मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे learning outcomes

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे How does child learn

 

How does child learn भविष्यवेधी शिक्षण मधील पहिली पायरी म्हणजे मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे. मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करण्यात पहिली बाब म्हणजे मूल स्वतः शिकू शकते यावर विश्वास असणे. मूल स्वतः शिकू शकते यावर किती शिक्षकांचा विश्वास आहे? जर विश्वास असेल तर किती शिक्षक मुलांना स्वतः शिकू देतात. जर मूल स्वतः शिकू शकते यावर विश्वास असता तर वर्ग अध्यापन आता जसे सुरू आहे तसेच असते की वेगळे? दोन मिनिटे शांत बसा आणि विचार करा. तुमचा विश्वास आहे की, मूल स्वतः शिकू शकते, अशा वर्गातील प्रक्रिया कशी असेल? कोणते व कसे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. (दोन मिनिटे डोळे बंद करून शांत बसून तसे चित्र डोळ्यांसमोर आणणे.) अट काय आहे? शिक्षक शिकवत नाहीत मुले स्वतःहून शिकत आहे. कदाचित असेही असेल की, कल्पना चित्रात वारंवार स्वतःला असे सांगत आहेत. शिक्षक शिकवत नाहीत पण कल्पना चित्रात मात्र शिक्षक डोकावण्याची शक्यता अधिक आहे. याचे कारण कदाचित असे असावे की, आम्हांला शिक्षकांनी न शिकवता मुलांनी शिकणे ही कल्पना पण करावीशी वाटत नाही. नेहमीचा वर्ग आणि आता कल्पना करीत आहोत त्या वर्गात काय फरक दिसतो ? खालीलप्रमाणे काही चित्र डोळ्यांसमोर येण्याची शक्यता आहे.

How does child learn मूल कशे शिकते

 

१) वर्गात शिक्षकांनी काही सूचना दिल्या आहेत, सर्व मुलांनी आपापली वह्या-पुस्तके काढलीत आणि स्वतः काहीतरी करून पाहत आहेत. सर्व मुले स्वतःमध्ये व्यस्त असून शिक्षकांनी सांगितलेली कामे करीत आहेत.

२) शिक्षकांनी अभ्यासण्याचा मुद्दा दिलेला आहे. विदयार्थी दोन-तीनच्या संख्येने बसले आहेत. सरांनी दिलेल्या मुद्द्यांवर आपापसात चर्चा करीत आहेत. गप्पा मारत आहेत. त्यातून त्यांचे शिकणे सुरू आहे.

३) या तासाला किंवा आज काय शिकायचे? हे मूल आणि शिक्षकांनी मिळून ठरविले. काही मुले स्वतंत्रपणे बसून शिकत आहेत. काही गटागटाने बसून शिकत आहेत. शिकण्याचा एकच मुद्दा पण वेगवेगळे विद्यार्थी त्यांना हवे तसे पर्याय वापरून चर्चा करीत आहेत. विद्यार्थ्यांचे काही गट वर्गात बसले आहेत. काही झाडाखाली तर काही त्यांना हव्या त्या ठिकाणी बसून शिकत आहेत. काही जण तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहेत, तर काही जणांनी वरच्या वर्गातील मुलांची मदत घेतली आहे.

याप्रकारे विविध प्रकारची चित्रे डोळ्यांसमोर येऊ शकतात आणि यायला हवीत. अट मात्र एकच हे जे काही चित्र आपण निर्माण करीत आहोत ते एक तासिका किंवा एका दिवसापुरते निर्माण न करता आपल्या सर्व तासिका आणि सर्व विषय या पद्धतीने विदयार्थ्यांनी स्वतः शिकण्यास हवे. मुलाला स्वतः शिकण्यास प्रेरित करणे या बाबीचा पाया मूल स्वतः शिकू शकते या बाबीवर विश्वास असणे हा आहे. सदद्य:स्थितीत शिक्षकाविना मूल शिकू शकते यावर विश्वास ठेवणे हे शिक्षक व समाजालाही जड जात आहे. शाळेत येण्यापूर्वी मुलाने बऱ्याच बाबी शिकलेल्या असतात. शाळेत न शिकविल्या गेलेल्या अनेक गोष्टी मुलांना येतात. याचाच अर्थ मूल स्वतः शिकते त्यास शिकण्यास प्रेरित करणे ही शिक्षकाची भूमिका आहे. मुलांना भविष्यासाठी तयार व्हायचे आहे परंतु भविष्य काय असेल? ते शिकविणारा आणि शिकणारा या दोघांनाही माहीत नाही. अशा वेळी मुलांनी स्वतः शिकणे ही बाब महत्त्वपूर्ण आहे म्हणूनच शिकणे म्हणजे learning to learn होय.

वरील सर्व बाबी चांगल्या वाटत असल्या तरी मूल स्वतः शिकू शकते यावर विश्वास बसत नाही यासाठी काही बाबी कारणीभूत आहेत. अर्थात त्या आपल्या धारणा आहेत. मर्यादित अनुभवांच्या आधारे त्या तयार झाल्या आहेत आणि त्या सोबत घेऊन आपण वावरत असतो.

How does child learn मुलांना प्रेरणा कशी द्यावी

 

१) शिक्षक म्हणून मी मुलांना शिकवितो त्यांचा सराव करून घेतो, परीक्षा घेतो तरीही त्यांना येत नाही, मग त्याला स्वतःला कसे शिकता येईल? तात्पर्य, मी शिकवूनही शिकत नाहीत तर स्वतः कसे शिकतील?

२) ज्या घटकाच्या बाबतीत त्यांना काही माहीत आहे, त्या बाबतीत कदाचित पुढील बाबी शिकतील सर्वच घटक शिकणार नाहीत. तात्पर्य, नवीन बाबी स्वतःहून शिकणार नाहीत.

३) लहान मुलांना पूर्वज्ञान नसते अशा मुलांना स्वतःहून शिकायला अडचण येईल. लेखन-वाचन मुले स्वतःहून कसे शिकतील? पहिल्या वर्गातील मूल स्वतः कसे शिकेल? तात्पर्य, खालच्या वर्गातील मुलांना स्वतःहून शिकता येणार नाही.

४) वरच्या वर्गात मुलांना नवीन संकल्पना असतात. जसे वर्ग सातवीतील विदयार्थ्यांना घातांक किंवा बैजिक राशी शिकायच्या झाल्यास त्यांनी यापूर्वी ते अभ्यासलेले नसते. अशा वेळी त्यांना ते शिक्षकांनी शिकविल्याशिवाय शिकता येणार नाही. तात्पर्य, वरच्या वर्गातील विदयार्थ्यांना स्वतः शिकता येणार नाही.

५) काही बाबी शिक्षकांनी शिकविल्या तरच विदयार्थ्यांना येणे शक्य आहे. त्यामुळे शिक्षकांना शिकवावे लागेलच.

अशाप्रकारे वर नमूद केलेल्या काही धारणा तयार झालेल्या आहेत, ज्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवितात. सोबतच एका गोष्टीची भीती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर विद्यार्थी स्वतःहून शिकायला लागले तर माझे शिक्षकाचे काय काम? माझ्या असण्याचा, माझ्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे मला कायम हीच बाब महत्त्वाची वाटते माझ्यामुळेच मुले शिकत आहेत. मी नसतो तर ही मुले शिकलीच नसती. येथे एक गोष्ट समजून घेतली की हा गोंधळ कमी होण्यास मदत होते. मी महत्त्वाचा आहेच, माझे योगदान पण महत्त्वाचे आहे मात्र शिकविणे नाही, तर वर्गातील सर्व मुले शिकतील यासाठी. होय, शिकवायचे नाही तर सर्व मुले शिकतील यासाठी काम करायचे. शिक्षक या नात्याने मला जो काही पगार मिळतो तो मुलांना शिकविण्याचा मिळतो की, सर्व मुले शिकावीत याचा मिळतो? चला तर ज्या गोष्टीचा पगार मिळतो ती गोष्ट करू या. त्यातील प्रथम बाब ‘मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे’.

How does child learn स्वतःचे अस्तित्व आणि महत्त्वविषयक चुकीची धारणा तयार झालेली आढळते. माझ्यामुळे मुले शिकतात, मी शिकविले म्हणून मुले शिकली. (आजपर्यंत माझ्या वर्गातील मुले मी शिकवले म्हणून शिकलीत मग जी शिकली नाहीत ती न शिकण्याचे कारण काय असावे?) जर ते रोज शाळेत येत असतील, बसत. असतील. ती कुणामुळे शिकली नसतील ? मी शिकविल्यामुळे वि‌द्यार्थी शिकत असतील तर सर्वच विद्यार्थी शिकायला हवे होते पण तसे झाले नाही. मग जी शिकली आहेत ती माझ्यामुळेच शिकलीत असे कसे मानता येईल? शिकलेली आणि न शिकलेली मुले काही ना काही शिकली आहेत ती काय शिकलीत? हे त्यांना त्यांच्या ज्ञानाची रचना कशी केली यावर अवलंबून आहे. काहींनी शिक्षक किंवा शिक्षण यंत्रणेला अपेक्षित ज्ञानची रचना केली तर काहींनी केलेली रचना आपण स्वीकारली नाही किंवा त्यांनी दिलेल्या अनुभवातून अपेक्षित ज्ञानरचना करण्यास हवी असलेली मदत पुरविण्यास आम्ही कमी पडलो.

सध्याच्या प्रचलित परंपरागत पद्धतीने आम्ही शिकवतो म्हणजे काय करतो? तर विविध माध्यमातून मुलांसमोर अनुभव ठेवतो. गोष्ट, कविता, पाठ समजावून सांगणे, गणित सोडवायला देणे. मुलांना स्वतः अनुभव घेऊ न देता आम्ही त्यांना आयते अनुभव देतो. या विविध अनुभवाच्या आधारे ते स्वतःचा अनुभव तयार करतात, त्या अनुभवाच्या आधारे ज्ञानाची रचना करतात. याचाच अर्थ आम्हांला शिकवतो असे वाटत असले तरी ते स्वतःच शिकत असतात; परंतु आम्ही दिलेल्या आयत्या अध्ययन अनुभवांचा त्यांना पुरेशा प्रमाणात उपयोग होत नाही. आम्ही न शिकविता त्यांना स्वतः शिकण्यास प्रेरित केले तर त्यांनी घेतलेले अनुभव स्वतः घेतलेल्या अनुभवात रूपांतरित होतात. ज्याचा फायदा अध्ययन गती वाढण्यास होतो. शिक्षकांनी शिकविलेला घटक व तोच घटक मुलांनी स्वतः शिकला असेल तर यात खूप मोठा फरक पडतो. शिक्षकांनी शिकविलेल्या बाबी पाठ करून लक्षात ठेवाव्या लागतात. माहिती मिळालेली असते पण संकल्पना स्पष्ट होण्याची शक्यता नेहमी असतेच असे नाही. स्वतः शिकलेल्या बाबी मात्र पाठ करण्याची गरज पडत नाही आणि संकल्पना स्पष्ट होतात. या संदर्भात गजाजन अमलापुरे या शिक्षकांची एक पोस्ट आहे जी आपल्याला मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित का करायचे? हे समजण्यास मदत करेल.

शिक्षण हे प्रेरणेवर आधारित असते, असे म्हणणे वावगे ठरू नये तेव्हा विदयार्थ्यांमध्ये स्व-प्रेरणा जागृत करणे कमालीचे गरजेचे आहे. आता येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे; विदयार्थ्यांमध्ये शिक्षणासाठीची, अध्ययनासाठीची स्वयंप्रेरणा निर्माण करायची नाही; ती जागृत करायची आहे. जागृत केव्हा होते? जेव्हा ती सुप्तावस्थेत असते. प्रत्येकाच्याच ठायी असलेली प्रेरणा वेगवेगळ्या मार्गांनी जागृत होऊ शकते, ते पुढे विवेचनाने मांडतो. या सुप्तावस्थेला जागृत करण्यासाठीही प्रेरणा हवी असते. या साऱ्या प्रक्रियेला शिक्षक नावाच्या सुलभकात एक महत्त्वाचा गुण आवश्यक असतो तो म्हणजे संयम. मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करताना काही बाबींची काळजी घेतल्यास अधिक परिणाम मिळतात.

१) हळूहळू आपले शिक्षकांचे बोलणे कमी करणे.

२) वाट पाहायला शिकणे. आपल्याला मुलांच्या शिकण्याची खूप घाई असते आपण सांगितले की, लगेच मुलांना यायला हवे अशी अपेक्षा असते. थोडे संयम बाळगणे खूप महत्त्वाचे आहे.

३) शिकविण्याच्या हौसेवर नियंत्रण मिळविणे. चांगल्या शिक्षकाला शिकविल्याशिवाय चैन पडत नाही. त्याच्यासाठी न शिकविता थांबणे खूप कठीण गोष्ट आहे. गमतीने म्हणावयाचे झाले तर खूप कर्तबगार शिक्षकाला शिक्षा दयायची झाल्यास त्याच्या वर्गात जायचे व त्याला दिवसभर शिकवू न देता बसवून ठेवायचे. जर मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करायचे असेल तर शिक्षकांनी शिकविण्याचे कमी करणे हे पहिले काम करावे लागेल.

४) मूल स्वतःहून शिकते ही बाब मान्य केल्यानंतर शिकणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे असे लक्षात येते हे फक्त मुलांच्या बाबतीतच नव्हे तर इतरांच्या बाबतीतही घडते.

५) मुलांच्या या स्वतः शिकण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळे येऊ न देणे ही खरी सुलभक म्हणून आपली जबाबदारी असते.

६) याबाबत जर आपण मुलांना विचारले की, तुला स्वतःहून केव्हा शिकावेसे वाटते? तर या प्रश्नामधून येणारी उत्तरे मुलांना जाणून घेणे, याबरोबरच त्यांना स्वतः शिकण्यास प्रेरित करण्यासाठी उपयुक्त ठरतील असा प्रयत्न व्हायला हवा.

७) मुलांशी बोलल्यानंतर असे लक्षात येते की, त्याला जी गोष्ट आवडते, जेव्हा ती शिकण्याची गरज निर्माण होते त्यामध्ये काही तरी उद्दिष्ट असते. त्यामध्ये नावीन्य असते. निकोप स्पर्धात्मक वातावरण आणि मुलाच्या दृष्टीने त्याची उपयोगिता असते, तेव्हा ही मुले स्वयंप्रेरणेने वेगात शिकू शकतात.

८) मुलाची ही अंतःप्रेरणा जागृत करणे हे खरे शिक्षकासमोरील आव्हान असते. आयुष्यात बाह्यप्रेरणेपेक्षा अंतः प्रेरणा खूप मोलाची ठरते. याबाबत आतील आवाज, आतून पेटणे असे शब्द नेहमी आपण ऐकतो.

९) म्हणून विदयार्थ्यांचे शिकणे म्हणजे फक्त पाठ्यपुस्तकातील अभ्यास, दयाव्या लागणाऱ्या परीक्षा एवढ्यापर्यंत ते सीमित नसते तर त्याचे परिणाम स्वरूप म्हणून त्याचे आचार-विचार वर्तन, संवाद या माध्यमातून शिकण्याचा परिणाम दिसून येत असतो.

१०) पाठ्यपुस्तकाच्या मर्यादेपलीकडे जाऊन शिकणे आणि शिकविणे या दोन्ही प्रक्रिया घडणे अपेक्षित आहे. याबाबत सामाजिक ज्ञानरचनावादी विचारवंत Vygotsky यांनी ZPD (Zone of Proximal Development) मध्ये

नमूद केल्याप्रमाणे, What the learner know and What the learner doesn’t know यामधील झोन हा विकासाजवळचा अवकाश असतो. या झोनमध्ये सुलभकाची भूमिका MKO (More Knowledgable Other) ची असते. याचा अर्थ शिकणाऱ्यापेक्षा अधिक माहीतगार व्यक्ती असा होतो. जे माहीत नाही त्याची वाट दाखविणे व माहीत होण्यासाठी आवश्यक सुविधा पुरविणे, मदत करणे अशी ही भूमिका असते.

Leave a Comment