मुलांना शिकण्यास आव्हान देणे learning outcomes
भविष्यवेधी शिक्षण विचार अनुषंगाने सतरा बाबींपैकी प्रथम करावयास सांगितलेल्या सहा बाबींमध्ये सर्वांत लवकर परिणाम देणारी आणि शिक्षकांचा उत्साह वाढवणारी बाब म्हणजे मुलांना शिकण्यास आव्हान देणे. मुलांना आव्हाने आवडतात कारण स्वाध्याय, घरचा अभ्यास (Home work) दिला जातो त्या तुलनेत मुले आव्हानांना खूपच छान प्रतिसाद देतात. ज्याला Home work असा इंग्रजी शब्द वापरला जातो. Home work चे शब्दशः मराठीत भाषांतर घरचे काम किंवा गृहकार्य होतो आणि तो योग्यही आहे. मुलांना घरी करावयास दिलेले काम हे घराच्या कामासारखे वाटायला हवे. आवडीचे आनंदाचे सहज करता यावे सदर काम करण्याची त्याची इच्छा असावी असे. परंतु आपल्या शाळेत दिला जाणारा अभ्यास या प्रकारात किती मोडतो? हा प्रश्न आहेच. तात्पर्य, या प्रकारच्या अभ्यासात त्यांना आव्हान वाटत नसल्यामुळे कंटाळा येतो. नाराजी, नाखुशीने सरांनी सांगितलेले काम म्हणून करतात. त्यात ते मनापासून स्वतःहून सहभागी होत नाहीत. याचा परिणाम अभ्यास न करणे, जो केला तो परिणामकारक न करणे किंवा त्याचा परिणाम न मिळणे अशा बाबी घडलेल्या दिसून येतात. मुलांना अभ्यासाची गोडी लागणे, आयुष्यात येणाऱ्या आव्हानांकडे समस्या म्हणून न पाहता आव्हान म्हणून पाहण्याची दृष्टी निर्माण होण्याचे काम आव्हाने करतात.
आव्हान देण्याच्या क्रियेचा चेतना जागृत करण्याच्या मानसशास्त्रीय संबंधांशी निश्चित संबंध आहे. तेव्हा विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आव्हान देणे ही कमालीची प्रभावी प्रक्रिया आहे. उदाहरणार्थ – एका वर्गात शिक्षकाने मराठी विषयाचा एक परिच्छेद घेऊन त्यावर मुलांना विचारणा केली की, तुम्ही या दहा ओळींच्या परिच्छेदावर किती प्रश्नांची निर्मिती करू शकता? काही वेळाने वर्गातील बहुतांश मुलांनी दहा ओळीच्या परिच्छेदावर पन्नासपेक्षा जास्त प्रश्न तयार करून शिक्षकांना दाखविले. या प्रश्नांचा आवाका आशयाच्या आकलनापासून ते व्याकरणापर्यंतच्या सर्वच घटकांना अतिशय अचूक छेदत होता. प्रत्येक शब्दावर प्रश्न तयार झाला होता. आता एका दहा ओळींच्या परिच्छेदावर दहा प्रश्न तयार करा? हा झाला स्वाध्याय. त्या परिच्छेदातील मुद्द्यांवर काही प्रश्नांची उत्तरे लिहा. हा झाला गृहपाठ. तर त्याच परिच्छेदावर तुम्ही जास्तीत जास्त किती प्रश्न तयार करू शकता? हे झाले आव्हान. पहिल्या दोन्ही प्रश्नात म्हणजे स्वाध्याय आणि गृहपाठाच्या प्रश्नात मुलांना स्वतःचा कस लागावा असे आव्हानच नव्हते. जे दिसते ते लिहायचे असे साधारण त्याचे स्वरूप पण तिसऱ्या प्रश्नात मात्र त्यांना आव्हान मिळाले आणि त्यांनी दहा ओळीत पन्नासपेक्षा जास्त प्रश्न तयार केले. आता आपण विचार करू की, त्या मुलाने त्या उताऱ्याचा किती सखोल अभ्यास केला असणार? तर याच मार्गाने विविध विषयासंदर्भात विद्यार्थ्यांना विषयाच्या अभ्यासासाठी संधी देत रहाणे, त्यांच्या विचारशक्तीला वाव देत रहाणे म्हणजेच आपली दुसरी पायरी- शिकण्यासाठी आव्हान देणे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची चिकित्सक दृष्टी वाढीस लागून दोन ओळींच्या मधलेही वाचता येणे त्यांना शक्य होईल. आव्हान म्हणजे काय आणि ती कशी दयायची? शाळा स्तरावर किंवा वर्ग स्तरावर विविध आव्हाने दिली जातात. विविध विषयांची किंवा विषयाबाहेरील आव्हानेसुद्धा देता येतात. आव्हानात काम कारण्याची मर्यादा नसतेच, असेलच तर वेळेची मर्यादा घातली जाते. दिलेल्या वेळेत दिलेल्या विषयाचे सर्वांत जास्त काम करण्याचे आव्हान दिले जाते. मुले त्यांची जास्तीत जास्त क्षमता वापरतात. आपले काम सर्वांत जास्त आणि चांगले व्हावे यासाठी निकोप स्पर्धा असते त्याचा परिणाम मुलांच्या सादरीकरणात दिसतो. मुलांना आव्हान देण्याच्या आड काय येत असेल? तर आपणच आपल्याला घालून दिलेल्या मर्यादा. मर्यादा वर्गाच्या, इयत्तेच्या, विदयार्थ्यांच्या बाबतीतील पूर्वग्रहदूषितअसण्याच्या, अशा अनेक विदयाथ्यर्थ्यांची क्षमता बहुतांशवेळा शिक्षकांना, शाळेला, घरच्यांना, समाजाला इ. अनेकांना ज्ञात झालेली नसते.
हे सारे आपल्याला लागू होते. आपल्या इयत्तेच्या, अभ्यासक्रमाच्या आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीतील पूर्वग्रहाच्या मर्यादा आपल्याला अडकवून ठेवतात. मर्यादा तोडण्याच्या सिद्धांताला मुळात शांत चित्तवृत्ती आवश्यक आहे. तेव्हाच ‘मुले वाचता येतील’. ती वाचून आव्हानांच्या मर्यादा तुटतील. सध्याच्या पद्धतीत मुले दबलेली आणि अधिकारहीन ठेवली जात आहेत असे चित्र दिसते, इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे आज जो ग्रामीण वर्ग आकर्षिला गेला आहे. त्यांचेही शिक्षण सध्या ‘स्पून फिडिंगच्या’ प्रकारातले होत आहे. याचा अतिरेक इतका की, विदयार्थ्यांतील आव्हानांना तोंड देण्याची क्षमताच काढून घेतली आहे. ही वस्तुस्थिती आहे. इंग्रजी भाषेच्या अट्टाहासापायी त्यांच्या शिक्षणात कमालीची चाकोरीबद्धता आली आहे. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त मुलाला वेगवेगळ्या क्लासेसच्या नावाखाली अडकवून ठेवण्याच्या फॅशनमुळे मुलांमधील सहजपणा लोप पावून तो निर्णय क्षमतेत विकलांग झालेला दिसतो. हे शिक्षणात मुलांमधील नेतृत्व हिरावून घेण्यासारखे आहे. आता आपल्या सरकारी शाळांमध्ये डोकावून पाहू सरकारी शाळांतही शिक्षकाने स्वतःला मर्यादेत अडकवून घेतल्याचे दिसेल. कधी शिकवण्याच्या तंत्राच्या मर्यादेत, तर कधी पाठ्यपुस्तकाच्या मर्यादेत आणि अजूनही इतर बाबी असतील. आपल्या प्रस्थापित पद्धतीत विद्यार्थी आव्हाने पेलण्यास असमर्थ असल्याचे चित्र दिसते आहे. आपल्या शिक्षणपद्धतीवर नेहमीच प्रश्न उभा केला जातो की, एकशे चाळीस कोटींचा देश प्रत्येक देशाला फक्त नोकरच पुरविणार का? गुगलचा CEO भारतीय होणार मग गुगलचा संस्थापक का नाही? तर हे का झाले? कारण एकच, आपल्या शिक्षणपद्धतीत शिक्षणातील आव्हाने काढून घेतली गेल्यामुळे आणि शिक्षणातून विदयार्थी नेतृत्व हद्दपार झाल्यामुळे. याला पूर्ववत एकच गोष्ट आणू शकते ती म्हणजे शिक्षणात आव्हान देण्याची पद्धती. आता या पद्धतीसाठी मर्यादा तोडण्याचे जसे एक गृहीतक आहे, तसे शिकण्यास आव्हान देण्याच्या काही कलुप्त्या आहेत.
आव्हाने मुलांच्या शिकण्याची गती वाढवितात. शिकण्यात आवड निर्माण करतात. शिकणे सहज आणि आनंदी होण्यास मदत करतात. मुलांना त्यांच्या क्षमतांची ओळख करून देतात. तर मर्यादा ओलांडून काम करण्याची प्रेरणा देतात. आव्हानांमुळे निकोप वातावरण तयार होऊन वर्गातील प्रत्येक मुलाला त्याच्या क्षमतेनुसार किंवा पूर्ण क्षमतेने काम करण्याची संधी देतात. आव्हानांचे कांही परिणाम लगेच पाहता येतात, तर काही परिणाम कालांतराने दिसू लागतात. अशी काही आव्हानांची उदाहरणे पाहू या. ज्यामुळे मुलांना शिकण्यास आव्हान देणे ही संकल्पना अधिक स्पष्ट व्हायला मदत होईल.
शाळा भेट अनुभव :
काटा केंद्रातील, कोंडाळा शाळेत गेलो असता, सर चौथीच्या वर्गाला गणित विषय शिकवीत होते. सरांनी मुलांना चार अंकी संख्येची बेरीज शिकविली आणि फळ्यावर सहा उदाहरणे लिहून दिली. मुलांनी लगेच उदाहरणे सोडवायला सुरुवात केली. सर वर्गात फेऱ्या मारत होते. सर येऊन बसतात तोच वर्गातील काही मुलांनी उदाहरणे सोडविली आणि वह्या दाखवायला आणणे सुरू केले. सरांनी एक-दोन मुलांच्या वह्या पाहिल्या आणि त्यांना जाग्यावर बसण्यास सांगितले. सरांनी ज्या विदयार्थ्यांची उदाहरणे सोडवून झाली होती ती तपासणे सुरू केले, तसेच ज्यांना उदाहरणे सोडविण्यात अडचण येत होती त्यांना त्यांच्या जागेवर जाऊन समजावून सांगितले. असे अर्धा तास सुरू होते. मला वाटते आपल्या परिसरातील बहुतांश शाळेल गणित विषयाच्या बाबतीत अशाच प्रकारची प्रक्रिया चालत असेल. दोन प्रश्न आहेत पोफळे सरांच्या वर्गात गणिताच्या बाबतीत इतरांच्या वर्गाप्रमाणे तीन स्तरातील विद्यार्थी
असतील. अधिक गतीने गणित शिकणारे, मध्यम गती असणारे व कमी गती असणारे. पहिला प्रश्न – वर्गातील सर्वांत हुशार मुलगा जास्तीत जास्त किती उदाहरणे सोडवील? फळ्यावर सहा उदाहरणे दिलेली आहेत. वर्गातील गणितात अध्ययन गती कमी असणाऱ्या मुलांनी जास्तीत जास्त किती उदाहरणे सोडवेल ? वर्गातील दोन्ही प्रकारच्या मुलांची समज जास्तीत जास्त उदाहरणे सोडविण्याची संख्या सारखीच सहा असेल. वर्गातील सर्वांत हुशार मुलगा पण सहाच उदाहरणे सोडविणार आणि सर्वांत मागे असणारा मुलगा पण सहाच उदाहरणे सोडविणार, याला आपण कदाचित संधीची समानता म्हणू, पण ती समानता अन्यायकारक असेल कारण येथे समानतेची नाही तर समतेची गरज आहे. पण प्रचलित वर्ग पद्धतीत ती दिसत नाही. आपण एका मुलाला नाही, तर संपूर्ण वर्गाला शिकवतो. असाच अर्धा तास वर्ग सुरू होता. पुढील अर्धा तास आव्हानामध्ये कसा परावर्तित झाला ते पाहू. आम्ही मुलांना सांगितले, तुम्हाला चार अंकी संख्येच्या बेरजेची उदाहरणे सोडवायची आहेत. उदाहरणे आम्ही
देणार नाही. तुम्ही स्वतःच गणिते घ्यायची आणि ती सोडवायची. अर्धा तास वेळ असेल पाहू कोण जास्तीत जास्त उदाहरणे घेऊन सोडवितो. अर्धा तास सुरू झाला. सर आणि मी पुढील अर्धा तास पोर्चमध्ये चर्चा करत होतो वर्गातून कोणाचाही आवाज नाही की, गोंधळ नाही. अर्धा तास झाल्यावर वर्गात गेलो असता सरांना पाच-सहा वेळा तरी मुलांना थांबा वेळ संपली, असे सांगण्याची गरज पडली मुलांची उदाहरणे तयार करणे आणि सोडविणे सुरूच होते. मुले थांबली, मुलांना विचारले कोणी किती उदाहरणे सोडविली? मुलांनी त्यांनी सोडविलेल्या उदाहरणांचे आकडे सांगणे सुरू केले. आम्ही आश्चर्यचकित झालो. तुमच्यासाठी प्रश्न : वर्गातील सर्वांत हुशार मुलाने अर्ध्या तासात किती गणिते सोडविली असतील? दहा, पंधरा, पंचवीस, चाळीस, पन्नास की जास्त ? वर्गातील हुशार मुलाने बाहत्तर उदाहरणे सोडविली होती. आश्चर्यचकित झालात ना! आता विचार करा त्या वर्गातील गणितात सर्वांत मागे असणाऱ्या मुलाने जास्तीत जास्त किती उदाहरणे सोडविली असतील? गणितात सर्वांत मागे असण्याऱ्या मुलाने सोडविलेल्या गणिताची संख्या होती तेरा. त्या विदयार्थ्याने सोडविलेल्या तेरा उदाहरणांपैकी दहा उदाहरणे चुकली होती आणि तीन उदाहरणे बरोबर होती. आता विचार करण्यासारखी बाब म्हणजे पूर्वीचा अर्धा तास आणि या अर्ध्या तासात काय फरक आहे? पहिल्या अर्ध्या तासात आम्ही वर्गातील मुलांवर अन्याय करत होतो सर्वांना सारखेच काम देऊन. हुशार मुलांची उदाहरणे सोडवून झाली तरी त्यांना त्यांच्या क्षमतेएवढे काम मिळाले नाही. एवढेच काय तर आम्ही वर्गातील सर्वांत मागे असणाऱ्या मुलांच्या क्षमतेचा उपयोग पण पूर्णतः केला नाही. प्रत्येक मुलात आपण गृहीत धरतो त्यापेक्षा अधिक क्षमता असतात. त्यांच्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग आव्हानांमध्ये होतो.
काटा केंद्रातील, चिखली बुद्रुक शाळेत गेलो असता शिंदे सर शाळेत होते. द्विशिक्षकी शाळा, एकेचाळीस पट. इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग असलेली शाळा. सर चारही वर्ग एकत्र घेऊन बसले होते, मुले स्वतः कसे शिकतील यासाठी मुलांना आव्हान दिलेले होते. मुले ते आव्हान पूर्ण करीत होती. सरांशी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन (Management of Learning Intervention) च्या अनुषंगाने चर्चा झाली. मुलांशी गप्पा मारल्या, परत जायच्या वेळी मुलांना विचारले, “मी तुम्हांला आव्हान दिले तर चालेल का?” मुले उड्या मारायला लागली हो सर… हो सर. पुढील दोन दिवस शनिवार आणि रविवार अशी सुट्टी होती. मुलांना वाचनाचे आव्हान दिले. पुढील दोन दिवसात कोण जास्तीत जास्त पुस्तके वाचून येतो? चला तर मग, उदया पाहू कोण किती पुस्तके वाचून येतो? लगेच मुलांनी मला दुरुस्त केले सर उदया सुट्टी आहे, सोमवारी पाहू, अच्छा सोमवारी कोण किती पुस्तके वाचून येते ते पाहू? मुलांना कोणती पुस्तके वाचायची, काय वाचायचे असे काहीही सांगितले नाही. मुलांना आव्हान देऊन आम्ही शाळेतून बाहेर पडलो तर, बहुतांश मुले पुस्तके हातात घेऊन वाचायला लागली होती.
सोमवारी आम्ही काही त्या शाळेत गेलो नाही. साधारणतः दुपारी बाराच्या दरम्यान शिंदे सरांचा फोन आला. सर मुले जे काही सांगत आहेत त्यावर विश्वास बसत नाही. मी विचारले काय म्हणत आहेत? कोणी किती पुस्तको वाचलीत ? सरांनी उत्तर देण्याआधी तुम्हांला काय वाटते? मुलांनी जास्तीत जास्त किती पुस्तके वाचली असतील? वर सांगितल्याप्रमाणे पहिली ते चौथीची शाळा. काय वाटते जास्तीत जास्त किती पुस्तके वाचली असतील ? तिसरी आणि चौथीची आठ मुले अशी होती की, त्यांची पहिली, दुसरी, तिसरी व चौथीची सर्व पुस्तके वाचून झाली होती. छोटेसे गाव त्यामुळे गावात इतर पुस्तकांची (वाचनालय नसल्यामुळे पुस्तक म्हणजे शाळेची पुस्तके) सोय नाही. इतरही बरीच मुले पुस्तके वाचून आली होती. मुलांनी दोन दिवसात एवढी पुस्तके वाचली याचे शिंदे सरांना आश्चर्य तर वाटलेच; परंतु त्यांना जास्त आश्चर्याचा धक्का बसण्याचे अजून एक कारण होते. वर्ग दुसरीतील योगेश सांगत होता तो दोन पुस्तके वाचून आला होता, परंतु योगेशला वाचता येत नाही हे सरांना नक्की माहीत होते. आता प्रश्न आहे योगेशला जर वाचताच येत नाही, तर योगेश पुस्तके वाचून आला म्हणजे नेमके काय केले असेल ? योगेशने आव्हान स्वीकारले आणि पुस्तकांची पाने चाळली व चित्रे पाहिली.
आव्हानाच्या निमित्ताने आम्ही अशा मुलाला वाचून यायला सांगितले, ज्याला वाचता येत नाही आणि आश्चर्य म्हणजे तो वाचूनही आला. कदाचित आम्हांला अपेक्षित आहे तसे आज त्याने वाचले नसेलही; परंतु वाचनाच्या दिशेने जाण्याची शक्यता निर्माण झाली. उदया जेव्हा पुस्तकातील एखादी बाब त्याला वाचण्यास सांगू, तेव्हा ती बाब ओळखीची वाटण्याची शक्यता आहे. शाळेतील सर्वच मुले त्यांच्या परीने पुस्तके वाचून आली होती. जे पुस्तक वर्षभर वाचायचे असते किंवा शिक्षकाने शिकवल्यानंतरच वाचायचे असते असे अलिखित नियम मानून वावरणाऱ्या मुलांनी एक-दोन दिवसात पुस्तकेच्या पुस्तके वाचून काढणे हे आश्चर्यचकित करणारे आहे. मुळात वाचनच नाही, तर सर्वच आव्हानांना मिळणारा मुलांचा प्रतिसाद आश्चर्यचकित करणारा आहे.
विविध प्रकारची आव्हाने शिक्षक विदयार्थ्यांना देत आहेत. चौथीच्या वर्गाला शिक्षकांनी दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे अशी जास्तीत जास्त उदाहरणे एका दिवसात घरून सोडवून आणण्याचे आव्हान दिले होते. शिक्षक दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊ शकले नाही. तिसऱ्या दिवशी शाळेत गेले आणि मुलांनी वह्या दाखवायला आणल्या, तर सर आश्चर्यचकित. एका मुलीने गुणाकाराची ४५० उदाहरणे सोडविली होती. तिला थांबली का? असे विचारले असता वही संपली म्हणून थांबले असे उत्तर तिने दिले.
आव्हानाच्या बाबतीत एका शिक्षण परिषदेत बोलत असताना चिखली शाळा व इतर शाळेतील पुस्तक वाचनाची उदाहरणे सांगितली. मुले पुस्तकेच्या पुस्तके वाचून काढत आहेत असे सांगितले असता, उपस्थित काही शिक्षकांनी प्रश्न उपस्थित केला, फक्त असे वाचून काय होणार आहे? त्यावेळी ‘मी कसा शिकवतो?’ याचा डेमो दाखविला. बहुतेक जण हसायला लागले. कारण विचारले असता आम्हीही काही प्रमाणात असेच शिकवतो आणि याच्याशी आम्ही सहमत आहोत की, शिकवतो म्हणजे वाचून दाखवितो, स्पष्टीकरण देतो, प्रश्न विचारतो, जास्तीत जास्त वाचूनच दाखवितो, तेव्हा संबंधित शिक्षक व इतरही शिक्षक बऱ्याच प्रमाणात माझ्या मताशी सहमत झाले की, आम्ही शिकवण्यापेक्षा विदयार्थ्यांचे स्वतः शिकणे, वाचणे चांगला परिणाम करते. आव्हानांच्या बाबतीत शिक्षकाला पंधरा दिवस आव्हाने दद्यायला पुरतात नंतर मुलांना काय आव्हान दद्यायचे? हे आव्हान शिक्षकांसमोर उभे राहते. सुरुवातीला मुले वाचून येतात; पण त्यांना अर्थ कळत नाही असे म्हणणाऱ्या वाघ नावाच्या शिक्षिका म्हणाल्या, “माझी दुसरीची मुले पण अर्थ सांगत आहेत. एक पुस्तक किंवा धडा वारंवार वाचल्याने त्यांना कळायला लागले.” कालांतराने वाचन चांगले व्हावे, मुलांनी स्वतः शिकावे यासाठी शिक्षकांनी वाचनाच्या बाबतीत विविध आव्हाने देणे सुरू
केने. पुढल्या दिवशी अभ्यासायच्या पाठावर प्रश्न काढून आणणे, पाठ क्र. पंधरा या पाठावर जास्तीत जास्त प्रश्न कोण तयार करते ? असे आव्हान दिले की, मुले दुसऱ्या दिवशी किती प्रश्न तयार करून आणणार? याचा आपण विचारही करू शकत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात मुले प्रश्न तयार करून आणतात. दीडशे, दोनशे, तीनशे प्रश्न एका पाठातून तयार करून आणतात. चिखली (बु.) शाळेतील शिक्षिका म्हणतात, “वेळ संपतो पण पाठावरील प्रश्न काढणे पूर्ण होत नाही, प्रश्नाचा फायदा मुलांना असा झाला, जेवढे प्रश्न मुलांनी काढले तेवढ्या प्रश्नांची उत्तरे मुलांना कधीही विचारली तरी येतात. पाठ्यपुस्तकात पाठाच्या शेवटी पाच-दहा प्रश्न दिलेले असतात, आता मुले एका पाठावर एवढे प्रश्न काढत आहेत. परंपरागत पद्धतीत प्रश्नांची उत्तरे पाठ करावी लागत, कालांतराने ती विसरून जातात. वरच्या वर्गाला शिकवणारे गजाजन अमलापुरे सरांचे मत होते की, सर मुले प्रश्न काढतात पण सर्व माहितीवजा प्रश्न असतात. त्यांना अध्ययन निष्पतींवर आधारित उपयोजनात्मक स्तरावरील प्रश्न कसे येतील. सरांना विनंती केली, एकदा मुलांना NAS पातळीवरील प्रश्न कसे तयार करतात ते समजून सांगा. सरांनी मुलांना NAS चे प्रश्न दाखविले पर्याय कसे दयायचे सांगितले. मुलांचे प्रश्न पाहिले असता असे लक्षात आले मुलांनी खूप छान प्रश्न तयार केले होते. आता मुले प्रत्येक पाठ त्याप्रमाणे स्वतः शिकतात. पाठांतर संपले, शिकण्यातील कंटाळा गेला आणि शिकण्याची गती वाढली. आता कोणताही धड़ा किंवा संकल्पना स्वतः शिकता येते हा विश्वास विकसित झाला. ब्राम्हणवाडा शाळेतील
इयत्ता सातवीच्या वर्गात गेलो असता अवचार सरांनी आज शिकवायच्या मराठी विषयातील पाठाचे नाव फळ्यावर लिहिले होते. मुलांचे दोन गट समोरासमोर बसून प्रश्नांच्या भेंड्या खेळत होते. एक गट दुसऱ्या गटाला प्रश्न विचारत होता. दुसऱ्या गटातील कोणतेही विदयार्थी प्रश्नाचे उत्तर देऊन त्याच गटातील विदयार्थी पहिल्या गटाला प्रश्न विचारत होता. अशा प्रश्नांच्या भेंड्या सुरू होत्या. सरांनी पाठाबद्दल काय सुरू आहे? असे विचारले असता सरांनी सांगितले, खरे तर हा पाठ मी शिकवला नाही, शिकवत पण नसतो. आज शिकवायच्या पाठाचे नाव फळ्यावर लिहितो. मुलांना अर्धा तास दिला जातो किंवा कधी आदल्या दिवशी या पाठावर जास्तीत जास्त प्रश्न कोण तयार करतो असे आव्हान दिले जाते. प्रश्न काढून झाले की, मुलांचे दोन गट करून प्रश्नांच्या भेंड्या खेळतात. शिक्षक म्हणून मी सोबत असतो. दोन गटात समन्वय साधणे आणि लागलेली भेंडी लिहिण्याचे काम मी करीत आहे. आज दोन गटात खेळत आहेत तर, कधी चार मुलांचा गट करून अशा गटात समवयस्क (Peer पण भेंड्या खेळतात.
) व गटाचा (group) फायदा आम्हांला दिलेले आव्हान शंभर टक्के मुलांपर्यंत न्यायला उपयोगी होत आहे. पहिल्या दिवशी आव्हान दिले की, दुसऱ्या दिवशी मुले आव्हान पूर्ण करतात. आव्हान एकच; पण दोन वेगवेगळ्या मुलांनी ते काम वेगळे करून आणलेले असते. उदा. शिकणार असलेल्या पाठावर प्रश्न काढून आणणे असे आव्हान होते. वर्गातील एका मुलाने त्या पाठावर सत्तर प्रश्न काढून आणले, तर दुसऱ्या मुलाने नव्वद प्रश्न काढून आणले. शक्यता अशी आहे की, त्या दोन मुलांची तुलना केली असता दोघांचे काही प्रश्न सारखे तर काही प्रश्न वेगळे असतील. दुसऱ्या दिवशी पुढील काम असे असते दोन-दोन मुलांच्या जोड्या करून त्यांनी तयार केलेले प्रश्न आपसात शेअर करायला सांगितले जातात. एका मुलाचे सत्तर आणि दुसऱ्याचे नव्वद असे प्रश्न तयार झाले. त्या दोघांनी प्रश्न शेअर केले, तर ज्याचे सत्तर प्रश्न होते त्याचे नव्वदच्या वर प्रश्न होतील. ज्याचे नव्वद होते त्याचे सुद्धा नव्वदच्या वर प्रश्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. समवयस्कचे (Peer) काम झाले की, चार मुलांचा एक याप्रमाणे गट केले जातात व गटात केलेल्या कामाप्रमाणे काम करून परस्पर शेअरिंग करतात. याने आव्हानांच्या बाबतीत वर्ग समान पातळीवर यायला मदत होते शिक्षकांनी न शिकवताही मुले एकमेकांकडून शिकतात. यामध्ये महत्त्वाची एक मदत अशी होते की, बऱ्याच वेळा दिलेले आव्हान सर्वच मुले पूर्ण करतात असे नाही. अशा वेळी
त्याने धरून काहीच करून आणले नाही तरी त्याला गटात काम करण्याची संधी दिल्यास त्याच्याकडे आव्हाने तयार होतात. त्याला शिकण्याच्या प्रवाहात मुले घेऊन येतात.
आव्हाने देत असताना असे लक्षात येते की, दिलेल्या सर्वच आव्हानांना १०० टक्के विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. काही आव्हानांच्या बाबतीत वर्गातील काही विदयार्थी अपेक्षित प्रतिसाद देत नाहीत. याची अपवादात्मक कारणे जर सोडली तर एक महत्त्वाचे कारण असे लक्षात येते की, त्यांना दिली गेलेली आव्हानाची काठिण्यपातळी अधिक होती. आपल्या वर्गात अध्ययन गतीच्या अनुषंगाने तीन स्तरातील विदयार्थी असतात. PISA स्तरावरील आव्हान असेल तर ते आव्हान ASER आणि NAS स्तरावरील विद्यार्थ्यांना कठीण जाईल. अशा वेळी या दोन्ही स्तरातील विदयार्थ्यांचा प्रतिसाद मिळणार नाही. याउलट ASER स्तरावरील आव्हान दिले तर NAS आणि PISA स्तरावरील विदयार्थ्यांना ते आव्हानच वाटणार नाही कारण त्याची काठिण्यपातळी कमी असेल. असे आव्हान स्वीकारण्यास त्यांना रस वाटणार नाही आणि त्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही.
त्यामुळे वर्गात आव्हान देत असताना काठिण्यपातळीच्या अनुषंगाने चार स्तरांवर विचार करता येईल : अशी आव्हाने.
(१) वर्गातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना देता येतील (२) ASER स्तरातील विद्यार्थ्यांना देता येतील अशी आव्हाने.
(३) NAS स्तरातील विदयार्थ्यांना देता येतील अशी आव्हाने.
(४) PISA स्तरातील विदयार्थ्यांना देता येतील अशी आव्हाने.
काठिण्यपातळीप्रमाणे मुलांच्या संख्येनुसार पण आव्हानांचा तीन प्रकारे विचार करायला हवा.
(१) वैयक्तिक पातळीवर दयावयाचे आव्हान
(२) समवयस्कांमध्ये देण्याचे आव्हान
(३) गटामध्ये दयावयाचे आव्हान. वरील प्रकारे आव्हानाचा बारकाईने विचार केल्यास विदयार्थ्यांचा प्रतिसाद चांगला मिळतो.
आव्हानाच्या बाबतीत एक अडचण विचारली जाते. मोबाईल किंवा इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्यास विदयार्थ्यांना त्या माध्यमातून स्वतः शिकण्यास पूरक आव्हाने कशी दयावीत. अशा वेळी मोबाईल किंवा इंटरनेटवरून माहिती मिळून शिकायला पाहिजे असे अनिवार्य नाही. त्याशिवाय त्यांना जमतील असे त्यांच्या परिसरातील किंवा उपलब्ध संसाधनांच्या आधारे आव्हाने कशी देता येतील याचा विचार करणे अधिक संयुक्तिक आहे.
आव्हान देण्याची कृती, मुलांना शिकण्यासाठी आव्हान देणे. ही आव्हाने अनेक मार्गी असू शकतात. जसे- स्वतःने-स्वतःला, एकाने-दुस-याला, शिक्षकाने विदयार्थ्याला, कुटुंबाने पाल्याला वैयक्तिक स्तरावरची ही आव्हाने टप्याटप्प्यांनी गट-वर्ग-शाळा ते वैश्विक आव्हाने अशा अनेक स्तरापर्यंत जाऊ शकतात. आव्हाने फक्त विदयार्थ्यांसाठीच असतील असे नाही. क्षेत्रीय अधिकारी यांनी मुख्याध्यापकांना आव्हाने दयावीत, मुख्याध्यापकांनी शिक्षकांना आव्हाने दद्यावीत, शिक्षकांनी परस्परांना आव्हाने दद्यावीत. यामुळे आव्हाने स्वीकारण्याची सवय लागेल. सवयीचे रूपांतर संस्कृतीत होईल. ज्याचा परिणाम विदयार्थी एकमेकांना आव्हाने देतील आणि आव्हाने स्वीकारतील. आव्हान स्वीकारण्याची वृत्ती मुलांत रुजणे गरजेचे असल्याने तशी परिस्थिती शिक्षकाला निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची आवश्यकता आहे. स्व-प्रयत्नाचा आनंद/ उत्सव विद्यार्थ्याला साजरा करता येईल अशीही परिस्थिती शिक्षकालाच निर्माण करायची आहे. लहान गटात खेळ आणि विविध कलेच्या माध्यमातून प्रवास साधायचा
आहे तर नावीन्य आणि विविधता टिकविण्यासाठी स्वतः अदद्ययावत राहायचे आहे. या पायरीवर शिक्षकांच्या कौशल्याला इतर पर्यायापेक्षा जास्तीचे महत्त्व आहे, हे तुम्हांला वरच्या गोष्टीतून लक्षात आलेच असणार. गोष्ट पुन्हापुन्हा वाचणे यासाठी गरजेचे आहे. विदयार्थ्याला आव्हान देताना ती शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सुरक्षित असणे गरजेचे आहे. असुरक्षित वातावरणातील आव्हाने निष्कर्षाची दिशा बदलू शकतात. नित्यक्रमाला फाटा
देताना, आव्हानांची निर्मिती करताना शिक्षकाची गुंतवणूक वाढणार आहे तेव्हा यासाठी तो सज्ज असावा. आता एकविसाव्या शतकात आव्हानांना तोंड देताना आव्हानेही एकविसाव्या शतकातीलच हवीत ना? जागतिक आरोग्य संघटनेने एकविसाव्या शतकातील आव्हाने ठरविली आहेत. ती माहितीसाठी असू दया. The World Health Organization listed ten life skills as essential for every human being for positive growth and good quality of
life: (1) Communication Skills (संवाद) (2) Creative Thinking (सर्जनशील) (3) Critical Thinking (चिकित्सक विचार) (4) Decision Making (निर्णय क्षमता) (5) Empathy (सहानुभूती) (6) Interpersonal Relationships
(आंतरव्यक्ती परस्पर संबंध) (7) Managing Emotions (भावनिक समायोजन) (8) Management of Stress (तणावाचे व्यवस्थापन) (9) Problem Solving (समस्या निराकरण) (10) Self-awareness (स्व-जाणीव) आव्हानांचा विषय प्रचंड व्यापक आहे. वर्गवार त्याचे विस्तृतिकरण होत जाणार आहे.
आव्हान काय आहे आणि काय नाही? अधिक स्पष्टता अपेक्षित आहे. यादृष्टीने
शिकण्याच्या गतीत आव्हाने कमालीची परिणामकारक ठरतात. मुलांना आव्हान स्वीकारायला आवडते. वर्गात
अशी वेगवेगळी आव्हाने दिली गेली तर मुलांमध्ये एकमेकांत चुरस निर्माण होते आणि जिंकण्याच्या स्वाभाविक भावनेचा वापर शिकण्याच्या प्रक्रियेत करता येतो. वरवर अशक्य आणि अवघड वाटणाऱ्या बाबी सहज सोप्या होऊन
जातात. आव्हानासंदर्भात खालील उदाहरणातून अधिक जाणून घेऊ या.