राजमाता जिजाऊ जयंती भाषण मराठी rajmata jijau jayanti bhashan3
निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, मोगल, इंग्रज, पोर्तुगीज एवढ्या सत्ता महाराष्ट्रात त्या काळी आपलं राज्य करत होत्या.महाराष्ट्राच्या भूमीचे आळीपाळीने जणू लचके तोडत होत्या. येथील सरदार वेगवेगळ्या सत्तांकडून असल्यामुळे एकमेकांचे मुडदे पाडायचे. आपलीच माणसं आपल्या माणसाच्या हातून मारली जायची.गावात कोणी यायचा सारा गाव लुटला जायचा.बाया पोरी पळवून नेल्या जायच्या.उभ्या पिकातून घोडे,हत्ती सोडले जायचे. सारीकडे अन्याय अंधार पसरला होता. या अंधकाराचा नाश करण्यासाठी सतराव्या शतकात एका क्रांतीसूर्याचा शिवबाचा जन्म झाला.त्यांनी शेतकऱ्यांच्या विळयाजागी हाती तलवार दिली.प्रथम लोकांना मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले.स्वराज्याचा कोणी विचारही करू शकत नव्हते त्या काळात त्यांनी स्वराज्य निर्माण करून दाखवले.या सर्वांमागे कोण होतं ? शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ. जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ मध्ये महान मराठा सरदार लखुजीराव व म्हाळसाबाई जाधव यांच्या पोटी झाला. सिंदखेड येथे त्यांचे बालपण गेले. विविध शिक्षणाबरोबर त्यांनी युद्धकलेचे शिक्षण घेतले होते. त्यांचा विवाह वेरुळचे शहाजीराजे भोसले यांच्या सोबत झाला.त्यांना प्रथम पुत्र संभाजी नंतर शिवाजी यांचा जन्म झाला. शहाजीराजे यांनी अनेक वेळा वेगवेगळ्या सत्तांकडून चाकरी करून स्वायत्त होण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. तेच स्वराज्य स्थापनेचे स्वप्न त्यांनी आपल्या मुलाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. शहाजीराजांनी ज्येष्ठ पुत्र संभाजीसोबत बेंगलोरला कारभार पाहावा व जिजाऊंनी पुण्याचा कारभार पाहावा असे ठरले होते. बेंगलोरहुन जिजाऊ शिवबा पुण्यात येताना शहाजींनी त्यांच्यासोबत विश्वासू नोकर, विपुल धन ,राजमुद्रा ,भगवा ध्वज अशी सामग्री दिली होती.शहाजीराजे शहाजीराजे स्वराज्यसंकल्पक होते तर जिजाऊ या स्वराज्यप्रेरिका होत्या. तुकोबांनी म्हटल्याप्रमाणे
“शुद्ध बीजापोटी
फळे रसाळ गोमटी
मुखी अमृताची वाणी
देह वेचावा कारणी”
जसं बीज असतं तसंच त्याचं फळ असतं. जिजाऊंच्या व शहाजींच्या रक्तामध्ये लढाऊपणा होता. तोच शिवबामध्ये उतरला होता. शिवबांच्या स्वराज्यात शत्रूच्या स्त्रीलाही सुरक्षितता वाटत होती. हा विश्वास शत्रूलाही होता.कल्याणच्या सुभेदाराची सून, सावित्री देसाई,रांझ्याच्या पाटलाची गोष्ट, शाहिस्तेखानाच्या बहिणीच्या मुलीचे प्रकरण यातून शिवबांचा परस्त्री यांच्या संदर्भातील दृष्टिकोन लक्षात येतो. कुठलीच गोष्ट आपोआप होत नसते त्याला संस्कार लागतात.हे संस्कार जिजाऊंचे होते.अफजलखान भेटीच्या वेळी शिवबांनी मागे वळून पाहिले तेव्हा त्या म्हणाल्या, “शिवबा घाबरलात काय ? आमची काळजी करू नका. जा आणि खानाचा निकाल लावा. तुमचे बरे वाईट झाले तर शंभूला गादीवर बसवून मी राज्यकारभार चालवीन.” आपला मुलगा मृत्यूच्या दाढेत असतानाचे हे उद्गार आहेत हे लक्षात घ्या. उगाच कोणी महान बनत नाही. सिद्दी जोहरचा पन्हाळ्याला वेढा उठत नव्हता तेव्हा जिजाऊ सरदारांना म्हणाल्या, “आता हातात तलवार घेऊन मीच जाते.” हे ऐकताच सैनिकांच्या अंगात वीरश्री संचारली. शिवबा पुरंदरच्या तहानुसार औरंगजेबाला भेटण्यासाठी आग्ऱ्याला गेले. तेव्हा त्यांच्या मागे त्यांनी उत्तमरीत्या राज्यकारभार चालवला. शिवबा निर्णयावर अंतिम निर्णय देण्याचा अधिकार जिजाऊंना होता. ‘शिवबा हायकोर्ट तर जिजाऊ सुप्रीम कोर्ट होत्या.’ असे म्हणायला हरकत नाही. शिवबांचे काही निर्णय त्यांनी फिरवले होते.
आपल्या मुलाला यश मिळावे, युद्धामध्ये विजय व्हावा म्हणून त्यांनी कधी उपवास धरले नाहीत की कोण्या देवाला नवसही बोलले नाहीत.त्यांनी कधीही होमहवन केले नाही की पूजा अर्चन मांडले नाही. त्या बुद्धिवादी होत्या दैववादी नव्हत्या. अंधश्रद्ध विचारांना त्यांनी कधी थारा दिला नाही. शहाजीराजांच्या मृत्यूनंतर त्या काळातील प्रथानुसार सती जाणे आवश्यक होते. परंतु त्या सती गेल्या नाहीत व पतीचे कार्य त्या पूर्ण करण्यासाठी थांबल्या. मुरारजगदेव नावाच्या मोगलांच्या ब्राह्मण अधिकाऱ्याने पुणे उध्वस्त करून उलटी पहार रोवून त्यावर तुटकी चप्पल लटकवली होती व सांगितले होते जो कोणी इथे राहायला येईल त्याचा निर्वंश होईल.जिजाऊंनी असल्या फालतू मान्यतांना झुगारून दिले.पहार फेकून दिली.शिवबांच्या हाताने पुण्याची भूमी नांगरून पुणे शहर वसवले.
प्रेरणा कोणाचीही होत नसते.उजेड कशाचाही पडत नसतो.उजेड पाडण्यासाठी स्वतःला जळवून घ्यावं लागतं.सतत धगधगत राहावं लागतं. जाळाचे चटके सोसावे लागतात. जिजाऊंची इच्छाशक्ती प्रबळ होती.त्यांचा जणू निर्धारच होता की शिवबा छत्रपती झाल्याशिवाय मी मरणार नाही. मग काळालाही रोखण्याची माझ्यात धमक आहे. ६ जून १६७४ ला शिवराज्याभिषेक झाला. १७ जून १६७४ ला त्यांनी जगाचा निरोप घेतला. १५९८ पासून धगधगणारी ज्योत विझली.जिजाऊ म्हणजे विदर्भाची मुलगी, मराठवाड्याची सून, पश्चिम महाराष्ट्रात राज्यकारभाररुपी संसार चालवणारी धोरणी स्त्री, कोकणात त्यांनी शेवटचा श्वास घेतला म्हणजे जिथे त्यांचा मृत्यू झाला ते ठिकाण सारा महाराष्ट्र जणू जिजाऊं या नावाने गुंफून टाकले आहे. त्यांची प्रेरणा चंद्रसूर्य असेपर्यंत आम्हाला मिळत राहील.मी तर असे म्हणतो जोपर्यंत त्यांची प्रेरणा असेल तोपर्यंतच चंद्रसूर्य राहतील.जयंती दिनी त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन…..!