पॅन-आधार जोडणीची अट रद्द : म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना ‘सेबी’चा दिलासा link pan to aadhar
मुंबई, ता. १७ : भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ने म्युच्युअल फंड व्यवहारांसाठी ‘केवायसी’ पूर्ततेसाठी पॅन आणि आधार जोडलेले असण्याची अट आता काढून टाकली आहे. यामुळे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
‘सेबी’ने मंगळवारी (ता. १४)
एक सुधारित परिपत्रक जारी करून ‘केवायसी’साठीच्या अटी कमी केल्या आहेत. आता ‘केवायसी-नोंदणीकृत’ स्थिती प्राप्त करण्यासाठी गुंतवणूकदारांना त्यांचा पॅन आधारशी जोडण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स
किंवा मतदार ओळखपत्र यांसारख्या अधिकृतपणे वैध कागदपत्रांच्या साह्याने त्यांना ‘केवायसी’ पूर्ण करता येईल, असे ‘सेबी’ने स्पष्ट केले आहे.
बँका, फंड हाऊस आणि शेअर ब्रोकरसाठी गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी गुंतवणूकदारांची ओळख पडताळणीसाठी ‘केवायसी’ (नो युवर कस्टमर) ही अनिवार्य प्रक्रिया आहे. यामुळे गुंतवणूक संस्था त्यांच्या ग्राहकांना चांगल्या प्रकारे ओळखतात
आणि फसवणुकीला आळा घालू शकतात. ‘सेबी’ने ऑक्टोबर २०२३ मध्ये सर्व म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी ३१ मार्च २०२४ पर्यंत ‘केवायसी’ नोंदणीकृत स्थिती प्राप्त करण्यासाठी त्यांचा पॅन आधारशी जोडणे अनिवार्य असल्याची सूचना जारी केली होती. पॅन आणि आधार जोडलेले नसेल, तर ‘केवायसी’ प्रक्रिया थांबवली जाईल आणि गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येणार नाही. या नियमामुळे एक कोटी ३० लाखांहून अधिक खाती प्रभावित झाली होती. यात गुंतवणूकदारांना येणाऱ्या 1 अडचणी लक्षात घेऊन ‘सेबी’ने हे नियम कमी केले आहेत.