सुंदर लेख “व्हॉट्स ग्रुप अन् मैत्री” सोशियल मिडियाचे फायदे motivational sundar lekha
Social media चे फायदे भरपुर आहेत, फक्त त्याचा योग्य रित्या वापर करता आला पाहिजे. फेसबुक द्वारे अनेक जुन्या सहकाऱ्यांचा पत्ता लागला मला, अन् मग WhatsApp पर्व सुरू झाले, ह्यात msgs द्वारे विचारपूस, शुभेच्छा, श्रद्धांजली, इत्यादींचे आदानप्रदान सुरू झाले, प्रत्यक्षातल्या भेटीगाठी दुरावल्या, भावनिक ओलावा कमी जाणवु लागला, असो, काही का असेना संपर्क मात्र जिवंत आहे.
हळु हळु WhatsApp चे सोयीनुसार ग्रुप बनु लागले, काय कळवायचं ते एका msg द्वारे चुटकीसरशी त्या ग्रुप मधील सदस्यांना कळविण्यात येऊ लागले, अच्छी बात है. मोजक्या मित्रांचे, नातेवाईकांचे ग्रुप चांगले असतात, त्यातील संभाषण मर्यादेत असत, मुद्देसुर असत, त्यात कोणी वाहवत नाही. तसेच गृह संकुल सोसायटी चे ग्रुप्स असतात, तेथे जास्त करून सोसायटीच्या कामाबद्धलचे/ सणांच्या शुभेच्छा, प्रसंगी वैयक्तिक मदतीची साद इत्यादी पुरती मर्यादित असत, हे पण गरजेचे व ह्या ग्रुप ला पण ना नाही.
शाळेतील ग्रुप मात्र नकोसे करून सोडतात. ह्याचा अनुभव बहुतेकांना आला असेल, मला तरी आला. ह्या ग्रुप मधे फक्त मोजकेच सुसाट असतात, त्यांना काय करू नी काय नाही अस झालं असतं, काही वाहवत सुटतात, त्यांना कसलच भान नसतं. ह्या ग्रुपचा मुख्य फायदा हा की तुमच्याकडे ज्यांचा फोन नंबर नसेल तो प्राप्त होतो जेणे करून तुम्ही त्यांच्याशी जोडले जाऊ शकता. ग्रुपच्या प्लॅटफॉर्मवर चार चौघात चर्चा करण्यापेक्षा, विचारपुस करण्यापेक्षा प्रत्यक्षात फोन वर बोलुन जवळीक वाढवा की, पण तसे न होता ग्रूपवर आपुलकीचे प्रदर्शन काही लोक मांडतात व त्याची अतिशयोक्ती होते जे बहुतेकांना रुचत नाही, सांगणार कोण ह्यांना, मुख्य म्हणजे ह्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच असते, एक ते दोन प्रतिशत एवढी असते, पण ही मंडळी इतरांना नकोस करून सोडतात.
ग्रुप मधे बडेजावपणा नसावा, मी मी पणा नसावा, शाळेतून बाहेर पडल्यावर कोणी हुशार राहत नाही अन् कोणी ढ हे ध्यानी असाव. ग्रुप करण्याचा हेतु चांगला असतो पण त्याकडे दुर्लक्ष होत. वयाच्या ह्या टप्प्यात सर्वच आपापल्या परीने स्थिरावले असतात, अशा वेळेस ह्या प्लॅटफॉर्म वर येऊन उगाच विषमता वाढवू नये. सर्व शिक्षक आपापल्या परीने चांगले असतात, ग्रुप मधे त्यांच्याबद्दल चांगल बोला, ते सर्वच high profile असतात / होते, उगाच कोणाला low profile म्हणुन हिणवू नये. जे हयात नाही त्यांच्याबद्दल चार चौघात वाईट बोलू नये ही साधीशी गोष्ट आहे. कोणालाही कमी लेखू नये, जे ग्रुप मधुन बाहेर पडतात त्यांचा पण आदर राखला गेला पाहिजे.
तसे बघितल तर ह्या डिजिटल युगात कोणाला शोधणं एवढ कठीण नाही, शोधुन वैयक्तिक रित्या WhatsApp द्वारे फोनवर बोलू शकता, भेटू शकता, असो.
मुळात मित्र, मैत्रीण कोणाला म्हणावं?
मित्र, मैत्री हे आहेत छोटेखानी शब्द पण वजनदार आहेत. वर्गात असंख्य मुल असतात, त्यांना आपण बोलतांना सहजरीत्या मित्र म्हणुन संबोधतो, पण ते सर्वच मित्र नसतात, त्यांना वर्ग सहकारी, शाळेतला सहकारी अस म्हणु शकतो, त्यातले काही मोजकेच पुढे शेवट पर्यंत आपल्या संग मित्र म्हणुन राहतात.
माझे शिक्षण जबलपुर येथे झाले. शालेय जीवन १९६५ ते १९७५. वर्गात अनेक मुले होती, तेंव्हा सर्वांशी जवळीक होती, पण पुढे काहीच संपर्कात राहिले ते आजतोवर, त्यांच्याबरोबर पारिवारिक संबंध तेंव्हापासून ते आजतोवर आहेत.
जबलपुर येथील काही शाळकरी संपर्कात आहेत माझ्या. इच्छाशक्ती असेल तर हल्ली संपर्क चुटकीसरशी होतो, त्यासाठी कुठल्या WhatsApp ग्रुपची गरज भासत नाही.
सांगण्याचे तात्पर्य हेच की ओळख म्हणजे मैत्री नव्हे, मैत्री ही अशी भावना आहे जी दोन मित्रांना अंतःकरणापासून जोडते. खरा मित्र निस्वार्थ असतो. जेव्हा त्याची गरज भासते तेव्हा तो नेहमीच मदत करतो. एक खरा मित्र नेहमी त्याच्या मित्राला योग्य गोष्टी करण्याचा सल्ला देतो. परंतु या जगात खरा मित्र लाभणे फार कठीण आहे. फेसबुक वर असंख्य मित्र असतात, ते ओळखीचे म्हणा, मित्र मोजकेच. मी बिझनेस मधे असतांना दांडगा संपर्क होता पण ते मित्र नव्हे तर फक्त कामापुरती होते, हे मला चांगल ठाऊक होत.
कुठलेही नाते मग ते मैत्रीचे असु द्या, निभावणे कठीण असतं.
मैत्री ह्या सुंदर नात्यावर पु. ल. देशपांडे यांनी लिहिले:
मैत्री एक सोपी व्याख्या आहे…. “रोज आठवण यावी असं काही नाही, रोज भेट व्हावी असं काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काहीच नाही, पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री.”
शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्त्वाचं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूसपण जाणलं….. अशा सर्व मित्रांना माझ्या शुभेच्छा. ही नाती टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या.
संकलन A.K.PATIL