पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत pavitra portal second tapp teacher bharti
संदर्भ : शासन पत्र क्रमांक संकीर्ण-२०२४/प्रक्र ६६१/टिएनटी-१ दिनांक १०/०९/२०२४
संदर्भीय पत्रान्वये पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त आहेत, त्यानुसार शिक्षक पदभरतीबाबतची कार्यवाही करावयाची आहे. (प्रत संलग्न)
१. बिंदुनामावलीतील त्रुटीबाबत सर्वच जिल्हा परिषदांकडून शहानिशा करणेबाबत मा. मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार १० टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदांचे नियुक्ती प्राधिकारी यांनी बिंदुनामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच यामध्ये कोणत्याही त्रुटी नसल्याबाबत शहानिशा करून तसे प्रमाणित करून १० टक्के रिक्त पदभरतीबाबत कार्यवाही करावयाची आहे. (प्रमाणपत्राचा नमुना सोबत जोडला आहे)
२. भरतीप्रक्रियेमधील अपात्र, गैरहजर व रूजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित पात्र उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरतीप्रक्रियेचाच एक भाग आहे. यानुसार यापुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र, गैरहजर व रूजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहेत, त्यामुळे या पदांची देखील माहिती तयार ठेवावी, जेणेकरून सदर रिक्त पदे नव्याने येणा-या जाहिरातीच्या वेळी विचारात घेता येतील.
३. शासन निर्णय दि.१०/११/२०२२ मधील तरतुदीनुसार पोर्टलवर जाहिराती घेण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्यातील जाहिराती घेवून पदभरतीची कार्यवाही येणार असल्याने आपल्या अधिनस्थ शैक्षणिक संस्थांना याबाबत अद्ययावत बिंदुनामावलीनुसार रिक्त पदे तसेच गट व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्यात. जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत कळविण्यात सर्व शैक्षणिक संस्थांना कळविण्यात यावे.
४. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाकरीता अधिनियम, २०२४ राज्यात दिनांक २६/०२/२०२४ पासून लागू करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय व पत्राद्वारे वेळोवेळी निर्देश दिलेले निर्देश व सूचना विचारात घेवून नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (एसईबीसी) या प्रवर्गाकरीता आरक्षण विचारात घेवून पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करण्यात यावी.
पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीची कार्यवाही करावयाची असल्याने, सदरची कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्यात यावी व पवित्र पोर्टलवर जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर तात्काळ त्यानुसार यापुर्वी जाहिरातीसाठी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी.