राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांमध्ये वैद्यकिय आपत्कालिन परिस्थितीत अनुसरावयाच्या कार्यपध्दीतीबाबत medical emergency follow in school
संदर्भ :दिनांक : २९ ऑक्टोबर, २०२४
मा. उच्च न्यायालय मुंबई यांचे दि.२२.०४.२०२४ व २४.०६.२०२४ रोजीचे आदेश
प्रस्तावना :-
राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व शाळांमध्ये दररोज किमान सहा ते सात तास विद्यार्थी उपस्थित असतात. या कालावधीत काही विद्यार्थ्यांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते. अशा वेळी शाळेच्या नजीक वैद्यकीय सुविधा असेलच असे नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत शाळा प्रशासनाने समयसूचकता दाखवून तातडीने आवश्यक कार्यवाही केल्यास विद्यार्थ्याला वैद्यकीय मदत मिळून अप्रिय घटना टाळता येतील. विद्यार्थ्यांना तात्काळ वैद्यकीय मदत पुरविण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी सहका-यांनी त्याबाबतीत नेहमी सजग असणे आवश्यक आहे.
उपरोक्त बाबींचा विचार करता सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना तातडीच्या काळात वैद्यकीय सुविधा देण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.
शासन निर्णय :-
शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व शाळांनी तातडीच्या काळात विद्यार्थ्यांना
आवश्यक वैद्यकीय सोयीसुविधा देण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. १. शाळेमध्ये प्रथमोपचाराकरीता आजारी विद्यार्थ्यांना तातडीची वैद्यकीय व्यवस्था करण्यासाठी
लागणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात.
२. शाळांत संबंधित प्राधिकरणांच्या मानकांनुसार तातडीने प्रथमोपचाराकरीता आजारी विद्यार्थ्यांना तातडीची वैद्यकीय व्यवस्था करण्यासाठी First aid/sick room याकरीता खोली उपलब्ध असावी.
३. शाळेत आवश्यकतेनुसार प्रथमोपचार पेट्या (First Aid Kit) ठेवाव्यात.
४. शाळेतील विद्यार्थी / कर्मचाऱ्यांकरीता दरवर्षी कमीत कमी एक वैद्यकीय प्रथमोपचार प्रशिक्षण व
वैद्यकीय तपासणी शिबीर आयोजित करण्यात यावे.
५. सदर शिबिरामध्ये कृत्रिम श्वासोश्वास (Artificial Respiration), कृत्रिम वायुजिवन (CPR- Cardiopulmonary Resuscitation) व इतर तातडीचे प्रथमोपचार देणेबाबत त्यांना प्रशिक्षिण देण्यात यावे.
६. शाळेच्या नजीक उपलब्ध असलेल्या शासकीय रुग्णालये, शासकीय आरोग्य केंद्र, खाजगी दवाखाने आणि शासकीय व सार्वजनिक रूग्णवाहिकांचे संपर्क क्रमांक ठळक अक्षरात दर्शनी भागात लावण्यात यावेत व त्यांचेशी समन्वय ठेवण्यात यावा.
. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी शाळेत आवश्यकतेनुसार समन्वयक नेमण्यात यावेत.
८. आपत्कालीन परिस्थितीत सदर समन्वयकांने रुग्णास तात्काळ उपचार मिळण्याच्या दृष्टीने रुग्णालयांशी संपर्क साधावा व आजारी विद्यार्थ्यांस रुग्णालयात भरती करण्यात मदत करावी.
९. शाळेने नजीकच्या दवाखान्यांशी तसेच जवळपासच्या डॉक्टरांशी On-call सेवा उपलब्ध करुन देण्याबाबत सामंजस्य करार करावेत व विद्यार्थ्यांना गरजेनुसार डॉक्टर On-call सुविधा उपलब्ध करुन द्यावी.
१०. आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्याची गरज भासल्यास शाळेकडे वाहनाची व्यवस्था असावी.
११. विद्यार्थ्यांकरीता शाळास्तरावर तणावमुक्तीसाठी कार्यशाळा आणि इतर उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे. तसेच विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी समुपदेशकाची (Counsellor) व्यवस्था करण्यात यावी.
उपरोक्त मागदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीबाबत संचालक/उपसंचालकांनी मासिक आढावा घ्यावा व आवश्यतेनुसार शिक्षणाधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांना मागदर्शन करावे. या सूचना निर्गमित कैले नंतर संचालक (प्राथमिक/ माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी आठ आठवड्यांच्या आत शासनास कार्यपूर्तता अहवाल सादर करावा तसेच प्रतिवर्षी जानेवारी व जुलै महिन्यात याबाबतच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन शासनास एकत्रित अहवाल सादर करावा.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१०२९१४५३४५९३२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल
स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशांनुसार व नावाने.