शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे ऑनलाईन पध्दतीने कार्यमूल्यमापन अहवाल सादर करणेबाबत online evaluation report
शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल “महापार प्रणालीत” लिहिण्याबाबतची कार्यवाही करणेबाबत. आस्थापना मंडळासमोर ऑनलाईन पध्दतीने कार्यमूल्यमापन अहवाल सादर करणेबाबत
वाचा: १. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक सीएफआर १२१०/प्र.क्र.४७/१३. दि. ०१.११.२०११
२. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: सीएफआर १२११/प्र.क्र.२५७/१३, दि. ७.०२.२०१८
३. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक सीएफआर १२२४/प्र.क्र. १६४/आस्थामं (१३), दिनांक २२.०१.२०२५
शासन परिपत्रक
शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणे याबाबत शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, दिनांक १नोव्हेंबर, २०११ नुसार एकत्रित सूचना निर्गमित केल्या आहेत. तसेच, दिनांक ७ फेब्रुवारी, २०१८ च्या शासन निर्णयान्वये गट-अ आणि गट-ब (राजपत्रित)” संवर्गातील राज्य शासकीय अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल सन २०१७-१८ या प्रतिवेदन वर्षापासून “महापार” या प्रणालीद्वारे ऑनलाईन लिहिण्यात यावेत अशा सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या.
२. तथापि, उपरोक्त सूचनांचे पालन केले जात नाही. तसेच, आस्थापना मंडळासमोर सादर करण्यात येणारे कार्यमूल्यमापन अहवाल हे बहुतांशी ऑफलाईन पध्दतीने नोंदविलेले असतात, असे शासनाच्या निदर्शनास आल्याने दिनांक २२ जानेवारी, २०२५ च्या शासन परिपत्रकान्वये कार्यमूल्यमापन अहवाल ऑनलाईन पध्दतीने नोंदविण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.
परंतु, अद्यापी आस्थापना मंडळासमोर सादर करण्यात येणारे कार्यमूल्यमापन अहवाल हे ऑफलाईन पध्दतीनेच नोंदविल्याचे आढळून आल्याने कार्यमूल्यमापन अहवाल “महापार” या संगणक प्रणालीत नोंदविण्याबाबत सर्व आस्थापना अधिकारी/संस्करण अधिकारी यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे :-
१. आस्थापना मंडळापुढे प्रस्ताव सादर करतांना विचारक्षेत्रातील सर्व अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल हे “महापार” प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीनेच नोंदविलेले असणे आवश्यक आहे. ऑफलाईन पध्दतीने नोंदविलेले कार्यमूल्यमापन अहवाल दि.०१ सप्टेंबर, २०२५ पासून आस्थापना मंडळाच्या बैठकीत विचारात घेतले जाणार नाहीत.
२. सन २०१७-१८ या प्रतिवेदन वर्षापासून गट-अ व गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिका-यांचे कार्यमूल्यमापन अहवाल “महापार” या प्रणालीत लिहीण्यात यावे, अशा सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे, सन २०१७-२०१८ पासूनचे गट-अ व गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिका-यांचे कार्यमूल्यमापन अहवाल ऑनलाईन पध्दतीत उपलब्ध होण्यास्तव, गट-अ व गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिका-यांचे सन २०१७-१८ नंतरचे ऑफलाईन पध्दतीत नमूद केलेले कार्यमूल्यमापन अहवाल Scan करुन महापार प्रणालीवर अपलोड करण्यात यावेत.
३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेताक २०२५०३१९१२३८०९०२०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,