प्रकल्पबाधित व्यक्तींना व त्यांनी नामनिर्देशित केलेल्या त्यांच्या कुटुंबांतील व्यक्तींना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करतांना अनुसरवयाची कार्यपध्दती project affected certificate
प्रस्तावना-
शासनाच्या पुनर्वसनविषयक धोरणानुसार भूसंपादन अधिनियम १८९४ अन्वये सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांसाठी भूसंपादनाच्या अनुषंगाने विस्थापित प्रकल्पग्रस्तांसाठी व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुंटुंबातील सदस्यांना शासकीय सेवेत वर्ग-३ व वर्ग-४ संवर्गातील पदांनवर सरळसेवेने नियुक्ती करिता प्रकल्पग्रस्तांनसाठी विहित आरक्षित पदांवर अर्ज करण्यासाठी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याची तरतुद करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तिचे पुनर्वसन अधिनियम, १९७६.१९८६,१९९९ अन्वये अधिसुचित केलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील ज्या भूधारकांच्या जमिनी संपादित केल्या आहेत अशा प्रकल्पबाधित भूधरकांना व त्यांच्या वर अवलंबुन असलेल्या कुटुंबांतील सदस्यांना नोकरीसाठीचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र अनुज्ञेय ठरते.
सदर प्रकल्पग्रस्त व्यक्तींना व त्यांच्यावर अवलंबित कुंटुंबातील सदस्याना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करतांना अनुसरवयाची कार्यपध्दती व निकष याबाबत कालपरत्वये झालेले बदल लक्षात घेऊन सर्वकष कार्यपध्द्ती विहित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती. त्यानुसार राज्यातील प्रकल्पग्रस्तांना नोकरीसाठीचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करतांना खालीलप्रमाणे निदेश देण्यात येत आहेत.
शासन निर्णय
भूसंपादन अधिनियम १८९४ अन्वये सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांसाठी भूसंपादनाच्या अनुषंगाने मुळ बाधित भूधारक तसेच पुनर्वसन अधिनियम १९७६,१९८६,१९९९ च्या तरतुदी लागु असलेल्या पाटबंधारे प्रकल्पातील बुडीत क्षेत्रातील मुळ बाधित भूधारकांच्या कुटुंबातील नामनिर्देशित सदस्यास नोकरीसाठीचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करतांना त्याची पात्रता, अनुज्ञेयता याबाबत तपासणी करतांना पुढीलप्रमाणे कार्यपध्दती अनुसरण्यात यावी :-
१. भूमिसंपादन अधिनियम, १८९४ च्या कलम ४ अन्यये अधिसूचना प्रसिध्द होऊन भूसंपादन निवाडा दिनांकाच्या वेळी अथवा मोबदला स्वीकारलेल्या दिनांकास मुळ प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्यावर अवलंबून व्यक्तीना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र अनुज्ञेय राहिल.
२. सन १९७६ पुर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रामधील ज्या भोगवटादाराची जमीन संपादित करण्यात आली आहे अशा बाधित भोगवटादाराच्या कुटुंबांतील नामनिर्देशित व्यक्तींना (पत्नी, मुलगा,
अविवाहित मुलगी, अज्ञान भाऊ बहिण आई व वडिल, भावाची मुले, बहिणीची मुले) सानान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दि २१ जानेवारी, १९८० नुसार प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात यावे.
३. शासन निर्णय दि. २१/०१/१९८० नूसार वीज प्रकल्पाच्या तसेच पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परीमंडळातील भूधारकाची जमीन संपादीत करण्यासाठी भूसंपादन अधिनियम १८९४ च्या कलम ४ अन्वये राजपत्रामध्ये ज्या तारखेस अधिसूचना प्रसिध्द करण्यात येते त्या तारखेस किंवा संपादित जमिनीचा निवाडा ज्या तारखेस घोषित करण्यात आला आहे त्या तारखेस, अशा भूधारकाच्या कुटुंबामध्ये हयात असलेले व त्याच्यावर अवलंबून असलेले पती, पत्नी, अविवाहित बहिण, भाऊ, भावांची मुले, बहिणीची मुले यांना प्रकल्पाबाधित कुटूंबातील सदस्य या नात्यानी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र अनुज्ञेय आहे.
४. त्यानुसार मुळ प्रकल्पग्रस्त व्यक्तीचा व्यक्तीचा पती अथवा अशा व्यक्तीची पत्नी, अशा व्यक्तीचे अज्ञान मुलगे, अशा व्यक्तींच्या अविवाहित मुली, अशा व्यक्तींचे अज्ञान भाऊ किंवा बहिणी, तसेच अशा व्यक्तीचे आई व वडील यांना नोकरीसाठीचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. मुळ प्रकल्पग्रस्त व त्याच्यावर अवलंबुन असलेलेल व त्यासोबत राहाणा-या कुटुंबातील त्याच्या सदस्यांना जर निवाडा पारित झाल्यावरही प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित केले नसेल तर अशा मुळ प्रकल्पग्रस्ताने नोकरीसाठीचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची मागणी केल्यास सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दि २१ जानेवारी, १९८० नुसार अशा मुळ प्रकल्पग्रस्ताच्या नावे अथवा जमिन संपादित होते वेळी त्याच्यावर अवलंबून असलेल्या त्याच्या कुटुंबातील ज्या सदस्यास त्याने नामनिर्देशित केले आहे, अशा सदस्यांच्या नावे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे. तसेच मुळ प्रकल्पग्रस्त हयात नसल्यास संपादनावेळी त्यावर अवलंबुन असलेले व त्यासोबत राहाणा-या त्याच्या कुटुंबातील एका सदस्याच्या नावे नोकरीसाठीचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र शासन निर्णय दि २१, जानेवारी १९८० नुसार निर्गमित करण्यात यावे.
५. महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम १९९९ दि.०९/०४/२००२ रोजी अंमलात आल्यानंतर सदर अधिनियमाच्या कलम ११ व १३ नुसार जे प्रकल्प अधिसूचित करण्यात आले आहेत, अशा प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील भूधारकाची जमीन संपादीत करण्यात आली असल्यास, अशा प्रकल्प बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील व त्याच्यावर अवलंबून असलेल्या सदस्यांना पुनर्वसन अधिनियम १९९९ च्या कलम २ (२) (अ), २(२) (क) (एक) (दोन) (तीन), ६ (क) व ५ (क) मधील तरतुदीमध्ये विहीत केलेल्या अटींची पुर्तता करण्याच्या अधिन राहून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे.
६. शासन निर्णय दि २ मे २०१६ नुसार प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरित करतांना मुळ भूधारक हयात असणे आवश्यक नसुन प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रधारक व्यक्तीस त्याच्या इच्छेनुसार त्याच्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीच्या नावे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरित करण्याची त्यास मुभा असेल. तसेच मुळ भूधारक किंवा प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रधारक व्यक्ती हयात नसेल तर त्याच्या वारस प्रमाणपत्राच्या आधारे अवलंबित सर्व वारसांचे नाहरकत घेऊन एका नामनिर्देशित वारसाच्या नावे (वर्ग-१ संवर्गातील वारस/Class | Legal Heir) शासन निर्णय दि २ मे २०१६ नुसार प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरित करण्यात यावे.
७. शासन निर्णय दि १७.०४.२००६ व शासन निर्णय दि ३.५.२०१० अन्वये नोकरीसाठीचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याबाबत विहित केलेले निकष महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ च्या कलम २ (२) (अ), २(२) (क) (एक) (दोन) (तीन) मध्ये नमूद तरतुदींशी सुसंगत नसुन अधिनियमाच्या कलम ५ (क) अन्वये प्रकल्पबाधित व्यक्तीने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीस प्रमाणपत्र देतांना कलम २ (२) (अ), २ (२) (क) (एक) (दोन) (तीन) मधील निकष विचारात घेणे बंधनकारक आहे. यास्तव शंभर टक्के जमिन भूसंपादन अथवा किमान भूसंपादनाची मर्यादा लागू ठरत नाही.
८. शासन निर्णय दि ३.५.२०१० अधिक्रमित करण्यात येत आहेत.
९. शासन निर्णय दि १७.०४.२००६ मधील परिच्छेद ४ वगळण्यात येत आहे.
१०. भूसंपादन अधिनियम १८९४ व्यतिरिक्त खाजगी वाटाघाटीने खेरदी केलेल्या जमिनीकरिता प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र अनुज्ञेय नाही.
११. ज्या प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाच्या ऐवजी एकमुस्त मोबदला देण्यात आला असेल त्यांना देखील प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र अनुज्ञेय राहणार नाही.
वरील कार्यपध्दतीचा अवलंब करुन प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही
तातडीने करण्यात यावी.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०१२९१८१७३०७६१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,