अनुकंपा तत्वावरील नियुक्त प्राथ. शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करणेबाबत primary teacher anukamp tet anivarya
प्राथमिक शिक्षक पदावरील अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करणेबाबत.
प्रस्तावना –केंद्र शासनाने दिनांक ३१.०३.२०१० च्या अधिसूचनेव्दारे शिक्षक पदांवर नियुक्तीसाठी पात्रता व सेवाशर्ती ठरविण्याकरीता राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने दिनांक २३ ऑगस्ट, २०१० च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरीता (इ.१ ली ते इ.८ वी) किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य केली आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने शासन निर्णय दिनांक १३.०२.२०१३ व शुद्धिपत्रक दिनांक ०६.०३.२०१३ द्वारे राज्यामध्ये प्राथमिक शिक्षकांकरीता (इ.१ ली ते इ.८ वी) शिक्षकांची किमान व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासनाद्वारे घेण्यात येत असलेली केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्यात आली आहे. शासन निर्णय दिनांक २०.०१.२०१६ अन्वये अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षण सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत घेण्यात आलेला निर्णय राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने निश्चित केलेल्या अर्हतेशी विसंगत आहे. यास्तव अनुकंपा तत्वावरील नियुक्त व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याबाबतची तरतूद करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय –
अनुकंपा तत्वावरील नियुक्त व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे तरतूदी करण्यात येत आहेतः-
१. शासन निर्णय दि.२०.०१.२०१६ मधील परिच्छेद क्र. ३ मधील “मात्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) व केंद्रिय भरतीपूर्व निवड परीक्षा या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून त्यांस सवलत राहील” हा मजकूर वगळण्यात येत आहे.
२. शासन निर्णय दिनांक १३.०२.२०१३ अन्वये राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली असल्याने, शासन निर्णय दिनांक २०.०१.२०१६ अन्वये अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक या पदावर नियुक्ती दिलेल्या व वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी देण्यात आला आहे. अशा शिक्षकांपैकी जे शिक्षक राज्य शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (TET) वा केंद्र शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) उत्तीर्ण झालेले नाहीत, अशा शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा ही अर्हता सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीत धारण करावी.
३. ग्राम विकास विभागाच्या संदर्भाधीन दि.११.१०.२०२२ च्या पत्रान्वये अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. तथापि, शासन निर्णयात तरतूद असल्यामुळे संस्थांनी अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिलेली आहे. परंतु शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यास मान्यता किंवा शालार्थ आयडी दिलेला नाही, अशा उमेदवारांना देखील ३ वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही अर्हता धारण करण्याच्या अटीवर अनुकंपा तत्वावर मान्यता/शालार्थ आयडी देण्यात यावा.
४. तीन वर्षाच्या कालावधीनंतर जे शिक्षक पदावर नियुक्त उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET) किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) ही अर्हता धारण करु शकणार नाहीत, अशा उमेदवारांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करण्यात यावी. तथापि, अशी नियुक्ती अनुकंपा धोरणानुसार झालेली असल्याने त्यांना इतर पदावर नियुक्ती देणेबाबत नियुक्ती प्राधिकारी यांनी कार्यवाही करावी. अशा उमेदवारांची सेवा ज्येष्ठता, सदर प्रवर्गात ज्येष्ठता यादीमध्ये अंतिम क्रमांकावर राहील.
०२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२४०९०२१८३७०८०३२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.