दहावीत गणित, विज्ञानात २० गुण तरी ११वीला प्रवेश:सुकाणू समितीचा आराखड्यासाठी प्रस्ताव passing Mark’s sukanu samiti aarakhada
प्रतिनिधी | जळगाव गणित विषय म्हटला की नको ती आकडेमोड, त्या विषयाची भीती वाटते; परंतु ही भीती दूर करण्याचे काम नव्या अभ्यासक्रम आराखड्यात करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कारण, राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील तरतुदीनुसार, विद्यार्थ्यांना दहावी बोर्ड परीक्षेत गणित व विज्ञान या विषयांत ३५पेक्षा कमी आणि २० पेक्षा जास्त गुण मिळाले, तरी विद्यार्थ्याला अकरावीत प्रवेश मिळणार आहे.
परीक्षा पुन्हा देणे अथवा एका विशिष्ट शेऱ्यासह दहावीचे प्रमाणपत्र घेऊन अकरावीसाठी प्रवेश घेणे, असे दोन पर्याय असतील. हा बदल पुढील शैक्षणिक वर्षात होण्याची शक्यता
आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेने तयार केलेल्या तिसरी ते बारावीच्या राज्य अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीने प्रस्ताव दिला. विद्यार्थी गुणवत्तेसाठी राज्य अभ्यासक्रमात सीबीएसईच्या धर्तीवर बदल करण्यात येत आहेत.
हालचाली सुरू : पुढील वर्षी बदलाची शक्यता
दहावीत इतर सर्व विषयांत चांगले गुण मिळाले, मात्र गणित अथवा विज्ञान विषय मागे राहिला. असे अनेक विद्यार्थांच्या बाबतीत घडते. या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान विषयांच्या भीतीमुळे किंवा हे विषय उत्तीर्ण न झाल्याने दहावीनंतरचे शिक्षण थांबवावे लागते, असे निरीक्षणही या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात नोंदवले आहे.
• ज्या विद्यार्थ्यांना अकरावी, बारावीत किंवा भविष्यात गणित व विज्ञान विषयांत करिअर करायचे नसेल आणि फक्त या दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाल्याने त्यांचे शिक्षण थांबणार असेल, तर त्यांच्यासमोर दोन पर्याय असणार आहेत. ज्यात विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देऊन उत्तीर्ण होता येईल.
अनेक विद्यार्थ्यांना आठवीपासून येणाऱ्या बीजगणित, भूमिती यांची काठिण्य पातळी खूप असते. त्यामुळे गणित जमत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी सामान्य गणित असा नवा विषय अस्तित्वात आला होता. मात्र, तो विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही कमी आहे. गणिताप्रमाणेच विज्ञान विषयही काहींना कठीण वाटतो.