सुंदर लेख…घे जन्म घे तू फिरुनी !! ‘आई’ – एक नितांत सुंदर शब्द motivational sundar lekha 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सुंदर लेख…घे जन्म घे तू फिरुनी !! ‘आई’ – एक नितांत सुंदर शब्द motivational sundar lekha 

‘आई’ – एक नितांत सुंदर शब्द. आई असताना या शब्दाची खरी किंमत कळायचं वय नव्हतं म्हणा किंवा कुवत नव्हती आणि ज्यावेळेला या शब्दाची खरी किंमत कळली तेव्हा मात्र आई खूप दूरच्या प्रवासाला निघून गेली होती – पुन्हा कधीही परत न येण्यासाठी…
माझी आई – प्रसिद्ध इतिहास संशोधिका, ‘शिवपुत्र संभाजी’ या चरित्रात्मक ग्रंथाची लेखिका कै. डॉ. सौ. कमल गोखले. ११ ऑक्टोबरला तिला जाऊन दहा वर्ष झाली पण तरीसुद्धा तिच्या विषयीच्या सर्व आठवणी अगदी ताज्या आहेत. काल परवापर्यंत ती आमच्यातच होती असं अजूनही वाटतं. प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणी आई नसल्याची बोच मात्र सलत राहते.
हे वर्ष छत्रपती संभाजी महाराजांचे त्रिशताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं जातं आहे. आई आज हयात असती तर तिनं त्रिशताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांमध्ये उत्साहानं भाग घेतला असता हे जाणवल्याशिवाय रहात नाही.
खरंतर तिचं आयुष्य ऐषोरामात गेलं नाही. खूप सोसावं लागलं तिला. सुखदुःखाचे क्षण, सतत कष्ट, हाल अपेष्टा, अपमान, मानहानी या सर्व गोष्टींनी तिला व्यवस्थित सोबत केली. काहीजणांचं आयुष्यच असं असतं- अनेक कष्ट सोसल्याशिवाय त्यांना सुखाचं दर्शनही होत नाही.
आईचं लग्न झालं तेव्हा तिचं कॉलेजचं फक्त एक वर्ष पूर्ण झालं होतं. लग्नानंतरच तिनं सर्व शिक्षण पूर्ण केलं. बी.ए झाल्यानंतर पीएच. डी च्या प्रबंधासाठी तिनं ‘छत्रपती संभाजी’ हा विषय निवडला. त्याकाळी बी. ए नंतर पीएच. डी करता येत असे. संभाजी राजांवरील प्रबंधासाठी तिनं नऊ दहा वर्ष संशोधन केलं. खूप परिश्रम घेतले. हा प्रबंध पूर्ण करता आलेल्या अनेक अडचणींना तिनं जिद्दीनं तोंड दिलं. अर्थात या कामी तिला माझे वडील श्री. पु. गोखले यांनी भरपूर प्रोत्साहन दिलं, तिचा उत्साह वाढवला. तिला सर्वतोपरी साहाय्य केलं.

प्रबंधच पळवला
हा प्रबंध मान्य होण्यापूर्वीच आजच्या एका नावाजलेल्या महान (?) लेखकानं पळवून नेला. शेवटी कोर्ट कचेऱ्यांचा धाक दाखवून आईचा तो प्रबंध परत मिळवावा लागला. आईचा ग्रंथ प्रसिद्ध होईपर्यंत संभाजीराजांवर एकही अक्षर लिहायचं नाही असं त्या व्यक्तीकडून कबूल करून घ्यावं लागतं. अन्यथा तिच्या इतक्या वर्षांच्या मेहनतीवर पाणी पडलं असतं. पण मला कौतुक वाटलं ते एका गोष्टीचं की माझ्या आई वडिलांनी त्या व्यक्तीच्या नावाचा कुठेही उल्लेख केला नाही.
तिचा ‘छत्रपती संभाजी’ हा प्रबंध मान्य झाल्यानंतर तिनं त्याला पुस्तक रूप द्यायचं ठरवलं. पण घरच्या अनेक कटकटी तसंच बाहेरचे मनस्ताप देणारे लोक यामुळे पुस्तकाला पाहिजे तसा वेग येत नव्हतं. त्यामुळे माझ्या वडिलांनी तिला थोडे दिवस वाईला जाऊन राहायचा सल्ला दिला. माझे वडील पंधरा दिवस वाईला तर पंधरा दिवस पुण्याला असे जाऊन येऊन असत. कारण आम्ही भावंडं त्यावेळी पुण्यातच होतो.
वाईच्या विश्वकोश कार्यालयात आई काम करत असे तसंच वाई कॉलेजमध्येही.

रिकाम्या गोठ्यात संसार
आई वाईला गेली पण तिला तिथं राहायला जागा मिळेना. एक पूर्वीचा रिकामा गोठा मिळाला. तिथंच आईनं आपला संसार थाटला. ते घर तिला शेणानं सारवावं लागे. पण तिला त्यात कधी कमीपणा वाटला नाही आणि म्हणूनच तिला तिचं ध्येय गाठता आलं. कुठलंही हलकं काम करायला जशी तिला कधी लाज वाटली नाही तसाच तिनं कुठल्या गोष्टीचा कधी गर्व बाळगला नाही. खरंतर गर्व हा शब्द तिच्या कोशातच नव्हता.
आई वाईला गेल्यानंतर सहा सात महिन्यांनी मीही तिकडे राहायला गेले. आई बरोबरचा माझा हा काळ खूपच मजेत गेला. मी जवळजवळ तीन वर्ष आईबरोबर राहिले. त्यानंतर एक वर्षानी आई पुण्याला परत आली. मी वाईला गेले तेव्हा आठ नऊ वर्षांची होते. केस विंचरणं, वेगवेगळे कपडे घालणं, त्या वयातला तो नट्टापट्टा माझा मीच करायची. आई म्हणायची, “तू अगदी स्वयंभू आहेस”. आता वाटतं की मी तशी नसते तर आईचा हात माझ्या अंगा खांद्यावरून खूपदा फिरला असता कारण ते सुख माझ्या फार काळ नशिबी नव्हतं.
गोठ्यातल्या वास्तव्यानंतर पुढे आम्हाला एक छान घर मिळालं. खाली दोन खोल्या आणि पहिल्या मजल्यावर दोन खोल्या असं चार खोल्यांचं छानसं घर होतं ते.
ती जशी आदर्श माता होती तशीच उत्तम गृहिणी होती. आल्या गेल्या प्रत्येकाचं ती अतिशय अगत्यानं स्वागत करत असे. प्रत्येकाची आवडनिवड सांभाळत असे.
कुणाच्याही अडीअडचणीच्या वेळी तिचा मदतीचा हात सदैव पुढे असे. आम्ही वाईला असताना आठ-दहा वर्षांचा एक मुका मुलगा नेहमी आमच्या घरी यायचा. त्याच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. त्याला थोडंफार शिकवण्याची आस्थासुद्धा त्याच्या आई वडिलांनी दाखवली नव्हती. तो मुलगा आमच्या चहाच्या, खायच्या वेळी दारात येऊन उभा राहायचा. आई त्याला आत बोलावून खायला द्यायची. पुढे ती त्याला खायला केलं की रोजच हाका मारू लागली. नंतर तिनं त्याला पुण्याला आणलं. मूकबधिर मुलांच्या कामायनी शाळेत घातलं. आमच्या घरी आल्यानंतरच तो मुलगा पहिला शब्द बोलला. आता तो स्वतःच्या पायावर उभा आहे. हाच मुलगा आई गेल्याचं वर्तमानपत्रात वाचून साताऱ्याहून आम्हाला भेटायला आला होता.
अनेकांसाठी अनेक गोष्टी केल्या तिनं. बाहेरगावी राहणाऱ्यांची लग्न पुण्यात ठरली म्हणून घरच्या लग्नासारखी सर्व तयारी आईनं केली. करायला कोणी नाही म्हणून अनेकींची बाळंतपणंं केली. (याबाबतीत मात्र मी कमनशिबी ठरले. मी बोहल्यावर चढले आणि वडिलांना कमरेला सुपारी बांधावी लागली. ) हे सर्व व्याप ती आपला अभ्यास, संशोधन सांभाळून करायची. एकदा कामाला लागली की समरसून काम करायची. जुनी कागदपत्रं वाचता यावीत म्हणून ती मोडी लिहायला, वाचायला शिकली. फ्रेंच, पोर्तुगीज भाषेचा अभ्यास केला. कुठेही जुन्या कागदपत्रांचं दफ्तर आहे असं कळलं की तिच्या उत्साहाला उधाण येत असे. अनेक वर्ष बंदिस्त असलेल्या कोळीष्टकं, पाली, झुरळं असलेल्या कुबट खोल्यांमध्ये बसून ती कागदपत्रं शोधून आणायची. असाच एकदा इतिहासकारांच्या आनंदाचा सर्वोच्च क्षण तिला गवसला- तिला छत्रपती शिवाजी महाराजांचं पत्र मिळालं आणि तिच्या आनंदाला सीमा उरली नाही. त्यानंतर महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार म्हणाले, “ही कमल खरोखरच नशीबवान आहे. आज इतकी वर्षे आम्ही या क्षेत्रात असून आम्हाला असे भांडार कधी गवसले नाही. अतिशय कठोर, रुक्ष समजल्या जाणाऱ्या पोतदारांनी आईवर मुलीसारखं प्रेम केलं. महामहोपाध्याय पोतदारांच्या, शिवचरित्र कसं असावं याबाबत काही कल्पना होत्या. त्या संकलित करून तिनं ‘शिवचरित्राचे पैलू’ या पुस्तकाद्वारे वाचकांच्या आणि अभ्यासकांच्या समोर ठेवल्या.
बी.ए, पीएच. डी झालेली माझी आई, पुणे विद्यापीठाच्या कायद्यात बसत नाही म्हणून वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी एम. ए झाली. त्यावेळी तिचे काही विद्यार्थीही तिच्याबरोबर परीक्षेला होते. ती काही वर्ष चिंचवड कॉलेजमध्ये, काही वर्ष एस.एन. डी. टी कॉलेजात आणि पुढे वाडिया कॉलेजमध्ये इतिहास विभाग प्रमुख म्हणून काम करत होती.

शिवपुत्र संभाजी
दिडशेही प्रती खपणार नाहीत असा अंदाज वर्तवलेल्या तिच्या ‘शिवपुत्र संभाजी’ या ग्रंथाची तिसरी आवृत्तीही आता संपत आली आहे. अनेकांची मागणी आणि सुचनांमुळे संभाजीराजांवर तिनं इंग्रजीतही पुस्तक लिहिलं- ‘छत्रपती संभाजी’. इंग्रजीत संभाजीराजांवर लिहिलं गेलेलं हे पहिलं पुस्तक. अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी तिनं ‘मानवाची कहाणी’ हे पुस्तक लिहिलं. याशिवायही अनेक विषयांवर विपुल लेखन केलं.
कराची, अंबाल्याला बालपण गेलेली, कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली माझी आई, जिला सुरुवातीला मराठी लिहितानासुद्धा अडचण यायची, ती पुढे एवढा मोठा ग्रंथ लिहिलं, एक उत्कृष्ट व्याख्याती होईल असं कोणाला वाटलंही नसेल. व्याख्यानांसाठी ती गावोगावी हिंडली. अनेक विद्यापीठांमध्ये तिच्या व्याख्यानांची सत्र झाली. नेपाळ, श्रीलंकेसारख्या सुदूर ठिकाणी झालेल्या परिषदांमध्ये भाग घेऊन तिनं सगळ्यांची वाहवा मिळवली.
मला आठवते ती संभाजीराजांवरच्या व्याख्यानाचा शेवट ‘नैनं छिंदंति शस्त्राणि नैनं दहति पावक:’ असा करून पाणावलेल्या डोळ्यांनी व्यासपीठावर उभी असलेली उत्कृष्ट व्याख्याती – माझी आई.
मूर्ती लहान पण कीर्ती महान ही उक्ती सार्थ करणारी माझी आई. तिनं केलेल्या कर्तृत्वानं तिला खूप मोठी उंची दिली. तिचं ऐतिहासिक क्षेत्रातलं कार्य इतकं मोठं आहे की आज संभाजी महाराजांबद्दल कोणालाही काही लिहायचे असेल तर तिच्या ‘शिवपुत्र संभाजी’ या पुस्तकाचा अभ्यास करावाच लागेल. संभाजी राजांवरील कलंक धुऊन टाकण्याचं श्रेय वा. सी. बेंद्रे आणि त्यांच्यानंतर आईनं केलेल्या संशोधनालाच द्यावं लागेल.
तिला मरण आलं ते केवळ बावन्नाव्या वर्षी. कॅन्सरसारख्या दुर्धर रोगालाही ती हसतमुखानं सामोरी गेली. शिवचरित्र, अहिल्याबाई होळकरांचं चरित्र हे तिचे संकल्प मात्र अधुरेच राहिले.
माझ्या आईच्या आठवणींची सोबत घेऊनच मला माझं सारं आयुष्य काढायचं आहे. तिला परत बोलावण्याचा कुठलाच उपाय माझ्याजवळ नसला तरी एकच मागणं आहे – घे जन्म तू फिरुनी, येईन मीही पोटी…
संकलन A.K. Patil