प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांच्या दैनंदिन ऑनलाईन उपस्थितीची नोंद १०० टक्के करणे बाबत pm poshan online presenty update 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांच्या दैनंदिन ऑनलाईन उपस्थितीची नोंद १०० टक्के करणे बाबत pm poshan online presenty update 

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पात्र शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ नियमितपणे देण्यात येतो. सदर लाभाची दैनंदिन माहिती सर्व जिल्हयातील शाळांनी सरल प्रणालीअंतर्गत विकसित केलेल्या एम.डी.एम पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. याकरीता योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शाळांचा समावेश एमडीएम पोर्टलवर असणे व सर्व शाळांनी १०० टक्के उपस्थितीची नोंद करणे अनिवार्य आहे.

माहे एप्रिल, २०२४ पासून संचालनालयामार्फत वेळोवेळी आवश्यक लेखी निर्देश देऊन तसेच ऑनलाईन बैठकांमध्ये जिल्ह्यातील योजनेस सर्व पात्र शाळांनी एम. डी. एम पोर्टलवर १००% दैनदिन उपस्थिती माहिती नोंदविणे आवश्यक असूनदेखील अद्यापही काही जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांनी समाधानकारक प्रगती केलेली दिसून येत नाही. राज्याची दैनंदिन माहिती केंद्रशासनाच्या https://pmposhan- ams.education.gov.in या संकेतस्थळावर १०० % नोंदविली जात नसल्यामुळे केंद्रशासनाने राज्यास सन २०२४-२५ करीता मंजूर करण्यात आलेल्या केंद्र हिस्स्याचा अद्यापही वितरीत केलेला नाही, यामुळे पुढील कालावधीमध्ये योजनेच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. याबाबत मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी नाराजी व्यक्त करुन याकरीता जबाबदार सर्व संबंधितांवर आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

माहे एप्रिल, २०२४ पासून ऑनलाईन उपस्थितीबाबत सर्व जिल्हयांकडे पाठपुरवठा करण्यात येत आहे. तसेच वेळावेळी संचालनालयाकडून घेण्यात येणाऱ्या आढावा बैठकांमध्ये अनेक जिल्ह्यांनी विविध कारणांमुळे स्थानिक पातळीवर, जिल्हास्तरावर शाळांनी सुट्टी घेतली असल्यामुळे AMS प्रमाण कमी असल्याचे कारण नमूद करण्यात येत आहे.

त्यानुषंगाने सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना निर्देशित करण्यात येते की, आपल्या जिल्ह्यांमध्ये मा. विभागीय आयुक्त/मा. जिल्हाधिकारी/मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शाळांना कोणत्याही प्रकारच्या सुट्टया जाहिर केल्या असल्यास अशा प्रकारच्या सुट्ट्यांबाबत संचालनालयास लेखी स्वरुपात शाळांच्या संखेसह पूर्वसूचना देण्यात यावी तसेच स्थानिक पातळीवर कोणत्याही शाळेने अशा प्रकारची सुट्टी घेण्याचे निश्चित केले असल्यास अशा शाळांच्या संखेसह संचालनालयास लेखी स्वरुपात पूर्वसुचना देणे आवश्यक आहे, याची सर्व शिक्षणाधिकारी यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. यापुढील कालावधीमध्ये सर्व शाळांकडून एमडीएम पोर्टलवर १०० % टक्के उपस्थितीची नोंद करणेबाबतची जबाबदारी संबंधित जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेवर निश्चित करण्यात येत आहे.

उक्त निर्देशाप्रमाणे सर्व जिल्ह्यांनी आवश्यक कार्यवाही व उचित सनियंत्रण करावे, यानंतर कोणत्याही जिल्ह्यांकडून उशीराने शाळांना सुट्टी असलेबाबतचे कारण स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच शाळांच्या उपस्थितीची नियमितपणे १०० टक्के नोंद न झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे जबाबदार राहतील, याची गांभीर्याने नोंद घ्यावी.