मार्मिक लेख…कृतिशील व्यक्ती इतिहास रचतात. तत्वज्ञानी व्यक्ती समाज घडवतात motivational marmik lekha
कृतिशील व्यक्ती इतिहास रचतात. तत्वज्ञानी व्यक्ती समाज घडवतात. पण . . .
इतिहासात तीच लोकं दैवत्वाला पोहचतात जे तत्त्वज्ञान आणि कृती ह्या दोघांची सांगड घालताना दिसतात . . .
श्रीरामा पासून ते अगदी शिवाजी महाराजांपर्यंत आपल्या भारतात उदाहरणं सापडतात. ह्यापैकी कोणीही व्यक्ती महान होण्यासाठी , इतिहासात अमर होण्यासाठी काही करत नाहीत. तर ते स्वतः त्यांचा जो उद्देश्य असतो ते बनतात. जसं की राम म्हणजे आदर्श , कृष्ण म्हणजे कर्मयोग , हनुमान म्हणजे ब्रह्मचर्य , शिवाजी म्हणजे स्वराज्य. त्यांचा उद्देश्य त्यांच्या पासून भिन्न करताच येत नाही . . . त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक कंगोरे असतील परंतु उद्देश्य केवळ एक असतो. बुद्धी जितक्या कमी गोष्टीत विभागली जाईल महानता तितक्याच लवकर मिळेल. सांगायची गोष्ट ही की एखादा अभिनेता केवळ अभिनयावर संपूर्ण आयुष्य घालवतो आणि त्यात महान बनतो. अभिनय एवढं एकच त्याचं उद्देश्य असतं. एखादा पैशा कमविण्यासाठी आयुष्य वेचतो , त्याचा उद्देश्य केवळ नफा असतो , इतर काहीही नाही. एलोन मस्कचं केवळ एका शब्दात वर्णन करायचं झालं तर इनोवेशन ह्या एका शब्दात ते होतं , बाकी तो अनेक क्षेत्रात यशस्वी असेल पण त्या सर्व गोष्टी दुय्यम.
तसं आपल्या आयुष्यात विचार करता आपली बुद्धी हजारो गोष्टींमधे विभागली जाते. कुटुंब , नोकरी , छंद , मित्र , मौज मजा , शिक्षण , इत्यादी. हे सगळं सांभाळण्याच्या नादात आपला उद्देश्य बाजूला राहतो. एका पासून हजारो गोष्टीत मन विभगलं जातं. त्यामुळं आपण सर्वसाधारण मनुष्य म्हणून जगतो. दैवत्व प्राप्त झालेल्या लोकांची जर आयुष्य आपण नीट अभ्यासलं तर आपल्याला समजेल की त्यांचं कौटुंबिक आयुष्य , वैयक्तिक आयुष्य असं काही नसतच. कोणीही कधीच सारं काही कधीही मिळवू शकत नाही… महानता आणि सांसारिक सुख दोन्ही एकाच मार्गावर मिळत नाही.
तुम्हाला मार्ग निवडावा लागतो. महानतेचा किंवा दैवत्वाचा मार्ग निवडताना तुम्ही असं म्हणू शकत नाही की थोडसं कुटुंबाला , किंवा मित्रांना ही वेळ दिला पाहिजे.नाही. थोडसं किंवा जास्त असं काही नाही. एकतर तुम्ही महानता निवडता किंवा सांसारिक सुख…. मुळात महानता नीवडणं सोपी गोष्ट आहे. कोणीही निवडू शकतं. पण त्यावर टिकून राहणं कठीण काम असतं. प्रलोभनं आपल्या समोर थय थय नाचून आपली तपश्चऱ्या भंग करतात. इतकंच काय तर आपलं मन सुद्धा आयुष्य सुखकर जगण्यासाठी वेगवेगळी कारणं देत असतं. मनाला वेगवेगळ्या गोष्टींचं आकर्षण होतं. हे नवीन आहे. आयुष्य एकदाच असतं. थोडसं फिरायला पाहिजे , आराम पाहिजे , अमुक अशी नोकरी पाहिजे किंवा बिंजनेस पाहिजे , मित्रांसोबत बसायला पण मिळालं पाहिजे , कुटुंबालाही वेळ दिला पाहिजे… आणि सोबत मनाला महानता ही पाहिजे… नाही हे शक्य नाही. कोणाच्यातरी मनाला महानता पाहिजे म्हणून महानता मिळत नाही… मन जेव्हा फक्त एकच उद्दिष्टासाठी समर्पित असतं तेव्हा दैवत्व/ महानता मिळते. इथं यश , अपयशाची गोष्ट नाही. यश अपयश हे लोकं ठरवतात पण दैवत्व हे काळ ठरवतं. अखंड मानवजातीच्या हिताचा विचार करणारी , काळाच्या पुढचा विचार करणारी लोकं , त्यांच्या वर्तमान काळात अपमानित होत राहतात , झिडकारली जातात. शिवाजी महाराजांविरोधात अनेक मराठे सरदार सुद्धा होते , कृष्णाला यादवांचा विरोध होता. कोणाच्याही सख्याची नसणाऱ्या अयोध्येच्या जनतेने श्रीरामाला आत्मत्याग करायला भाग पाडलं.
सामान्य माणसं ही दैवत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना सुद्धा समाज छळतो आणि त्याला कंटाळून ते पुन्हा सामान्य जीवन जगतात. म्हणूनच दैवत्व हे जन्मजात असतं किंवा त्याला अवतार वगेरे म्हणलं जातं कारण ते सर्वांनाच जमत असून सुद्धा ते त्या मार्गावर टिकू शकत नाहीत.
आपले राजकारणी ह्याच पेचात अडकलेत. त्यांना शिक्षण सम्राट , समृद्धी सम्राट , कर्मयोगी , ही व्हायचंय , त्यांच्या पोरांना परदेशातही शिकवायचय आणि महान पण व्हायचंय… त्यांना कुटुंब आणि महानता दोन्ही हवं असतं… त्यामुळं ना धड त्यांना कौटुंबिक सुख मिळतं ना महानता. आपल्या सारख्या सामान्य लोकांनाही सुख हवं असतं दैवत्व नाही.
आपण म्हणतो शंकर देव आहे म्हणून त्याने विष प्राशन केलं पण तसं ते नाही , शंकराला सुद्धा दैवत्वा साठी विष प्यावं लागलं. आपल्या पौराणिक कथेमध्ये काही न काही छुपे संदेश असतात , इथं विष म्हणजे यातना . . . जो सर्व जगाचे दुःख कमी होण्यासाठी यातना सहन करतो तो महादेव म्हणवतो . . . महादेवाने त्याच्या खाजगी परिवाराचा विचार केला नाही , स्वतःचा विचार केला नाही , म्हणूनच त्याला दैवत्व प्रदान झालं.
याचा अर्थ असा नव्हे की लगेच समाजकार्य करत सुटायचं , पण
आपल्याला ही जर दैवत्व मिळवायचं असेल तर सगळ्या गोष्टींचा त्याग करून त्या एका गोष्टीवर बुद्धी केंद्रित व्हायला हवी ज्यात आपल्याला दैवत्व हवं आहे…
संकलन A.K.PATIL