कामाचे टप्पे किंवा प्राधान्यक्रम learning outcomes
जागतिक दर्जाची शाळा करायचे म्हटले की, वेगवेगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर येऊ लागतात. त्यामध्ये आकर्षित करणाऱ्या परंतु खर्चीक बाबी अधिक असतात. सदयःस्थितीत वाबळेवाडीच्या शाळेला खूप लोक भेट देतात. भेट दिल्यानंतर प्रत्येकाच्या मनात आपण जागतिक दर्जाची तशी शाळा करावी असा विचार येतो. खूप उत्साह संचारतो आणि कामास सुरुवातही होते, परंतु असे निदर्शनास येत आहे की, ज्या उत्साहाने कामाला सुरुवात होते त्या प्रमाणात यश प्राप्त होत नाही. काही बाबतीत तर काही कालावधीनंतर कामास सुरुवात करणाऱ्या व्यक्ती तक्रार करू लागतात. माझी खूप इच्छा आहे, पण इतरांची साथ मिळत नाही. वाबळेवाडी गावातील पालक सजग आहेत, आमच्याकडे तसे नाही. तशी परिस्थिती आमच्याकडे नाही अशी अनेक कारणे सांगू लागतात. सर्वांमध्ये एक समान गोष्ट अशी आढळते की, त्यांचा काम करण्याचा टप्पा किंवा कामाचा प्राधान्यक्रम चुकलेला असतो. कुठलेही काम करीत असताना किंवा जागतिक दर्जाची शाळा उभी करीत असताना टप्प्याटप्प्याने पुढे जाणे अपेक्षित असते. एकेक टप्पा पुढे न जाता सरळ पुढच्या पायरीवर उडी मारण्याचा प्रयत्न केला की, अपघात होण्याची शक्यता अधिक असते. एकदा अपघात झाला की, परत उडी मारण्याचे धाडस होत नाही. अशा वेळी एक एक टप्पा पुढे गेल्यास किंवा पार करीत गेल्यास अशक्य वाटणारे लक्ष्यसुद्धा साध्य करता येते. वाबळेवाडी शाळा पाहून आल्यानंतर किंवा वाबळेवाडी शाळा पाहताना अशा बऱ्याच गोष्टींची यादी तयार होते, ज्या आपल्याला कराव्या वाटतात. समजा वाबळेवाडी शाळेतील करता येणाऱ्या शंभर गोष्टींची यादी केली तर त्या यादीतील कोणती कामे केव्हा करावी? त्याचा प्राधान्यक्रम काय असेल? हे ठरवता आले पाहिजे. बऱ्याच वेळा प्रभावित करणाऱ्या भौतिक बाबी करण्याचा आपला बेत असतो त्यासाठी मोठ्या प्रमाणावर समाज सहभाग, आर्थिक गुंतवणूक किंवा प्रशासनाची मदत आवश्यक
असते. योग्य प्राधान्यक्रम निश्चित केल्यास अपेक्षित यश मिळविता येईल. त्यासाठी खालील चार टप्पे आहेत. १) स्वः स्तरावर करता येणाऱ्या बाबी ज्या फक्त मार्गदर्शन केल्याने भेट दिलेले सर्व शिक्षक कार्यान्वित करू
शकतील . २) स्वः + समाज स्तरावरील बाबी- ज्यासाठी थोडा निधी व लोकसहभाग लागणार तरीसुद्धा मार्गदर्शन केल्याने
भेट दिलेले बरेच शिक्षक कार्यान्वित करू शकतील.
३) स्वः + समाज + भौतिक बाबी (खर्चीक बाबी) स्तरावरील बाबी अशा बाबी ज्यासाठी खूप अधिक निधी
व लोकसहभाग लागणार त्यामुळे मार्गदर्शन करूनसुद्धा एखादीच शाळा आणि शिक्षक करू शकतील. ४) स्वः + समाज + भौतिक बाबी (खर्चीक बाबी) + प्रशासकीय स्तरावरील बाबी अशा बाबी ज्या शासनाच्या
प्रशासकीय मदतीशिवाय शक्य नाहीत.
स्वतःपासून काम करण्यास सुरुवात केली की, यश मिळणे सुरू होते. एकदा यश मिळायला लागले की, कामाची गती व गुणवत्ता दोन्ही वाढतात.
जागतिक स्तराची शाळा करण्यापेक्षा भविष्यवेधी शिक्षण देणारी शाळा करणे केव्हाही सोपे. ते करू या त्यासाठी खालीलप्रमाणे १७ बाबी कराव्या लागणार आहेत.
प्रमुख १७ बाबी:
१) मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे.
२) मुलांना शिकण्यास आव्हान देणे,
3) Learning Interventions (समवयस्क अध्ययन जोडी (Peer Learning), गट अध्ययन (Group Learning), विषयमित्र)
४) मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान.
५) शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग.
६) मुलांनी स्वतःच्या शिकण्याची गती वाढवणे.
७) पुढील वर्गाचे पाठ्यक्रम शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे,
८) विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणे.
) इंग्रजी शिकण्यासाठी प्रक्रिया राबविणे,
९ १०) पाठ्यक्रम लवकर संपल्याने उपलब्ध झालेल्या वेळेचा उपयोग पाठ्यक्रमाबाहेरील; परंतु जीवनावश्यक ते शिकण्यासाठी वापरणे.
११) भविष्यात येणारे तंत्र शिकण्यास संधी उपलब्ध करून देणे, १२) पर्यावरण विषयीचे शिक्षण ‘प्रत्यक्ष जगणे’ यामधून करणे.
१३) जगातील व देशांतील इतर भाषा शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे.
१४) शहरामधील व इतर देशातील शाळेसोबत भागीदारी करणे.
१५) खेळासाठी मुलांना संधी उपलब्ध करून देणे.
१६) संगीत, नाट्य, विविध कला शिकण्याची व व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून देणे.
१७) बहुविध बुद्धिमत्तेचा विचार करून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया राबविणे,
पहिल्या सहा बाबी:
१) मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे.
२) मुलांना आव्हान देणे.
४) मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे.
५) शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग.
६) मुलांनी स्वतःच्या शिकण्याची गती वाढवणे.
मजेची गोष्ट ही आहे, ती म्हणजे प्रथम सहा पायऱ्या करताना कोणत्याही भौतिक सुविधांची गरज नाही. या १७ बाबींपैकी सुरुवातीस पहिल्या सहा बाबी करण्यासाठी आपली चर्चा सुरू आहे.
3) Learning Interventions (Peer Learning, Group Learning, विषय मित्र)
स्व-पातळीवरून कामाची सुरुवात (विकासाचे चार टप्पे)
आंतरजिल्हा बदलीने १८ जून, २०१० मध्ये जेव्हा मी फुलंब्री तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इनामवस्ती या वस्ती शाळेत हजर होण्यासाठी आले तेव्हा, ती शाळा बघून मला आश्चर्यच वाटले. शाळेला शाळा म्हणण्यासाठी इमारतच नव्हती. शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच वर्ग असून पटावर केवळ १८ विद्यार्थी होते, प्रत्यक्ष मुले ही तेथे उपस्थित नव्हती. निमशिक्षकांना मे व जून महिन्याचा पगार मिळत नसल्यामुळे ते जुलैपासून शाळा भरवत होते. असे तेथील निमशिक्षकांनी सांगितले. इमारत नसल्यामुळे सर्व विदयार्थी झाडाखाली बसून शिकतात हे कळले. शाळेची अवस्था बघून मॅडमने शाळा नाकारू नये, म्हणून “विदयार्थ्यांची जिथे वस्ती आहे, तिथे शाळेच्या
इमारतीचे बांधकाम सुरू होत आहे आणि तीन-चार महिन्यात बांधकाम पूर्ण होईल’, असे सरांनी सांगितले होते.
अशी शाळा मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होते. जळगाव जिल्ह्यात असताना ३०० विद्यार्थी
असलेल्या, भरपूर भौतिक सुविधा असलेल्या शाळेत मी कार्यरत होते. आणि येथे ? फक्त १८ विदयार्थी आणि फळा एवढीच शाळा होती. मग मी विचार केला एवढ्या दिवस मोठ्या शाळेत काम केले, आता या छोट्या शाळेचाही अनुभव घेऊन बघूया. नावीन्यता आणि विविध अनुभव घ्यायला मला नेहमीच आवडतात आणि मी त्या शाळेत हजर झाले. दुसऱ्या दिवशी शाळेत पोहोचल्यावर सरांसोबत थोडी चर्चा केली, तेव्हा कळले की, जागा उपलब्ध होत नसल्यामुळे इमारत बांधकाम अदयाप पर्यंत कुठेही सुरू झालेले नाही आणि जवळपास शाळा नसल्यामुळे नाईलाजाने मुलांना एक ते दीड किलोमीटर वरून पायी आपल्या शाळेत यावे लागते. पालकांमध्ये शिक्षणाबद्दल अनास्था आहे. कोणतेही पालक शाळेत येऊन शाळेच्या अडचणी समजून घेण्यास व सोडविण्यासाठी तयार नाही.
सर्व परिस्थिती समजून घेतल्यावर मी सरांना सोबत घेतले आणि वस्तीवर जाऊन सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना
भेटले. मला हे माहिती होते, की पालक कसाही असला, तरी माझा मुलगा/मुलगी शिकली पाहिजे हे प्रत्येक पालकाला मनापासून वाटत असते. आम्ही घरोघरी जाऊन पालकांसोबत संवाद साधला. आता सर एकटे नाहीत तर मी पण त्यांच्या सोबत आहे, त्यामुळे तुमचे विद्यार्थी निश्चितच हुशार होतील, आनंदाने शिकतील हा विश्वास पालकांना दिला आणि मुलांना आमच्यासोबत शाळेत घेऊनच आम्ही शाळेत आलो.
आता दररोज आमची शाळा झाडाखाली आणि सरांच्या घराच्या ओट्यावर भरू लागली. आपल्याला शिकविण्यासाठी नवीन मॅडम आलेल्या आहेत, यामुळे विदयार्थी आनंदाने, उत्साहाने, हसतखेळत शिकू लागले. सरांनाही सोबत मिळाल्यामुळे त्यांच्याही कामाचा ताण हलका होऊन ते ही आनंदी होते. हजर झाल्यावर काही दिवसातच
मुख्याध्यापकाचा कार्यभार माझ्याकडे आला. केंद्रीय मुख्याध्यापकांनी शाळा बांधकामासाठी जमा असलेले ३ लाख २५ हजार रुपये माझ्या शाळेच्या खात्यावर वर्ग केले. केंद्रीय मुख्याध्यापकांसोबत चर्चा झाल्यावर कळले, की शाळेला बांधकामासाठी एक वर्षापासून पैसे आलेले होते. परंतु जागा उपलब्ध होत नसल्यामुळे हा निधी खात्यावर पडून आहे. मुख्याध्यापकांनी सांगितले, की “मॅडम प्रयत्न केले; परंतु शाळेला जागा उपलब्ध झाली नाही. तुमच्याकडून होत असेल तर जागेसाठी प्रयत्न करा नाही तर हा निधी शासनाला परत दया.”
सर्व अडचणी लक्षात आल्यावर मी ठरवले की, जेव्हा जागा मिळेल तेव्हाच बांधकाम होईल, त्या गोष्टी आपल्या हातात नाहीत. परंतु विदयार्थी गुणवत्ता वाढविणे हे मात्र माझ्या हातात आहे. तेव्हा मी त्या दृष्टीने कार्य करत राहिले. स्व – पातळीवर मला जे करता येईल, ते करण्याचा मी निश्चय केला. निसर्गाच्या सान्निध्यात आमचे विद्यार्थी शिकत होते. झाडाखाली भरलेल्या आमच्या शाळेला ऊन, वारा, पाऊस सर्वच गोष्टींचा सामना करावा लागत होता. तरीही मुले आनंदाने शिकत होती. सरांनाही सोबत सहकारी मिळाल्यामुळे त्यांच्याही कामाचा उत्साह बाढला होता. आता सरांनी देखील सर्व मरगळ झटकून गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने आपले कार्य सुरू केले होते. त्यांना कामातून आनंद मिळावा, म्हणजे ते अधिक उत्साहाने व प्रभावी काम करतील, यासाठी कामाची विभागणी करताना, कामे निवडताना मी त्यांना अगोदर प्राधान्य देत होते आणि उरलेली कामे मग मी आव्हाने म्हणून स्वीकारत होते. अभ्यासासह मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी वेगवेगळे कृती उपक्रम, स्पर्धा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देखील आम्ही घेऊ लागलो. द्विशिक्षकी शाळा आणि चार वर्ग असल्यामुळे आम्ही सहभागी, गट अध्ययन, समवयस्क विषयमित्र यांचा वापर करत होतो. मुलांना एकमेकांना शिकविण्यात मजा येत होती. मुलांची गुणवत्ता वाढली. इंग्रजीतून देखील विदयार्थी स्वतः बद्दल माहिती सांगू लागले. सर्व गणितीय क्रिया अचूक व झटपट सोडवू लागले. मुले शाळेत, घरी, इतरांसोबत बोलताना आत्मविश्वासाने बोलू लागली. शाळेतील विविध उपक्रम, अभ्यासातील मजा घरच्यांना सांगू लागली. आपला मुलगा छान वाचतोय, लिहितोय, शिकतोय हे बघून पालकही
आनंदी होऊ लागले. शाळेच्या गुणवत्तेची चर्चा वस्ती वरून गावापर्यंत पोहचू लागली होती. वस्तीवरील पालक दररोज दूध टाकण्याच्या निमित्ताने, काही खरेदीच्या निमित्ताने गावात जात, तेव्हा गावातील पालकांसोबत आमच्या शाळेच्या गुणवत्तेबाबत चर्चा होत होती. विदयार्थ्यांचे कौतुक होत होते. हे बघून पालकांना खूप छान वाटत होते. गावात ही आपल्या शाळेचे नाव एक उत्कृष्ट शाळा म्हणून घेतले जाते, हे बघून वस्तीवरील पालकांना
शाळेचा अभिमान वाटू लागला.
स्व-पातळी पूर्ण झाल्यावर आता आम्ही आमचा मोर्चा पालकांकडे म्हणजेच समाज सहभागाकडे वळविला. शालेय
व्यवस्थापन समितीच्या बैठकीस सर्वांना उपस्थित राहण्यासाठी आवाहन करू लागलो. माता पालक संघ, शिक्षक पालक संघ यांच्या माध्यमातून पालक ही शाळेत येऊ लागले. शाळेतील अडचणी समजून घेऊ लागले. जेव्हा जेव्हा शाळेत बोलविले तेव्हा तेव्हा सर्वजण शाळेत उपस्थित राहू लागले. एवढेच नाही तर महिला भगिनींना देखील शाळेत येण्यास आनंद वाटत होता. शाळेत केवळ मुलांचाच सर्वांगीण विकास घडत नव्हता, तर आम्ही महिलांसाठी ही विविध कार्यक्रम घेत असल्यामुळे महिलांनाही शाळेत एक व्यासपीठ उपलब्ध झाले होते. पुरुषा समक्ष बोलताना लाजणाऱ्या महिला आता पुरुषांच्या बरोबरीने बैठकीमध्ये सक्रिय सहभाग घेऊ लागल्या होत्या.
आमची झाडाखालची, ओट्यावरची, बिन भिंतींची शाळा विदयार्थी, शिक्षक आणि पालकांसह सर्वांनाच आवडू लागली, काही दिवसांनी शाळेची गुणवत्ता बघून पालकांनाही वाटू लागले की वस्तीवर कायमस्वरूपी शाळा व्हायलाच हवी. म्हणजे वस्तीवरील सर्व विदयार्थी गुणवत्तेत पुढे राहतील.
वस्तीवर शाळा बांधकामासाठी गायरान जमीन उपलब्ध होती, परंतु काही ग्रामस्थांनी तिच्यावर अतिक्रमण केलेले होते. बांधकामासाठी जिल्हा परिषद कडून परवानगी काढणे गरजेचे होते. त्यासाठी मी व पालकांनी मिळून गटशिक्षणाधिकारी साहेब यांच्याशी संपर्क साधून जिल्हा परिषदेमध्ये फाईल दाखल केली. आवश्यक सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा केला. गटशिक्षणाधिकारी श्री. साळुंके सर यांनीही आवश्यक त्या मदतीची तयारी दर्शवली.
தக்
तालुकास्तरावरून कामात अडचण आल्यास पोलीस संरक्षण दिले जाईल. असा तहसीलदार मॅडमकडून शब्द मिळाला. परंतु ज्या दिवशी आम्ही प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायची ठरवली, त्यादिवशी मात्र मला धक्काच बसला!…… जागा मोजणीसाठी जेव्हा आम्ही गायरान जमिनीवर पोहचलो, तेव्हा आम्हा शिक्षकांशिवाय एकही पालक तेथे उपस्थित झाले नाही. आम्ही फोन केले तरीही कोणीच आले नाही. शेवटी आम्ही तेथून परत आलो. अतिक्रमण केलेल्या व्यक्तीच्या विरोधात कोणीच उभे राहिले नाही. शेवटी गावात राहायचे, म्हणजे गावातील व्यक्तीसोबत वैर घेण्यास कोणीच तयार झाले नाही.
मी थोडीशी नाराज झाले. मनात विचार येऊ लागले… ज्यांच्या मुलांसाठी आपण हे काम करणार आहोत, ते पालकच आपल्यासोबत नाहीत….. मग काय उपयोग? हे सर्व घडल्यानंतर शाळेत येऊन मी मा. गटशिक्षणाधिकारी श्री. साळुंके साहेब यांना फोन केला आणि सांगून
टाकले की, “सर शाळेला एक अडचण असती तर ती सोडवली असती, परंतु आता खूप अडचणी समोर उभ्या
आहेत. एक तर जागा नाही, दुसरी अडचण म्हणजे २००८ च्या निधीत बांधकाम पूर्ण होईल याची शाश्वती नाही.
तिसरी अडचण म्हणजे ज्या पालकांच्या मुलांसाठी आपण एवढी मेहनत घेत आहोत, ते पालकच आज आपल्यासोबत
नाहीत…! तेव्हा शाळेचे पैसे परत जाऊ दया. आपण बांधकाम रद्द करू या”. माझे बोलून झाल्यावर साहेब मला
म्हणाले की, “मॅडम आम्हाला अगोदरच माहिती होते की, त्या ठिकाणी जागेची खूप मोठी समस्या आहे, त्यामुळे येथे
शाळा बांधकाम होणारच नाही हे निश्चित झाले होते. परंतु तुमचे काम, मेहनत, शाळेची गुणवत्ता, पालक सहभाग
पाहून येथे सुंदर शाळा उभी राहील, हा एक नवीन विश्वास तुमच्यामुळेच तयार झाला होता आणि आता तुम्हीच
माघार घेत आहात?”
साहेबांच्या बोलण्यावर मी पुन्हा एकदा विचार केला. माझे मन मला समजावू लागले… तू सर्वांच्या हिताचे, एक प्रामाणिक आणि काळाची गरज असलेले कार्य हाती घेतले आहेस, त्यात तुला यश नक्कीच मिळणारं.
दुसऱ्याच दिवशी मी तातडीने पालकांची बांधकाम संदर्भात शेवटची मीटिंग बोलविली, जाधव सरांचे वडीलही मीटिंगला उपस्थित होते. मी पालकांसमोर सर्व अडचणी मांडल्या. शाळेला जागा उपलब्ध झाली, तर सर्वांना तिचा कसा फायदा होईल, हे ही समजावून सांगितले. आता आपण काय करावे? हे पालकांनाच विचारले. वस्तीवरील सर्व पालक परिस्थितीने साधारण होते. त्यामुळे ते स्वतः ची जमीन देऊ शकत नव्हते आणि गायरान वरील अतिक्रमण विरोधात ही बोलू शकत नव्हते. इच्छा असूनही मार्ग सापडत नव्हता. मग आता आपण पैसे प्रशासनाला परत करायचे का? हा प्रश्न मी त्यांना विचारला? सर्व जण शांत. तेवढ्यात सरांचे वडील उभे राहिले आणि त्यांनी जे वाक्य बोलले, त्यातून सर्वच समस्या अगदी सहज दूर झाल्या. ते म्हणाले, “मॅडम, आपली शाळा, आपले विद्यार्थी खूप हुशार व उत्कृष्ट आहेत. मी जेव्हा जेव्हा गावात जातो, गावात सर्व जण आपल्या शाळेचे, विदयार्थ्यांचे व सोबतच शिक्षकांचे खूप कौतुक करतात. तेव्हा मला खूप आनंद होतो आणि हा आनंद मला नेहमीसाठी प्राप्त करायचा आहे. लोकं देवाच्या मंदिरासाठी जागा देतात, वर्गणी देतात. आपली शाळा ही देखील विद्येचे मंदिर आहे आणि या मंदिरासाठी मी माझी ५ गुंठे जागा देण्यास तयार आहे. तेव्हा तुम्ही उदयाच रजिस्टरी करून कामाला सुरुवात करा.” त्यांचे हे वाक्य ऐकून सर्वांनाच खूप आनंद झाला. एवढ्या वर्षापासून निर्माण झालेली समस्या एका क्षणात सोडवली गेली.
दुसऱ्याच दिवशी नोंदणी करून घेऊन ठेकेदार निश्चित केला. कामास सुरुवात झाली. काही दिवसांनी अजून एक अडचण समोर आली की, सन २००८ मधील मंजूर झालेल्या निधीतून २०१२ मध्ये शाळेचे बांधकाम पूर्ण होईल
का? मग परत एक बैठक झाली, त्यात पालकांनी परिस्थिती नसतांना देखील शाळेसाठी पैसे कमी पडल्यास आम् मदत करू, असा शब्द मला दिला. मला त्यांच्या परिस्थितीची जाणीव होती. अशा कष्ट करणाऱ्या व्यक्तींना मदत मागणे मलाच योग्य वाटत नव्हते. त्यामुळे जर पालकांकडून पैसे जमा झाले नाही, तर स्वतः पैसे भरण्याची पी तयारी ठेवली. लहानपणापासून समाजातील व्यक्तींची, मैत्रिणींची वेगवेगळी परिस्थिती मी पाहत होते. गरीबी स्वतः अनुभवली नसली तरी इतरांचे अनुभव माझ्या सोबत होते. गरिबीमुळे शिक्षण पूर्ण न करू शकणाऱ्या, गरीब, अनाथ
विदयार्थ्यांसाठी गुणवत्ता पूर्ण शाळा सुरू करायची हे माझे स्वप्न होते. मनात विचार आला आपले स्वप्न पूर्ण होईल तेव्हा होईल, पण आज स्वप्नातील शाळा बनविण्याची एक छान संधी मला मिळाली आहे. तेव्हा शाळेला कमी पडणारा पैसा स्वतः टाकूया आणि स्वप्नातील शाळा तयार करूया, असा मी संकल्प केला. अंदाजपत्रकाचा अभ्यास करून शाळा बांधकामास सुरुवात झाली. बोअरवेल घेण्यात आला. त्यालाही २००
फुटावरच खूप पाणी लागले. आजपर्यंत कधी सिमेंटची गोनी ही खरेदी न केलेली मी आज शाळा बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करत होते. पाहता पाहता शाळेच्या भिंती उभ्या राहिल्या. शाळेचे काम तर उत्कृष्ट झाले पाहिजे आणि शाळेचा एक ही पैसा व्यर्थ जायला नको, या दृष्टीने मी व माझे सहकारी शिक्षक व आमचे विदयार्थी…. आम्ही सर्वच जण प्रयत्न करत होतो. शाळेच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर शाळेत येऊन आता पर्यंतच्या सर्व बांधकामावर पाणी मारण्याचे काम आम्ही शिक्षक व विदयार्थ्यांनी मिळून केले होते. मी बांधकामाकडे गेले तर, विदयार्थी स्वतः शिकत होते व इतरांना शिकायला मदत करत होते.
सर्व बांधकाम चालू असतांना कोणतीच अडचण आम्हाला आली नाही किंवा कोठेच फसवेगिरी झाली नाही. मा. गटशिक्षणाधिकारी साहेबांनी देखील माझ्यावर विश्वास ठेवून वेळेवर सर्व धनादेश शाळेस प्राप्त करून दिले. सर्वांचीच छान साथ मिळाली. त्यामुळे महिला असले तरीही त्या कामाचा मला ताण वाटला नाही. उलट बांधकामाचा एक नवीन अनुभव मिळाला.
डिसेंबर, २०१२ ला सुरू झालेले बांधकाम जुलै, २०१३ पर्यंत पूर्ण झाले. दोन वर्गखोल्या, मुख्याध्यापक ऑफिस, स्वयंपाकगृह, मुला-मुलीसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, बोअरवेल, सुंदर रंगरंगोटी, पाण्याची टाकी, मुलांसाठी खेळणी, परसबाग, बागेचे कंपाऊंड इत्यादींसह सुंदर शाळा तयार झाली, झाडाखाली, ओट्यावर भरणारी आमची
शाळा आता सुसज्ज इमारतीत भरू लागली. आणखी एक विशेष म्हणजे…. सदर सर्व काम २००८ च्याच निधीतून उत्कृष्ट रीतीने पूर्ण होऊन १४ हजार रुपये
रक्कम शाळेकडे शिल्लक राहिले. या पैशातून आम्ही मुलांसाठी एक संगणक ही खरेदी केला. काही दिवसातच आमच्या या सुंदर शाळेला भेट देण्यासाठी मा. गटशिक्षणाधिकारी श्री. साळुंके साहेब एक दिवस शाळेत आले. सुंदर इमारत आणि शाळेची गुणवत्ता पाहून सर खूप आनंदी झाले. जेथे पुरुष शिक्षक देखील
बांधकाम म्हटले की चार्ज घेण्यास घाबरतात, तेथे एका महिला शिक्षिकेने उत्कृष्ट काम करून दाखविले हे त्यांचे
तयार झालेले मत त्यांनी एका बैठकीमध्ये सर्वांना सांगितले.
काही दिवसात श्री. साळुंके साहेबांची बदली झाली. नवीन आलेले गटशिक्षणाधिकारी श्री. वाणी साहेब यांनी एक
दिवस शाळेला भेट दिली. शाळेची गुणवत्ता, सुंदर बाग, शाळेतील चुणचुणीत, आत्मविश्वासाने बोलणारे विदयार्थी
बघून सरही खुश झाले आणि त्यांनी शाळेस नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी १८ हजार रुपयाचे बक्षीस दिले. म्हणजे आता प्रशासनही आमच्या सोबतीला, मदतीला आले. अशा पद्धतीने स्व-पातळीवर केलेले उत्कृष्ट काम आपल्याला इतर सर्व पातळ्या सहजतेने प्राप्त करून देते,
याचा अनुभव मी प्रत्यक्ष अनुभवला.
आज आमचे पालक शिक्षणाच्या बाबतीत जागृत आहेत. वेळावेळी शाळेत येऊन आम्हा शिक्षकांना हवी असलेली
सर्व मदत करतात. मुलांना आवश्यक सर्व साहित्य वेळोवेळी पुरवितात. लोक सहभागातून आता शाळेत स्मार्ट LED, तारेचे कंपाऊड, प्रवेशद्वार इत्यादी साहित्य उपलब्ध आहे. शाळेची पटसंख्या आज १८ वरून ४७ वर येऊन पोहोचली आहे. विशेष म्हणजे एकही विदयार्थी शाळेच्या परिसरात राहत नाही. सर्व विद्यार्थी एक ते दीड किलोमीटर पायी चालून शाळेत येतात. शाळेत एकूण १६ विदयार्थी मुस्लिम आहेत. त्यामुळे शाळेत मराठी व हिंदी अशा दोन्हीही भाषा बोलल्या जातात, त्यामुळे आमची सर्वच मुले दोन्हीही भाषा उत्तम बोलतात. इंग्रजी बोलण्याचा सराव ही आता सुरू झाला आहे. पालक विश्वासाने आपली मुले शाळेत पाठवत आहेत. आमचे विदयार्थी तर रविवारी ही शाळा सुरू ठेवण्याचा आग्रह धरत आहेत.