केंद्रप्रमुख पदोन्नतीप्रकरणी शिक्षणाधिकारी हाजीर हो…!प्रहार शिक्षक संघटनेच्या आक्षेपावर विभागीय आयुक्तांचे आदेश kendrapramukh promotion
अमरावती : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने १६२ पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापकांची केंद्र प्रमुखपदी पदोन्नतीकरीता यादी जाहीर करून त्यांना १२ जून पर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु ही यादीच नियमबाह्य असल्याचा आरोप करीत प्रहार शिक्षक संघटनेने विभागीय आयुक्तांकडे यादीवर आक्षेप घेतला होता. अखेर या आक्षेपाची दखल घेत विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय यांचे आदेशावरून उपायुक्त संतोष कवडे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी
यांना शुक्रवारी आयुक्तालयात सर्व माहितीसह हाजीर होण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया व शिक्षण विभाग अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यात सुमारे ५२ केंद्रप्रमुखांच्या रिक्त जागांवर पदोन्नतीकरिता पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक यांना पात्र करीत ६ जून रोजी जिल्ह्यातील १६२ जणांची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली आहे. तर १२ जूनपर्यंत कागदपत्रे जमा करण्याचे सूचित करण्यात आले होते. परंतु या अंतिम सेवाज्येष्ठता यादीवरच प्रहार शिक्षक संघटनेने आक्षेप घेतल्याने प्रसिद्ध केलेली यादी नियमबाह्य असल्याचा आरोप संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी केला होता. शिक्षण विभागाने या आदेशाला केराची टोपली
दाखवित यामध्ये केवळ पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा समावेश यादीत केल्याने यावर आक्षेप नोंदवित ही यादी नव्याने प्रसिद्ध करावी अन्यथा आंदोलन करू असा इशारादेखील महेश ठाकरे यांनी विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला होता. अखेर या निवेदनाची दखल घेत विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी शुक्रवारी १४ रोजी प्रक्रियेतील सर्व माहितीसह हजर होण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणी आयुक्तालयात आता खल होणार असून प्रक्रिया नियमबाह्य की नियमानुसार, यावर शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र या प्रकरणी आता शिक्षण विभाग व प्रक्रिया दोन्ही अडचणीत आलेल्या आहेत.