्या पावतीच्या आधारावर प्रवेश निश्चित केलेल्या उमेदवारांना संदर्भ क्र. १ व २ अन्वये जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरीता सहा महिन्यांची मुदत देण्यात आलेली होती. सदरच्या कालावधीत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांपैकी काही उमेदवार विहीत कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करु शकले नाहीत अशा उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करुन शासनाने संदर्भ क्र ३ च्या शासन निर्णयानुसार जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरीता या आदेशाच्या दिनांकापासून अधिकचा तीन महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. त्यानुसार उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करावयाचा अंतिम दिनांक ०६/०४/२०२५ असा असून ज्या उमेदवारांना अद्यापपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही अशा उमेदवारांनी संबंधित जात पडताळणी कार्यालयाशी संपर्क करुन दिलेल्या मुदतीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे व ऑनलाईन अपलोड करुन संबंधित संस्था/महाविद्यालयात जमा करण्यात यावे. तसेच ज्या उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र संस्थेत/महाविद्यालयात जमा केलेले आहे त्यांनी सदर प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड केलेले आहे किंवा नाही याची खात्री करुन घ्यावी.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता एसईबीसी आणि ओबीसी संवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कळविण्यात येते की, संदर्भ क्र. १, २ व ३ मध्ये नमुद शासन निर्णयानुसार सदर मुदत ही फक्त शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवारांकरीता देण्यात आलेली असून सदर मुदत आपणास लागू राहणार याची सर्व उमेदवार/पालक यांनी कृपया नोंद घ्यावी.