निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांमध्ये जनजागृती करणेबाबत old penshan scheme holder
राज्यातील काही कोषागारांमधून निवृत्तीवेतन/कुटुंबनिवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना अज्ञात व्यक्तींकडून संपर्क साधला जात आहे. ती व्यक्ती निवृत्तीवेतनधारकांना आपणांस सुधारित निवृत्तीवेतनाची फरक रक्कम मिळणार असून त्याअगोदर तुमची वसूली निघत आहे, ती रक्कम तात्काळ ऑनलाईन भरावी, जेणेकरून तुमची फरक रक्कम तुम्हाला मिळेल असे सांगत आहे. काही निवृत्तीवेतनधारकांनी संबंधित व्यक्तीसोबत व्यवहार केले असून ते या फसवणूकीस बळी पडले आहेत.
अशा घटना इतर जिल्ह्यांमध्ये घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आपण आपल्या कोषागारामार्फत प्रेसनोटद्वारे निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना जागृत करावे. अनुषंगाने तसेच निवृत्तीवेतनधारक असोसिएशन यांना सूचित करावे.
निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना करावयाच्या आवाहनाचा नमूना सोबत जोडला आहे.
निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन
अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई / जिल्हा कोषागाराचे अधिनस्त सर्व निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांना आवाहन करण्यात येते की, कोषागारामार्फत निवृत्तीवेतनधारक यांना निवृत्तीवेतन / सुधारित निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन विषयक इतर लाभ प्रदान करण्यात येतात. सदर लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुलीबाबत किंवा प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत कोषागार कार्यालयामार्फत फोन करून संपर्क साधला जात नाही किंवा ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सूचित केले जात नाही. कोषागार कार्यालयामार्फत फक्त लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केला जातो.
याबाबत काही निवृत्तीवेतनधारकांना फोन करून ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोषागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जाते आहे. याबाबतच्या तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. अशा कोणत्याही प्रकारचा फोन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत केला जात नाही किंवा कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकांच्या घरी पाठविले जात नाही.
सर्व निवृत्तीवेतनधारक व कार्यरत कर्मचारी यांना आवाहन करण्यात येते की, आपणांस दूरध्वनी / भ्रमणध्वनीवरून उपरोक्त प्रदानासंदर्भात संपर्क साधून रक्कम ऑनलाईन, गुगल पे, फोन पे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे भरणेबाबत जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत कळविले जात नाही. तरी कोणीही अशा दूरध्वनी संदेशास प्रतिसादर देऊ नये. याबाबत निवृत्तीवेतनधारकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती निवृत्तीवेतनधारकाची वैयक्तिक जबाबदारी राहील, याची नोंद घ्यावी. तसेच अशा प्रकारच्या दूरध्वनी प्राप्त झाल्यास कृपया कोषागार कार्यालयास अवगत करावे. तसेच कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथमतः कोषागार कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा. असे आवाहन अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई / – जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी / जिल्हा कोषागार अधिकारी व अपर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) यांचेकडून करण्यात येत आहे.