प्रेमविवाहासाठी वडिलांच्या मित्रासोबत पळाली ११ वीची विद्यार्थिनी !गोंदियातून पोलिसांनी केली सुटका marathinews
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एका अकरावीतील विद्यार्थिनीने चक्क वडिलांच्या मित्रासोबतच प्रेमविवाह करण्यासाठी पळ काढला. मात्र ते मध्य प्रदेशात जाण्याअगोदरच पोलिसांनी त्यांना गोंदियातून ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवीय वाहतूक प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली.
विद्यार्थिनीचे कुटुंबीय मध्य प्रदेशातील असून ते नागपुरात काम करतात. आरोपीदेखील मजुरीचे काम करतो व त्याची तिच्या वडिलांसोबत मैत्री होती. त्याचे विद्यार्थिनीच्या घरी येणे जाणे होते व त्यांची मैत्री झाली.
काही दिवसांनी त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले व पळून जाऊन लग्न करण्याबाबत विचारले.
मुलीनेदेखील त्याला होकार दिला. ती अल्पवयीन असल्याचे माहिती असूनदेखील त्याने तिला घेऊन पलायन केले. त्यांना मध्यप्रदेशात जाऊन लग्न करायचे होते.
मुलीची आई घरी आल्यावर तिला ती न दिसल्याने तिचा शोध घेतला. अखेर पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने समांतर तपास केला. संशयावरून पोलिसांनी आरोपीची माहिती घेतली असता तो बहिणीच्या गावी गेल्याचे समजले. पथकाने गोंदिया पोलिसांशी संपर्क साधला.
त्यांना दोघांचीही छायाचित्रे पाठविली. दोघेही बसस्थानकावर आढळून आले. दोघांनाही नागपुरात आणल्यानंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात, तर विद्यार्थिनीला कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आले.
पोलिस निरीक्षक ललिता तोडासे, गजेंद्र ठाकूर, राजेंद्र अटकाळे, सुनील वाकडे, श्याम अंगुलथेवार, विलास चिंचुलकर, शरीफ शेख, ऋषीकेश डुमरे, पल्लवी वंजारी व अश्विनी खोडपेवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.