DCPS\NPS अंतर्गत शासनाचे अंशदान व त्यावरील व्याज / लाभ इ.रकमा शासनाचे लेख्यात समायोजित करणेकरिता लेखाशीर्ष निश्चित करण्याबाबत national pension scheme dcps
परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत शासनाचे अंशदान व त्यावरील व्याज / लाभ इ.रकमा शासनाचे लेख्यात समायोजित करणेकरिता लेखाशीर्ष निश्चित करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक रानिप्र-२०२४/प्र.क्र.४५/सेवा-४
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई
दिनांक : ०१.०१.२०२५.
शासन परिपत्रक :
दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी संदर्भ क्र.१ अन्वये नवीन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना लागू करण्यात आली असून योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपध्दती संदर्भ क्र.२ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आली आहे.
२. परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना संदर्भ क्र.५ च्या शासन निर्णयान्वये दि.०१.०४.२०१५ पासून केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीत समाविष्ट करण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर राज्य शासनातील कर्मचाऱ्यांसाठी तसेच महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांना लागू असलेल्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीच्या (NPS) (स्तर-१) अंमलबजावणीची कार्यपध्दती संदर्भ क्र.६ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आली आहे. परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ लागू करण्यात आली आहे. अशा प्रकरणी शासनाचे अंशदान व त्यावरील लाभ / व्याज शासनाच्या लेख्यात जमा करण्याचे खालीलप्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.
शासन निर्णय इथे पहा
(१) परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजने अंतर्गत दि.०१.११.२००५ रोजी किंवा तद्नंतर राज्यातील दुसऱ्या सेवेत रुजू झालेल्या ज्या अधिकारी / कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ च्या तरतुदी लागू ठरल्या आहेत, अशा अधिकारी / कर्मचारी यांची परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजनेखाली वर्गणी कपात करण्यात आली असल्यास वित्त विभाग, शासन निर्णय क्र. अंनियो-१००९/ प्र.क्र.१/सेवा-४, दि.१२.११.२०१० सोबतचे जोडपत्र-१ मधील ५ (ड) नुसार सदर कर्मचाऱ्यास केवळ त्याचे अंशदान व त्यावरील शासन परिपत्रक क्रमांकः रानिप्र-२०२४/प्र.क्र.४५/सेवा-४ व्याज देय ठरते, अशी तरतूद आहे. तथापि, सदर प्रकरणी शासनाचे / नियोक्त्याचे अंशदान व त्यावरील व्याजाची रक्कम खालील नमूद मुख्य लेखाशीर्षा अंतर्गत शिल्लकी जमा राहते.
(२) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. अंनियो-२०१७/प्र.क्र.२६/ सेवा-४, दि.२८.०७.२०१७ मधील भविष्य निर्वाह निधी योजना लागू झालेल्या प्रकरणी सभासदास शासनाचे अंशदान व त्यावरील व्याज अनुज्ञेय होत नसून फक्त सभासदाचे स्वतःचे अंशदान व त्यावरील व्याज देय होते, अशी तरतूद नमूद आहे. अशा प्रकरणी केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण यांचेकडे सभासदाच्या प्रान क्रमांकावर जमा असलेला संचित निधी (Accumulated Fund) संबंधित कोषागार अधिकारी ERM सुविधेद्वारे परत मागवून प्राप्त रकमांचे दोन भाग करुन प्रथम भाग मुख्य लेखाशीर्ष ८००९-राज्य भविष्य निर्वाह निधीमध्ये चलनाने जमा करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांना रक्कम वर्ग करतात. कोषागार अधिकारी वरील रकमेचा दुसरा भाग राज्य शासनाच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेतील नियोक्त्याच्या अंशदानाच्या संकेतांकाखाली शासन लेख्यामध्ये जमा करेल, अशी तरतूद आहे.
(३) वित्त विभाग, शासन निर्णय क्र. रानियो-२०२२/प्र.क्र.३४/ सेवा-४, दि.३१.०३.२०२३ अन्वये परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीअंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान इ. लाभ अनुज्ञेय करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, संबंधित रुग्णता सेवानिवृत्त कर्मचारी / मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला प्रदान करण्यात आलेला शासन अंशदानाची रक्कम व त्यावरील व्याज / लाभ इ. संबंधित रुग्णता सेवानिवृत्त कर्मचारी / मृत कर्मचाऱ्याचे कुटुंबिय यांचेकडून वसुल करुन शासन लेख्यात जमा करण्याकरिता वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. रानिप्र- २०२३/प्र.क्र.५७/सेवा-४, दि.२४.०८.२०२३ व शासन शुध्दीपत्र दि.२०.११.२०२३ अन्वये खालीलप्रमाणे नवीन लेखाशीर्ष देण्यात आले आहेत.
(४) परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीअंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ लागू करण्यात आली आहे. अशा प्रकरणी शासनाचे अंशदान “००७१- निवृत्तिवेतन व इतर सेवानिवृत्ती लाभांच्या संबंधातील अंशदानाच्या व वसुलीच्या जमा, (०१) नागरी, (१०१) अभिदाने व अंशदाने, (०१) अभिदाने व अंशदाने, (०१) (१४) परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची समायोजनामुळे होणारी जमा रक्कम (००७१०२५३०१)” या लेखाशीर्षाखाली जमा करण्यात यावे तसेच शासनाच्या अंशदानावरील व्याज “००४९ व्याजाच्या जमा रकमा, (०४) राज्य / संघराज्य क्षेत्र विधानमंडळ असलेल्या शासनाच्या व्याजाच्या जमा रकमा, (८००) इतर जमा रकमा, (०१) इतर जमा रकमा, (०१) (५४) परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानावरील व्याज (००४९५१३४०१) या लेखाशीर्षाखाली जमा करण्यात यावे.
३. जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय विद्यालये तसेच कृषि विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना वरील परिपत्रक योग्य त्या फेरफारांसह लागू राहील.
४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२५०१०११२३६२३९८०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,