शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाहीबाबत pavitra portal shikshak bharti
संदर्भ :
१. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्रमांक सिईटी-२०१५/प्रक्र १४९/टिएनटी-१ दिनांक ०७/०२/२०१९.
२. सामान्य प्रशासन विभागाचा एसईबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाबाबतचा शासन निर्णय क्र.बीसीसी-२०२४/प्रक्र ७५/१६-क, दि.२७/०२/२०२४
३. शासन पत्र संकिर्ण-२०२४/प्रक्र ६६१/टिएनटी-१ दिनांक १०/०९/२०२४ ४. शिक्षण संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा-२०२४/टी-४/३०१ दि.२०/०१/२०२५
राज्यातील सर्वस्थानिक स्वराज्य संस्थांच्या/खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील, रात्र शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी, तसेच शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्यादृष्टीने “शिक्षण सेवकांची भरती “अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२” मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे व शासन तरतुदी/विविध न्यायालये यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार करण्यात येत आहे.
त्यानुसार पहिल्या टप्यातील शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यासाठी दिनांक २२/०१/२०२४ पर्यंत पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांच्या जाहिराती घेवून शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मुलाखतीशिवाय-१५०६३ व मुलाखतीसह २७७१ अशा एकूण १८०३४ पदांकरीता उमेदवारांची नियुक्तीकरीता पोर्टलमार्फत शिफारस झाली आहे.
तनंतर, पवित्र पोर्टलवर दिनांक २०/०१/२०२५ पासून दुसऱ्या टप्यातील नव्याने जाहिरातीची कार्यवाही सूरू करण्यात आलेली आहे. पोर्टलवर विविध व्यवस्थापनांच्या जाहिराती येत आहेत. सन २०२४-२५ च्या संच मान्यतांची कार्यवाही झाली आहे. तथापि, सन २०२४-२५ च्या संच मान्यतेमध्ये पदे कमी/अधिक होण्याची शक्यता विचारात घेता काही व्यवस्थापनांकडे पदे कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करुन केवळ उर्वरित रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रकाशित होणे आवश्यक आहे. अतिरिक्त शिक्षक असताना व विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे शिक्षकांची पदे कमी झाली असल्यास अशा संस्थांच्या जाहिराती व प्रत्यक्ष रिक्त पदे यांची खातरजमा आपण तातडीने करावी. तसेच, ज्या संस्थांच्या जाहिरात प्रकाशित झाल्या आहेत त्या संस्थांमधील संच मान्यता २०२४-२५ प्रमाणे मान्य, कार्यरत व रिक्त पदांचा तपशील विचारात घेण्यात यावा. पद रिक्त नसताना जाहिरात प्रकाशित होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. सबब पद मंजूर नसताना अशा प्रकारची पदभरतीची कार्यवाही झाल्यास उमेदवारांना शाळेत रूजू करून घेता येत नाही.
याबाबी विचारात घेता, आपल्या अधिनस्त शाळांतील पदभरतीसाठी पोर्टलवर ज्या व्यवस्थापनांच्या जाहिराती आलेल्या आहेत/येत आहेत, त्या व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये सन २०२४-२५ नुसार मंजूर पदे पडताळून पदभरतीकरीता जाहिरातीची कार्यवाही करावी. पोर्टलवर जाहिराती अंतीम करण्याची कार्यवाही दिनांक १५ एप्रिल, २०२५ पर्यंत पूर्ण करावी.